अलिकडच्या काळात योगाभ्यास व प्राणायामासंदर्भात लोक विशेष जागरूक झालेले दिसतात. शरीर तंदरूस्त रहाण्यासाठी व शुध्द करण्यासाठी प्राणायामाकडे कल वाढलेला दिसतो. परंतु, जोपर्यंत शरीर शुध्द होत नाही, तोपर्यंत आसन व प्राणायामाचा लाभ घेता येत नाही. शरीर शुध्द करण्यासाठी धौती कर्म केले जाते. त्यालाच षट्कर्म असेही म्हटले जाते.
1. वमन धौती- पाच ते सहा ग्लास कोमट पाणी प्यावे. पाण्यात थोडे मीठ आपण टाकू शकतो. त्यानंतर आपले दोन्ही हात जांघेवर ठेऊन पुढच्या बाजूला झुकून उभे रहावे.
प्यायलेले कोमट पाणी वमनाच्या (उलटीच्या) माध्यमातून पुर्णपणे बाहेर काढावे. दोन बोटे गळ्यात टाकून वमन क्रियेला प्रारंभ करू शकता.
या क्रियेने पित्त पूर्णपणे नाहीसे होते.
2. बहनीसार धौती- जमिनीवर उलटे पडावे. त्यानंतर आपले तळ पाय नितंबांना लावावेत. श्वास घेऊन नाभीला आत ओढून जोरात सोडावे. असे साधारण 100 वेळा करावे.
ही क्रिया केल्याने पोटाविषयी अनेक आजार दूर होतात. पचनक्रिया सुरळीत चालते व शरीर स्वस्थ राहते.
3. वातसार धौती- ओठ संकुचित करून पोट भरत नाही तोपर्यंत हळू-हळू हवा आत घ्या. त्यानंतर दोन्ही नाकपुड्यांमधून शरीरातील हवा बाहेर काढा. या क्रियेला काकी मुद्रा किंवा काकी प्राणायाम असेही म्हटले जाते.
ही क्रिया केल्याने नाडी शुध्द होते व शरीर हलके होते.
4. वस्त्र धौती- अगदी पातळ कापड हवेच्या सहाय्याने तोंडाद्वारे पोटात न्यावा व त्यानंतर हळू-हळू सावधानीपूर्वक बाहेर काढावा.
वरील क्रिया हठयोगींच्या निरिक्षणाखाली शिकली पाहिजे. तुलनेने वर सांगितलेल्या क्रियेद्वारा धौतीकर्म करणे अधिक सोपे व सुरक्षित आहे.