Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

LGBT: एका Transmanची गोष्ट; मी आधी बुरखा घालायचो आता लुंगी नेसतो...

LGBT: एका Transmanची गोष्ट; मी आधी बुरखा घालायचो आता लुंगी नेसतो...
, शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (20:07 IST)
फामेगा स्याविरा पुत्री,
अमर अल्फिकार या तीस वर्षीय व्यक्तीचा जन्म धार्मिक मुस्लीम कुटुंबात मुलगी म्हणून झाला. त्याचे वडील इस्लामी शाळेत उलेमा होते आणि त्यांच्या समुदायात त्यांना आदराचं स्थान होतं.
 
पण अमरला अस्वस्थ वाटत होतं. आपण स्त्री आहोत, अशी भावना त्याच्या मनात नव्हती. अनेक वर्षं अस्वस्थतेत काढल्यानंतर अमरने पुरुषाचं रूप स्वीकारायचं ठरवलं. 'आई, मी मुलगी नाहीये आणि मला मुलग्यांविषयी आवड वाटू शकत नाही,' असं अमरने त्याच्या आईला सांगितलं.
 
अमर या लैंगिक स्थित्यंतराचे अनुभव सांगतो, आणि आपल्या या स्थित्यंतरामध्ये त्याने त्याच्या कुटुंबीयांना व समुदायाला कसं सहभागी करून घेतलं, बुरख्यापासून दाढी वाढवण्यापर्यंतचा त्याचा प्रवास कसा झाला, हे तो सांगत असतो. शिवाय, त्याच्या धर्मामध्ये, इस्लाममध्ये ट्रान्समॅन म्हणून किंवा लिंगबदल केलेला पुरुष म्हणून तो स्वतःचं स्थान कसं शोधू पाहतोय, याचीही कहाणी तो सांगतो.
 
बीबीसी इंडोनेशियाचे पत्रकार फामेगा स्याविरा पुत्री आणि द्विकी मार्ता अमरला इंडोनेशियातील सेंट्रल जावामधील केंडाल या लहानशा शहरामध्ये त्याच्या आईवडिलांच्या घरी आणि त्यांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये भेटले.
 
अमरची स्थिती पहिल्यांदा स्वीकारणारे त्याचे आईवडील आता मरण पावले आहेत. अमरचा मोठा भाऊ अब्दुल मुईल याने आम्हाला सांगितलं की, त्याने अमरला बदलण्याचा प्रयत्न अनेक वर्षं केला आणि आता अखेर त्याच्या भावाला स्वीकारण्यात आलं आहे.
 
अमरनं बीबीसीला त्याची कहाणी सांगितली -
 
माझं नाव अमर अल्फिकार. मी ट्रान्समॅन आहे.
 
लहान असतानापासून मला मी वेगळा आहे असं वाटत असे. मला कसं वाटतंय हे सांगता यायचं नाही. मला मुलगी का समजलं जातंय, असं मला लहान असताना वाटायचं. मला स्वतःला मी मुलगी आहे असं वाटत नसे.
मी लहानच होतो त्यामुळे हे काय आहे याची मला कल्पना नव्हती. मी टॉमबॉय आहे, आणि हळूहळू हे बदलेल, असं लोक म्हणायचे. पण तसं झालं नाही. मी मुलगी नाहीये, अशीच भावना माझ्या मनात अधिकाधिक दृढ होत गेली.
 
मी अनेकदा मानसोपचारतज्ज्ञांकडे गेलो आणि माझ्यात लिंगभावाविषयी अस्वस्थतेची भावना आहे, असं निदान त्यांनी केलं. मी जैविकदृष्ट्या स्त्री म्हणून जन्माला आलो असलो, तरी माजी लिंगभावात्मक जाणीव पुरुषाची होती.
 
पहिल्यांदा मी एका मानसोपचारतज्ज्ञाकडे गेलो, कारण मला हे सगळं सहन होत नव्हतं. माझ्या मदरश्यात मला बुरखा घालावा लागत होता. त्यामुळे स्त्रीत्वाविषयीच्या माझ्या भावना आणखी क्लेशकारक होत होत्या.
 
मला असं व्हायचं नव्हतं. स्वतःशीच संघर्ष करावं लागणारी स्थिती कोणालाच आवडत नाही.
 
ट्रान्समॅन असणं म्हणजे पुरुष व्हावंसं वाटण्यापुरतंच मर्यादित नाही. यात आपण स्वतःचं स्वातंत्र्य निवडत असतो, स्वतःचं जगणं निवडत असतो, स्वतःच्या तिरस्कारापासून मुक्त होत असतो.
 
ट्रान्समॅन म्हणून माझी अशी पूर्ण श्रद्धा आहे की, अल्लाने मला दिलेल्या नियतीचाच हा भाग आहे. आपण नियतीनुसार जगत असतो, असं मला वाटतं.
मी एक तप स्त्री म्हणून जगत आलो. पण आपल्या अंतरात्म्याशी खोटं बोलता येणार नाही. मी पुरुष आहे. माझं शरीर, माझी जाणीव, माझा अंतरात्मा, हे सगळं पुरुषाचं आहे.
 
मी काही वेळ स्वतःला इजा पोचवायचाही प्रयत्न केला, रेझर ब्लेडने मी स्वतःला जखमही करून घेतली होती.
 
आपल्या समाजामध्ये भिन्न लिंगभाव व लैंगिकता असलेल्या लोकांकडे विकृत म्हणून पाहिलं जातं. कदाचित याच कारणामुळे मी स्वतःला इजा पोहोचवली असेल. अशा सामजिक धारणांमुळे मी स्वतःचा तिरस्कार करायला लागलो आणि मी 'विकृत' असल्यामुळे मी कोणताही आदर मिळण्यास पात्र नाही, असं मला मनातून वाटलं असावं.
 
मी स्वतःचा आणि स्वतःच्या जगण्याचा तिरस्कार करू लागलो होतो.
 
2012 साली मी माझ्या आईसोबत हजला गेलो. 'अल्लाह, मी खरोखरचा कोण आहे, ते मला दाखवून दे, कारण मी स्वतःला ओळखू शकत नाहीये आणि याचा खूप त्रास होतोय,' अशी प्रार्थना मी हजमध्ये केली.
हजवरून परत आल्यानंतर मला स्त्री मानलं जाण्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता वाढू लागली. मला मला असं खोटं जगता येत नव्हतं.
 
माझ्या आजोबांनी 1973 साली हे इस्लामी बोर्डिंग स्कूल सुरू केलं आणि माझे आईवडील त्याचं व्यवस्थापन पुढेही बघत होते. मी जन्माला आल्यापासून या इस्लामी बोर्डिंग स्कूलमध्ये राहिलो. माझं शिक्षण इस्लामी शाळेत झालं. मी माझं बहुतांश आयुष्य इस्लामी शाळेच्या वातावरणात अभ्यास करत घालवलं. मी दररोज कुराणपठण करायचो, इस्लामी पुस्तकं वाचायचो, आणि प्रार्थनेचे इतर सोपस्कारही पार पाडायचो.
 
सर्वसाधारणतः ट्रान्सजेंडर लोकांनी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या लैंगिकतेविषयी माहिती दिल्यावर त्यांना कुटुंबातून बाहेर काढलं जातं. माझे आईवडीलसुद्धा माझा तिरस्कार करायला लागतील, अशी मला शंका होती.
 
पण मी माझ्या आईला याबद्दल सांगितलं, तेव्हा आमच्या कुटुंबातील याचा स्वीकार करणारी ती पहिली व्यक्ती होती.
"आई, मी बाई नाहीये, आणि मला पुरुष आवडू शकत नाहीत. मला बायकांच्या कपड्यांमध्ये बरं वाटत नाही, मला बाई म्हणून घेणं बरं वाटत नाही," असं मी माझ्या आईला सांगितलं.
 
माझी आई अर्थातच गोंधळली. "म्हणजे काय? तू मुलगीच आहेस की." मी म्हणालो, "पण मला मुलीसारखं वाटत नाही."
 
माझ्या या गोंधळाच्या दरम्यान आईने ही वस्तुस्थिती स्वीकारली. माझ्यासाठी हा निर्णायक क्षण होता. मी आधीच घर सोडून जाण्यासाठी सामानाची आवराआवर केली होती. पण 'कधीही घर सोडून जाऊ नकोस, तू अजूनही आमचं मूल आहेस' असं आई म्हणाली, त्यामुळे मी स्वतःला सावरलं.
 
आईने मला मिठी मारली आणि म्हणाली, "मला तू अधिकाधिक आवडतेच आहेस."
 
इस्लाममध्ये ट्रान्सजेंडर लोकांना नाकारलेलं आहे, ट्रान्सजेंडर लोक नरकात जातात, ती ईश्वराच्या प्रेमास पात्र नसतात आणि त्यांना चांगलं वागवताही कामा नये, अशा धार्मिक कथनांवर मी लिंगबदलापूर्वी विश्वास ठेवत होतो.
 
मी इस्लामी बोर्डिंग स्कूलमध्ये वाढलो असलो, तरी अल्लाच्या अस्तित्वावर व त्याच्या कृपेवर मला कायमच शंका वाटत असे.
 
परंतु, माझं लैंगिक स्थित्यंतर होत असताना अल्ला खूप जवळ आहे, असं मला वाटत होतं. माझ्या आईवडिलांनी हे स्वीकारल्यामुळे मला जीवनातील ईश्वराची थोरवी कळली. यामुळे मला स्वतःच्या इस्लामविषयी अधिक शिकायला मिळालं.
 
लिंगबदलानंतर मी स्वतःला कधीही इजा पोचवली नाही. उलट आता मी स्वतःच्या शरीराची अधिक काळजी घेऊ लागलो आहे.
 
माझा भाऊ मुईस आधी माझा खूप तिरस्कार करायचा. मी जे काही केलं ते चुकीचं आहे आणि पापी कृत्य आहे, असं तो म्हणत असे. 'तू एका उपदेशकाचा मुलगा आहे, आपलं इस्लामी बोर्डिंग स्कूल आहे, तू आपल्या प्रतिमेची काळजी घ्यायला हवीस,' असं तो म्हणायचा.
अब्दुल मुईस
अमरचा मोठा भाऊ अब्दुल मुईस त्यांचे आईवडील वारल्यानंतर आता त्यांचं इस्लामी बोर्डिंग स्कूल चालवतो. सुरुवातीला तो खूप चिडला होता आणि अमरच्या लिंगबदलाविरोधात होता.
"अमरने त्याचा हिजाब काढण्याचं धाडस केलं, तेव्हा मी खूप चिडलो. तू इस्लामी धार्मिक शिकवणुकीविरोधात जातोयंस असं मी त्याला म्हटलं. मी दोन वर्षं त्याला ओरडत होतो," असं अब्दुल मुईस केंदालमधील त्यांच्या घरी सांगतात.
 
"मला त्याला बदलवायचं होतं. मी त्याच्यासाठी प्रार्थना करायचो. मी त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन गेलो होतो. आम्ही सुरुवातीला सगळं काही केलं. त्याने बदलायला हवं, असा तगादा मी त्याच्या पाठी लावायचो," असं अब्दुल सांगतात.
 
याबाबतीत स्वीकाराची प्रक्रिया दीर्घ आणि भावनिकदृष्ट्या थकवणारी असते. मुईस सांगतात, "सुरुवातीला खूप ताण यायचा. पण मी त्याला स्वीकारलं, किंबहुना आता मला त्याचा अभिमान वाटतो."
 
"आमचे आईवडील धार्मिक शिक्षक असले तरी त्यांनी त्याला चांगल्या तऱ्हेने समजून घेतलं आणि हे खूप मोठं आव्हान होतं," असं ते म्हणतात.
अमर लहानपणापासूनच कसा टॉमबॉय होता, याची आठवण मुईस सांगतात.
 
"अमर लहान असल्यापासून कायमच हाफपॅंट घालायचा. आमच्या वडिलांनी त्याच्यासाठी बाहुल्या आणल्या, पण त्याला कधीच त्यांच्याशी खेळायला आवडायचं नाही. तो लहान असताना त्याला कार, रोबोट आणि बंदुका आवडायच्या," असं मुईस म्हणतात.
 
"तो लहान असल्यापासून मी त्याला ओळखतो आहे, त्यामुळे त्याचा हा कल वातावरणामुळे निर्माण झालेला नाही, हे मी सांगू शकतो."
 
अमर आपल्या लिंगबदलाच्या प्रक्रियेबद्दलही सांगतो. तो म्हणाला,
 
अनेक लोकांनी माझ्या लिंगबदलाला विरोध केला आणि "तू अल्लाच्या नियतीचं उल्लंघन केलं आहे, तू नरकात जाशील," असं मला लोक म्हणाले.
 
लिंगबदलाचा पर्याय निवडणं संघर्षाचं असेल, त्यातून टिंगल केली जाईल आणि ईश्वरनिंदेचे आरोप होतील, याची मला कल्पना होती. पण माझ्या आईवडिलांना इतरांचा तिरस्कार सहन करावा लागला, तो क्षण माझ्यासाठी सर्वाधिक अवघड होता.
 
पण ते या परिस्थितीला अगदी साथेपणाने व नम्रपणाने सामोरे गेले. माझा लिंगबदल होत होता, तेव्हा वडील कायम माझ्यासोबत येत असत. ते धार्मिक उपदेश करतात, व्याख्यानं देतात,
विद्यार्थ्यांना भेटतात, तेव्हा ते आत्मविश्वासाने बोलतात आणि माझ्याबद्दल त्यांना तिथे शरमल्यासारखं होत नाही.
 
मला जे काही झालं ते मुळात ईश्वराने घडवलं. मी जो काही आहे ते अल्लामुळे आहे आणि अल्ला चुकीचा असू शकत नाही.
 
मी पुढे जाऊन माझं आयुष्य सार्थकी लावू शकतो आणि एकूण ट्रान्सजेन्डर समुदायासाठी काम करू शकतो, हीच माझ्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.
 
मी कार्यकर्ता आहे, यात विभिन्न गटांशी माझा संपर्क येतो, विशेषतः अल्पसंख्याकांशी संबंध येतो. सध्या मी युनायटेड किंगडममध्ये बर्मिंगहॅम विद्यापीठात धर्मशास्त्र व धर्म या विषयात एम.ए. करतो आहे.
 
मी कॉलेजात होतो, तेव्हा माझ्या लैंगिक ओळखीमुळे मी जवळपास तिथून बाहेर पडण्याच्या बेतात होतो. मला बराच भेदभावही सहन करावा लागला. उदाहरणार्थ, मला मशिदीमध्ये प्रार्थना करायची असायची आणि मी ट्रान्समॅन आहे हे लोकांना मीत होतं, तेव्हा ते मला टाळायचे किंवा मी बाई आहे असं समजून ते मला हुसकावून लावायचे. मला पुरुषांच्या रांगेत प्रार्थना करू दिली जात नसे. मग मी एकट्याने प्रार्थना करायचो, कारण माझ्यासारख्या गटांसाठी कोणतीही धार्मिकाजागा नाही.
माझ्या मते, धर्माचा कधीही एकचएक अर्थ नसतो. धर्माची शिकवण निश्चितपणे विविध स्वरूपाची असू शकते आणि त्यात सरसकटीकरण करता येणार नाही.
 
उदाहरणार्थ, ट्रान्सजेंडर असणं हराम आहे, असं लोक त्यांच्या धार्मिक परिप्रेक्ष्यातून म्हणत असतीलही. पण ते इतर कोणाचा ट्रान्सजेंडर म्हणून जगण्याचा आदर करत असतील आणि त्यांचा तसं जगण्याचा अधिकार शाबूत ठेवत असतील, तर मला काहीच हरकत नाही. भिन्न मतं असावीत. अशी भिन्न मतं असणं, हाच आपल्या धर्मातील विरोधविकासी भाग असतो.
 
अमर बाईचा पुरुष झाला या स्थित्यंतराला साक्षी राहिलेल्या मित्रांशीसुद्धा आम्ही बोललो.
 
"मला याचं आश्चर्य वाटलं नाही. तो मुलगी होता, तेव्हासुद्धा त्याचा अंतरात्मा मुलाचा असायचा. त्याची वृत्तीसुद्धा तशीच होती, पण मुख्य म्हणजेत्याचा अंतरात्मा पुरुषासारखा होता," असं अमरची मैत्रीण अल्दिला अकबर सांगते.
 
अमरला लहानपणापासून ओळखणाऱ्या लतिफाला मात्र अमरचा हा लिंगबदल मान्य नाही.
"आमच्या धर्मात या गोष्टीला प्रतिबंध आहे, हे मला चांगलंच माहितेय. पण अखेरीस मी त्याच्याकडे एक माणूस म्हणून पाहते. माझे त्याच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्याचे आणि ईश्वराचे संबंध हा त्याचा प्रश्न आहे. तो आजारी आहे आणि एखाद्या दिवशी बरा होईल, असा विचार करायला मला आवडतं," असं लतिफ म्हणतात.
 
लिंगबदल केलेल्यांविषयी इस्लामची दृष्टी कोणती आहे? लिंगभाव व मानवाधिकार अभ्यासांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या फहमीना इस्लामी संस्थेचे चँसेलर डॉ. के. एच. मारझुकी वाहित, एम.ए. यांची मुलाखत घेतली. लिंगभाव समता व न्याय यांच्यासाठीचा अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाद अली केबोन जम्बू अल-इस्लामी या बोर्डिंग स्कूलचे ते प्रमुख आहेत. त्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली-
 
इस्लाममधील लिंगांतरितांबद्दल तुम्हाला काय वाटते?
इस्लाम केवळ संहिता नाही, तर वास्तवसुद्धा आहे. संहिता व वास्तव यांच्यातील चर्चेचा अवकाश म्हणजे इस्लाम होय.
उदाहरणार्थ, लिंगांतरितांचा प्रश्न घ्या. ही समस्या नक्की कशी आहे, असं संबंधित व्यक्तीला विचारायला हवं. त्याची प्रक्रिया कशी असते, परिणाम कसा होतो, याचाविचार त्यांनी करावा.
 
तरच आपल्याला संहिता कशी आहे ते पाहता येईल. संहिता व वास्तव यांच्यातील चर्चा ऐकून आपण इस्लामी कायद्याविषयीचं मत बनवू शकतो.
 
इस्लामचा दृष्टिकोन काय आहे?
लिंगांतरितांच्या (लिंगबदल केलेले लोक) समस्या अगदी तुरळक उरलेल्या नाहीत. एखादी ट्रान्सजेंडर व्यक्ती हेतूतः तशी वागत असेल तर तिला आमदान असं म्हणतात, तर या गोष्टी स्वतःच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या व्यक्तींना घोइरो आमदीन असं म्हणतात.
 
इस्लामी कायद्यापेक्षा दोन भिन्न गोष्टी इथे आहेत. एखादी व्यक्ती आमदान असेल, हेतूतः तशी असेल, तर तो सवयीचा भंग करतो असं म्हणता येतं. याउलट, "मला ईश्वरकृपेच्या वाटेवर याची गरज नाही, पण तो या प्रवासाचा भाग आहे."
 
मी या दोन परस्परांहून भिन्न गोष्टी मानतो. हे नियंत्रणाबाहेरचं असेल, तर त्याने ते करावं असं कोणाला वाटेल, हा प्रश्न आहे.
 
अशांसारख्या लोकांना अवकाश द्यायला हवा, ईश्वराने काहीतरी वेगळं केलं आहे, ते मुख्यप्रवाही जगण्यापासून वेगळं आहे. इस्लाम हा ईश्वराचा संदेश आहे. हीच ईश्वराची इच्छा असेल, तर आपण ती नाकारणारे कोण?
 
ट्रान्सजेंडर लोकांच्या शरियाबद्दल काय?
ही समस्या आहे, कारण इस्लाममध्ये असा अवकाश दिलेला नाही.
 
माझ्या मते, इस्लामी शिकवणुकीनुसार असा अवकाश शोधता येईल आणि निर्माण करता येईल. आपल्याला लिंगांतरितांसाठी शरिया गरजेचा आहे.
 
उदाहरणार्थ, ते प्रार्थना कशी करतील? स्त्री व पुरुष भिन्न असतात, मग लिंगातरितांच्या प्रार्थना त्यांच्या लिंगभावानुसार असतील की दिसण्यानुसार? ते त्यांच्या नवीन लिंगभावाला अनुसरतील की जुन्या? हा वाद आहे. अजून त्यावर समेट झालेला नाही.
 
हा शरियाचा प्रश्न आहे. मानवी जगणं आणि ईश्वर यांचा संपर्क येतो तेव्हा स्त्रिया व पुरुष यांच्यात काही भेद असत नाही. ईश्वरासमोर आपल्या सदाचरणाचाच प्रश्न खरा असतो.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऐन दिवाळीत पावसाची शक्यता