सात मिनार असलेली मक्केची मशीद आणि त्यानंतर सहा मिनार असलेली जगातली एकमेव मशीद ती म्हणजे ब्लुमशीद! ब्लुमास्कच्या परिसरात तुफान गर्दी असते. प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो. खरंच हा मुस्लिम देश असूनही खूप वेगळा आहे याची खूण पटली. आत भरपूर गर्दी होती. छताजवळ असंख्य झरोके होते. तसंच तिथे खिडक्याही भरपूर ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हवा खेळती राहत होती आणि आत उजेडही भरपूर होता. जमिनीपासून पाचसहा फूट अंतर सोडल्यावर वरपर्यंत निळ्या टाइल्स लावलेल्या होत्या त्यामुळे आत सगळीकडे फिकट निळा रंग भरून राहिला होता. निळ्या रंगाच्या इतक्या मनमोहक छटा यापूर्वी आम्ही कुठेही पाहिल्या नव्हत्या. या निळाईमुळे इथलं वातावरण वेगळंच शांत वाटत होतं. अनेकजण तिथे धार्मिक ग्रंथांचं पठण करत होते, तर कुणी कुणी प्रार्थना करत होते.