Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेस्ट इंडिज दौरा: टीम इंडियाची धुरा विराट कोहली कडेच, धोनीची माघार, चहर बंधूंना संधी

वेस्ट इंडिज दौरा: टीम इंडियाची धुरा विराट कोहली कडेच, धोनीची माघार, चहर बंधूंना संधी
3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज करण्यात आली.
 
रविवारी दुपारी दोन वाजता भारतीय क्रिकेट निवड समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा केली.
 
भारतीय संघ वेस्टइंडिजमध्ये तीन टी-20, तीन एकदिवसीय तर दोन कसोटी सामने खेळणार आहे. 3 ऑगस्ट रोजी सुरू होणारी ही मालिका 3 सप्टेंबरपर्यंत चालेल.
 
युवा खेळाडूंना संधी ही या संघनिवडीचे वैशिष्ट्य आहे.
 
क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताची हा पहिलीच क्रिकेट मालिका आहे. आगामी काळात होणाऱ्या विश्वचषक टी-20 स्पर्धेवर नजर ठेवून भारतीय संघाची निवड करण्यात आल्याचं दिसून येत आहे.
 
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलपर्यंतचा पल्ला गाठून भारतीय संघ दुर्दैवाने बाहेर पडला. त्यामुळे विराट कोहलीचं मर्यादित षटकांच्या स्वरूपातील सामन्यांचं कर्णधारपद काढून ते रोहित शर्माला देण्यात यावं, अशी चर्चा माध्यमातून तसंच सोशल मीडियावर रंगू लागली होती.
 
मात्र, वेस्ट इंडिज दौऱ्यातील तिन्ही स्वरूपातील क्रिकेट मालिकांमध्ये विराट कोहलीच्याच नेतृत्वावर निवड समितीने विश्वास दाखवला आहे. याशिवाय भारतीय संघात नेतृत्वबदल होण्याच्या शक्यतेलाही यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
 
अय्यर, सुंदर आणि चहर बंधूंची निवड
वेस्ट इंडिज दौऱ्यात युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्याचं धोरण बीसीसीआयने अवलंबलं आहे. त्यानुसार टी-20 मालिकेसाठी नवोदित वॉशिंग्टन सुंदर, आयपीएलमध्ये दिमाखदार कामगिरी करणारे राहुल आणि दीपक हे चहर बंधू, खलील अहमद आणि नवदीप सैनी यांची निवड करण्यात आली आहे.
 
अलील अहमद आणि नवदीप सैनी यांचा समावेश एकदिवसीय संघातही करण्यात आला आहे. त्याशिवाय श्रेयस अय्यर मनीष पांडे यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तसंच ऋषभ पंत, के. एल. राहुल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांनाही निवड समितीने पुन्हा संधी दिली आहे.
 
कसोटी मालिकेसाठी मयांक अगरवाल, के. एल. राहुल, हनुमा विहारी, ऋषभ पंत, कुलदीप यादव यांना संधी मिळाली आहे. एकूणच ज्येष्ठ खेळाडूंसोबतचा समतोल राखत या सर्व खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यातील कोणकोणत्या खेळाडूंना अंतिम संघात संधी मिळते याची उत्सुकता आहे.
 
शिखर धवनचं पुनरागमन, हार्दिक पांड्याला विश्रांती
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीचे काही सामने खेळल्यानंतर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडलेला शिखर धवन या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल. धवनचा समावेश टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी करण्यात आला असला तरी त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
 
हार्दिक पांड्याला संपूर्ण दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तसंच महेद्रसिंह धोनीने दोन महिने स्वतःहून विश्रांती घेतल्यामुळे त्याला वगळण्यात आलं आहे. तर जसप्रीत बुमराह याला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देत फक्त कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
 
रोहित शर्माचा तिन्ही संघात समावेश
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तुफान कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला यावेळी तिन्ही संघात स्थान देण्यात आले आहे. एकदिवसीय आणि टी-20 मालिकांच्या तुलनेत कसोटी मालिकेत रोहित शर्माची कामगिरी अपेक्षेनुसार होत नाही. त्यामुळे यापूर्वी रोहित शर्माला कसोटी संघातून वारंवार आत-बाहेर करण्यात येत होतं. यावेळी त्याच्या कसोटी मालिकेतील कामगिरीकडे सर्वांच लक्ष असणार आहे.
 
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत(विकेटकीपर), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.
 
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत(विकेटकीपर), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.
 
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अगरवाल, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत(विकेटकीपर), ऋद्धीमान साहा(विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.
 
असा असेल वेस्टइंडीज दौरा -
 
टी-20 मालिका -
पहिला टी-20 सामना - 3 ऑगस्ट 2019, रात्री 8 वाजता, फ्लोरिडा.
दुसरा टी-20 सामना - 4 ऑगस्ट 2019, रात्री 8 वाजता, फ्लोरिडा.
तिसरा टी-20 सामना - 6 ऑगस्ट 2019 रात्री 8 वाजता, गयाना.
 
एकदिवसीय मालिका -
पहिला एकदिवसीय सामना - 8 ऑगस्ट 2019, संध्याकाळी 7 वाजता, गयाना.
दूसरा एकदिवसीय सामना - 11 ऑगस्ट 2019, संध्याकाळी 7 वाजता, त्रिनिदाद.
तीसरा एकदिवसीय सामना - 14 ऑगस्ट 2019, संध्याकाळी 7 वाजता, त्रिनिदाद.
 
कसोटी मालिका -
पहिला कसोटी सामना - 22 ते 26 ऑगस्ट, संध्याकाळी 7:00, अँटिग्वा.
दुसरा कसोटी सामना - 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, रात्री 8:00, जमैका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डी. राजाः CPIच्या सरचिटणीसपदी पहिल्यांदाच दलित व्यक्तीची नेमणूक