Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकरी आंदोलनः लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडवणारा जुगराज कोण आहे?

शेतकरी आंदोलनः लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडवणारा जुगराज कोण आहे?
, शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (18:33 IST)
रविंदर सिंह रॉबिन
बीबीसी हिंदीसाठी, अमृतसरहून
 
 
जुगराजच्या घरी आणि गावात आधी लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडवण्याचा आनंद दिसत होता. पण नंतर त्यांना पोलीस कारवाईची भीती सतावू लागली.
 
जुगराज सध्या बेपत्ता आहे आणि त्याचे आई-वडीलही गावातलं घर सोडून गेलेत. पोलीस आणि मीडियाच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माघारी राहिलेत फक्त त्याचे म्हातारे आजी-आजोबा.
 
पंजाबमधल्या तरनतारन जिल्ह्यातल्या एका गावातला 23 वर्षांचा जुगराज यानेच 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडकवला होता.
 
तुमच्या नातवाने लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडकावला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं जुगराजच्या आजोबांना विचारलं असता ते म्हणाले, "खूप छान वाटतंय. ही तर गुरुंची मेहरबानी आहे."
 
जुगराज खूपच चांगला मुलगा असल्याचं त्याचे आजोबा सांगातात. जे काही घडलं ते कसं घडलं, याची आपल्याला काहीच कल्पना नसली तरी जुगराज कधीच चुकीचं वागला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
26 जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान काही आंदोलक शेतकरी लाल किल्ल्यात घुसले आणि शिखांचा पारंपरिक ध्वज असलेला 'निशान साहिब' फडकावला.
 
तेव्हापासूनच पोलीस जुगराजसह अनेकांचा शोध घेत आहे. लाल किल्ल्यावर जो हिंसाचार झाला त्यावर शेतकरी नेत्यांनीही टीका केली. 'रॅलीत काही असामाजिक घटक शिरल्याचं' त्यांचं म्हणणं आहे.
 
या संपूर्ण घटनाक्रमामुळे तिरंग्याचा अपमान झाल्याचं सत्ताधारी भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.
 
या घटनेनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, "दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची करू तेवढा निषेध कमी आहे. लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला आणि हा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही."
 
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही या घटनेचा निषेध करत केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास करून दोषींना शिक्षा करावी, असं म्हटलेलं आहे.
 
मात्र, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना त्रास देता कामा नये, असंही ते म्हणाले.
 
सोशल मीडियावरही काही लोक हा तिरंग्याचा अपमान असल्याच्या पोस्ट करत आहेत.
 
दुसरीकडे संयुक्त किसान मोर्चाने एक प्रेस नोट प्रसिद्ध करत सरकारवरच हिंसाचार घडवल्याचा आरोप केला आहे. लाल किल्ला आणि दिल्लीतल्या इतर भागात झालेल्या कुठल्याच हिंसाचाराशी आपला काडीचाही संबंध नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे, "आतापर्यंत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होतं. मात्र, या आंदोलनाला बदनाम करण्याचं षडयंत्र आता जनतेसमोर उघड झालं आहे. काही व्यक्ती आणि संघटनांच्या मदतीने या आंदोलनाला हिंसक वळण लावण्यात आलं."
 
प्रेस नोटमध्ये दीप सिद्धू आणि सतनाम सिंह पन्नू यांच्या नेतृत्त्वाखालील किसान मजदूर समितीचं नाव प्रामुख्याने घेण्यात आलं आहे.
 
जुगराजच्या गावातील परिस्थिती

पोलिसांनी अनेकदाा जुगराजच्या घरी छापेमारी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
 
एक तरुण लाल किल्ल्यावर निशाण साहीब फडकवताना आम्ही टीव्हीवर बघितल्याचं जुगराजच्या घरासमोरच बसलेले प्रेम सिंह यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, "लाल किल्ल्यावर घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण तो एक चांगला मुलगा आहे आणि 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर अशाप्रकारे झेंडा फडकवल्यामुळे काय घडू शकतं, याची त्याला कल्पना नव्हती. मी टीव्हीवर बघितलं की अनेकांनी खालसा झेंडा आपल्यासोबत ठेवला होता. त्यातल्याच कुणीतरी जुगराजच्या हातात झेंडा दिला आणि त्याने तो फडकावला."
 
कौटुंबिक पार्श्वभूमी

जुगराज सुस्वभावी आणि मेहनती तरुण असल्याचं बुहतेक गावकऱ्यांचं म्हणणं आहे. 23-24 तारखेला जुगराज इतर काही लोकांसोबत दिल्लीला रवाना झाल्याचं गावातलेच जगजीत सिंह सांगतात.
 
जुगराजच्या कुटुंबाकडे फक्त 2-3 एकर जमीन आहे आणि त्यांच्यावर बरंच कर्जही आहे, असं ग्रामस्थ सांगतात. गावातल्याच इतर तरुणांसोबत जुगराज वर्षातले काही महिने चेन्नईतल्या एका कारखान्यात काम करायचा.
 
जुगराजला तीन बहिणी आहेत. त्यापैकी दोघींचं लग्न झालंय. जगजित सिंह म्हणतात, "तो मनमिळावू आणि शरीराने धडधाकट मुलगा होता. कुणीतरी त्याला हे करायला सांगितलं आणि त्याने याच्या परिणामाचा विचारच केला नाही."
 
या आंदोलनामागे परदेशी फंडिंग असल्याचे आरोप निराधार असल्याचं गावकरी म्हणतात. या आरोपांची सहज शहानिशा केली जाऊ शकते, असं गावकरी सांगतात.
 
याविषयी तरनतारनच्या पोलीस अधीक्षकांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणातली एफआयआर तरनतारणमध्ये दाखल झालेली नाही, त्यामुळे याविषयावर आपण काही बोलू शकत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
शेतकरी आंदोलन

तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी 26 जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीची परवानगी मागितली होती.
 
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी एका विशिष्ट मार्गावरूनच रॅली काढण्याची परवानगी दिली होती. मात्र, 26 जानेवारी रोजी आंदोलक शेतकरी दिल्लीच्या अनेक भागात घुसले आणि अनेक ठिकाणी दिल्ली पोलिसांसोबत त्यांची झडप झाली.
 
अशातच काही आंदोलक लाल किल्ल्यात दाखल झाले आणि तिथे निशाण साहिब हा शिखांचा झेंडा फडकवला. या प्रकरणात पोलीस अभिनेते दीप सिद्धू याचाही शोध घेत आहेत. त्यांनीच आंदोलकांची माथी भडकवली, असे आरोप होत आहेत.
 
या प्रकरणात अनेक शेतकरी नेत्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांच्या हल्ल्यात जवळपास 400 पोलीस जखमी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर एका आंदोलकाचाही मृत्यू झालाय.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पारूल परमार : जागतिक पॅरा बॅडमिंटनची राणी