भूमिका राय
''ज्यांना भीती वाटत आहे ते पक्ष सोडून जाऊ शकतात. असे अनेक नीडर नेते आहेत, जे काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांनी पक्षात यायला हवं आणि भाजपला घाबरलेल्या काँग्रेस नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. संघाच्या विचारसरणीवर विश्वास असलेल्यांची आपल्याला गरज नाही. ही आपली विचारसरणी आहे.''
राहुल गांधी यांनी 16 जुलै 2021 रोजी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केलं होतं.
तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसमध्ये अनेक बदलही पाहायला मिळाले आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणं.
चरणजित सिंग चन्नी यांचं मुख्यमंत्री बनणं.
बिहारचे माकपमधील माजी नेते कन्हैय्या कुमार यांचा काँग्रेस प्रवेश
गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणींचा काँग्रेस प्रवेश
राजस्थानात सत्ता हस्स्तांतरणावर मौन
छत्तीसगडमधील पक्षांतर्गत वाद
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जाहीरपणे समोर येणारी नाराजी
काँग्रेसमधील हे बदल राहुल गांधी यांच्या विचारसरणीचा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे.
'नेतृत्व'हीन काँग्रेस आणि निर्णय घेणारे राहुल गांधी
राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाहीत. हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आहेत. पक्षामधील प्रत्येक बदल, वादानंतर प्रत्येक गटाचे नेते राहुल गांधींना भेटल्यानंतरच अंतिम निर्णय घेत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी या मुद्द्यावरून नाराजीही व्यक्त केली होती.
"काँग्रेसमध्ये सध्या निवडून आलेला अध्यक्ष नाही. निर्णय कोण घेत आहे, हे आम्हाला माहिती नाही," असं त्यांनी म्हटलं होतं.
कपिल सिब्बल यांनी थेट नेत्याचं नाव घेतलं नसलं तरी, गेल्या काही दिवसांतील घटना पाहता, 'निवडून आलेला अध्यक्ष नसलेल्या काँग्रेस पक्षातील अतंर्गत निर्णय' कोण घेत आहे, हे अगदी स्पष्टच आहे.
जिग्नेश मेवाणी आणि कन्हैया कुमार यांच्या पक्ष प्रवेशादरम्यान राहुल गांधी उपस्थित होते.
अध्यक्ष पदाचा राजीमाना दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्यात, कायम राहुल गांधी आणि प्रियंका गांधीच्या साथीनं उभं राहणार असल्याचं म्हटलं.
सचिन पायलट गेल्या महिन्यात 10 दिवसांत तीन वेळा राहुल गांधींना भेटायला पोहोचले.
त्याशिवाय 24 ऑगस्टला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राज्याचे आरोग्यमंत्री टीएस सिंह देव हेदेखील वाद सोडवण्यासाठी राहुल गांधींनाच भेटायला पोहोचले होते.
त्यामुळं पक्षाचे अध्यक्ष नसतानादेखील राहुल गांधी तीच भूमिका निभावत असल्याचं लक्षात येणं फार काही कठीण नाही. मग राहुल गांधी काँग्रेसचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवाल उपस्थित होतो.
बदलाचा मुद्दा
राहुल गांधी हे निश्चितपणे काँग्रेसमध्ये बदलासाठी प्रयत्न करत असल्याचं, काँग्रेसचं राजकारण जवळून अनुभवलेले वरिष्ठ पत्रकार रशीद किदवई यांनी म्हटलं.
"राहुल गांधी यांनी जानेवारी 2014 मध्येच जयपूरमध्ये पक्षातील बदलांचे संकेत दिले होते. त्यावेळी त्यांच्यावर पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. मला काँग्रेसचं मुल्यांकन करायचं आहे, असंही राहुल गांधी एका भाषणात म्हणाले होते," असं किदवई सांगतात.
"काँग्रेस पक्षामध्ये दोन प्रकारच्या नेत्यांची संख्या प्रचंड आहे. पहिले असे जे कायम, आपण निष्ठावान असल्याचा सूर आळवत असतात आणि दुसरे म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात फारसे यशस्वी नसलेले. काँग्रेसची वर्किंग कमिटी पाहता, त्यातील बहुतांश सदस्य लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नाहीत.
2014 आणि 2019 मध्येच त्याचा पुरावाही मिळाला. त्यामुळं राहुल गांधींना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पण ते सुरुवातीपासूनच बाहेरच्या लोकांना अधिक महत्त्व देत आलेले आहेत," असं किदवई म्हणतात.
राहुल गांधी पक्षामध्ये बदल आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नव्या चेहऱ्यांना आणि विशेषतः पक्ष महिलांना प्रोत्साहन देत आहे. ज्यांची राजकीय पार्श्वभूमी नसेल अशांनाही संधी दिली जात आहे, असं पक्षाच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी म्हटलं.
त्याचवेळी "प्रत्येक पक्षात काही वाद होत असतात. बदल केले की, काही वाद तर होणारच. भाजपमध्येही हे घडलं होतं. ही कोणत्याही पक्षासाठी अत्यंत सर्वसामान्य बाब आहे. आमच्या पक्षात लोकशाही आहे आणि त्यामुळंच लोक नाराजीही व्यक्त करू शकतात," असं मत त्यांनी नेत्यांच्या नाराजीबाबत व्यक्त केलं.
ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुप्ता यांनीही राहुल गांधींना पक्षात बदल करायचे असून ते करतही आहेत असं म्हटलं आहे. विशेषतः ते नव्या पिढीला संधी देत असल्याचंही त्या म्हणाल्या.
"राहुल गांधी यांची जुन्या पिढीच्या जागी नवीन पिढीला समोर आणण्याची इच्छा असल्याचं स्पष्ट आहे. कारण अमरिंदर सिंग यांना हटवण्यासाठी दुसरं काहीही कारण नव्हतं. अमरिंदर सिंग काँग्रेसचे यशस्वी नेते होते. राहुल गांधी यांना राजकाणातील पिढीत बदल घडवून आणायचा आहे हे स्पष्ट दिसत आहे," असं त्या म्हणाल्या.
मात्र एकीकडं राहुल गांधी नव्या पिढीला संधी देण्याचा प्रयत्न करत असतानाच, अनेक नवे चेहरे गेल्या काही दिवसांत काँग्रेस सोडूनही गेले आहेत. ही बाब विसरता कामा नये, असंही स्मिता म्हणाल्या.
तसंच राहुल गांधी संभ्रमात असल्याचंही जाणवत असल्याचं, त्या म्हणाल्या.
"काहीजण राहुल गांधी यांच्या या निर्णयांची तुलना इंदिरा गांधींच्या निर्णयांशी करत आहेत. मात्र, इंदिरा गांधी त्यावेळी सत्तेत होत्या हे लक्षात घ्यायला हवं. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसंदर्भात जे बदल केले होते, ते वैचारिक आधारावर होते.
मात्र राहुल गांधींचा विचार करता, त्यांचे फारसे मतभेद दिसत नाहीत. कारण राहुलला आदर्शवादी म्हटलं जाऊ शकतं, मात्र वैचारिकदृष्ट्या त्यांचे मुद्दे कितकी स्पष्ट आहेत, हे लक्षात येत नाही," असं स्मिता म्हणाल्या.
ज्येष्ठ नेत्यांची नाराजी
काँग्रेसमधील एक गट गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमानं अस्वस्थ आहे. त्यापैकी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाराजीही जाहीर केली आहे.
जी 23 (सोनिया गांधींना पत्र लिहिणारे काँग्रेसचे 23 नेते) चे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असल्याचा दावा रशीद किदवई यांनी केला आहे.
"ते बोलतात वेगळं आणि करतात वेगळंच. काँग्रेस फोरमवर एखादा मुद्दा उपस्थित केला असता सगळ्यांच्या सहमतीनं सोनिया गांधींना हवा तो निर्णय त्यांनी घ्यावा असं सांगितलं जातं. मात्र, बाहेर आल्यानंतर ते वेगळंच बोलतात," असं ते सांगतात.
सोनिया गांधींना जी23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख किदवईंनी केला. या नेत्यांना काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देण्याचाही अधिकार आहे. मात्र त्यांनी अद्याप त्यचा वापर केलेला नाही, असं ते म्हणाले.
पक्षाची जी मोठी आणि महत्त्वाची पदं आहेत, त्यांच्या निर्णय प्रक्रियेत आपण स्वतः राहावं असं जी23 नेत्यांना वाटतं. पण प्रत्यक्षात तसं घडत नसल्यानं त्यांचा आटापीटा होत असल्याचं, किदवई सांगतात.
"राहुल गांधींना पक्षातलं कोणीतरी, त्यांच्या आजीबरोबर काम केल्याचं सागतं. कुणीतरी वडिलांबरोबर काम केल्याचं सांगतं तर दुसरं कुणी राहुल यांना त्यांच्या आईबरोबर आपण काम केलं आहे असं सांगतं. त्यामुंळ अशा काका-मामांमध्ये अडकलेल्या राहुल गांधी यांना त्यांच्या पद्धतीचं राजाकारण करण्याची संधी मिळेनासी झाली आहे. त्याचीच त्यांना चीड आहे."
राहुल गांधींचे प्रयत्न
राहुल गांधी यांना काँग्रेस पक्ष पक्षातील नेत्यांच्या पद किंवा उंचीनुसार नव्हे तर लोकशाही पद्धतीनं पुढं न्यायचा असल्याचं किदवई सांगतात.
"राहुल गांधी आधीदेखील लोकशाही पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची निवड करण्याच्या मताचे होते. मात्र त्यातही अडचणी आल्या. मध्य प्रदेशात त्यांनी लोकशाही पद्धतीच्या आधारे कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवलं, पण त्यामुळं सिंधिया नाराज झाले. त्यांनी पक्ष सोडला आणि राज्यातली सत्ताही काँग्रेसच्या हातून निसटली. राजस्थान आणि पंजाबमध्येही अशीच स्थिती आहे," असं ते म्हणतात.
अस्पष्ट भूमिका
मात्र, राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांतील निर्णय लोकशाही पद्धतीनुसार घेतले आहे, असं वाटत नसल्याचं स्मिता गुप्ता यांनी म्हटलं आहे.
"जाहीरपणे म्हटलं जात नसलं तरी, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष गांधी कुटुंबातीलच असावा, असं पक्षातील सर्वांना वाटतं. राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्यातही आलं होतं. पण तुम्ही स्वतःच पद सोडलं. तुमच्या नेतृत्वात पक्ष दोन लोकसभा निवडणुकांत पराभूत झाला. तरीही त्यांना अध्यक्षपद घ्यावं असं सांगितलं जात आहे. मात्र ते स्वतःदेखील अध्यक्ष बनत नाहीत, शिवाय कोणाला बनूही देत नाहीत. मात्र निर्णय सगळे तेच घेत आहेत. तुम्ही अध्यक्ष नाहीत, तर मग सर्व निर्णय का घेत आहात," असं त्या म्हणाल्या.
राहुल गांधी जे काही करत आहेत, ते काँग्रेसच्या भल्यासाठी करत आहेत यात काहीही शंका नाही. मात्र त्यापूर्वी त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करायला हवी, असं किदवई यांचं मत आहे.
"राहुल गांधी अध्यक्ष नसूनही निर्णय कोणत्या अधिकारानं घेत आहेत, हा अगदी योग्य मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हा जर गांधी कुटुंबाचा वारसा असेल तर ते अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी मागं पुढं का करत आहेत, हा मुद्दा समजण्यापलिकडचा आहे. जर त्यांनी अध्यक्षपद स्वीकारून निर्णय घेतले तर, त्याला अधिक किंमत असेल," असं ते म्हणाले.
राहुल गांधींच्या भूमिकेबाबतच्या या मुद्द्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा यांनी भाजपकडे बोट दाखवलं. "जेपी नड्डा कोणत्या पक्षाचे अध्यक्ष आहेत? पण निर्णय कोण घेतं? अमित शाह," असं त्या म्हणाल्या.
शमा या प्रकरणी माध्यमांवर आरोप करतात. सर्वकाही माध्यमांनी पसरवलेलं आहे. सोनिया गांधींना प्रत्येक गोष्टीची माहिती असते. त्यांना मदत करण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत, असं त्या म्हणाल्या.
संजय गांधींच्या पावलावर पाऊल
संजय गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात कांग्रेसमध्ये पूर्णपणे बदल केले होते. राहुल गांधीदेखील सध्या तसंच काहीतरी करत असल्याचं दिसत आहे.
त्यांच्या काकांनी बदल केले होते. मात्र तेव्हा काँग्रेसची सत्ता होती आणि आता सत्ता नाही, हा मोठा फरक असल्याचं किदवई म्हणतात.
"युवराज म्हणून एखाद्याला गादी मिळताना पक्षाची सत्ता असणं गरजेचं असतं. इंदिरा गांधींनी संजय गांधींना पद सोपवलं होतं, तेव्हा त्या सत्तेत होत्या. मात्र, राहुल यांच्या काळात परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. त्यामुळंच राहुल गांधींसमोरची आव्हानंही अधिक आहेत," असं ते म्हणतात.
राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांत घेतेलेले निर्णय पक्षाचं धोरण म्हणून अत्यंत योग्य आहेत. मात्र त्याचे परिणाम लगेचच पाहायला मिळणार नाहीत, असं मत स्मिता गुप्ता यांनी मांडलं.
पक्षात कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणीचा समावेश हे चांगले निर्णय ठरू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना त्यांचं राजकारण करण्याची संधी मिळणं गरजेचं असल्याचं त्या म्हणतात.
"पंजाबमध्ये चरणजीत सिंग चन्नी यांच्या रुपानं काँग्रेसनं पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री दिला आहे. मात्र, चन्नी हे मोठं नाव नाही. राज्यात काही महिन्यांत निवडणुका आहेत. त्यामुळं चन्नी यांच्याकडं कमी वेळ आहे. शिवाय काँग्रेसला दलितांची मत हवी असतील, तर त्यांनी सत्तेत राहणं गरजेचं आहे. कारण सत्तेत असल्याशिवाय तुम्ही एखाद्या वर्गासाठी काहीतरी विशेष काम करू शकणार नाहीत. मात्र चन्नी यांच्याकडं केवळ काही महिने असल्यानं, हा निर्णय किती योग्य ठरणार, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्षष्ट होईल," असंही स्मिता गुप्ता म्हणाल्या.