Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर विजय; भारताचं आशिया कपमधलं आव्हान संपुष्टात

Asia Cup cricket trophy
, गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (09:13 IST)
शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला 6 चेंडूत 11 धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्या 9 विकेट्स गेल्या होत्या. शेवटची जोडी मैदानात होती. वेगवान गोलंदाज नसीम खानने 2 चेंडूत 2 षटकार खेचत पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्ध थरारक विजय मिळवून दिला.
 
या विजयासह पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत पाकिस्तानसमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे.
 
पाकिस्तानच्या या विजयासह भारत आणि अफगाणिस्तान यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
 
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने अफगाणिस्तानला 129 धावांतच रोखलं. इब्राहिम झाद्रानने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली.
 
हॅरिस रौफने 2 तर नसीम शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाझ आणि शदाब खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
 
छोट्या पण आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने सातत्याने विकेट्स गमावल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम भोपळाही फोडू शकला नाही. भरवशाचा फखर झमान 5 धावा करून तंबूत परतला. रशीद खानने मोहम्मद रिझवानला पायचीत करत आशा पल्लवित केल्या.
 
इफ्तिकार अहमद आणि शदाब यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. इफ्तिकार अहमदने 30 तर शदाब खानने 36 धावांची खेळी केली. पण हे दोघेही नियमित अंतरात बाद झाल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत आला.
 
भारताविरुद्धच्या सामन्याचा शिल्पकार मोहम्मद नवाझ 4 धावा करून बाद झाला आणि पाकिस्तानच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली.
 
खुशदील शाह बाद झाल्यानंतर असिफ अलीने दोन षटकार खेचत पाकिस्तानचा विजय जवळ आणला. पण फरीद अहमदने टाकलेल्या उसळत्या चेंडूला बॅट लावण्याचा असिफचा प्रयत्न करिम जन्नतच्या हातात जाऊन विसावला. यावेळी असिफ आणि फरीद यांची बाचाबाची झाली. पंच आणि बाकी खेळाडूंनी या दोघांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
 
असिफ बाद झाल्यामुळे आता मोठा फटका कोण लगावणार का अफगाणिस्तानचे गोलंदाज बाजी मारणार अशी परिस्थिती निर्माण झाली.
 
शेवटच्या षटकात 11 धावा हव्या असताना नसीम शहा स्ट्राईकवर होता. नसीम शाहने फझलक फरुकीच्या दोन चेंडूंवर दोन षटकार लगावत पाकिस्तानला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
 
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी छोट्या लक्ष्याचा चांगल्या पद्धतीने बचाव केला पण नसीम शाहच्या अफलातून षटकारांनी पाकिस्तानला सनसनाटी विजय मिळवून दिला.
 
फझलक फरुकी आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. रशीद खानने 2 विकेट्स घेतल्या.
 
26 चेंडूत 36 धावा आणि एक विकेट पटकावणाऱ्या शदाब खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कल्याण डोंबिवली जागेवर भाजपने दावा केल्याची माहिती नाही - एकनाथ शिंदे