Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'वन विहार' - भोपाळचे थ्री इन वन राष्ट्रीयपार्क

'वन विहार' - भोपाळचे थ्री इन वन राष्ट्रीयपार्क
, शुक्रवार, 31 मे 2019 (10:14 IST)
राष्ट्रीय उद्यान म्हटले की, डोळ्यासमोर येते ते दूरपर्यंत विस्तारलेले घनदाट जंगल, हिरवीगार वनराई, जंगलीप्राण्यांचा वावर असेच दृश्य डोळ्यासमोर उभे रहाते. पण, भोपाळ मध्ये शहराच्या मधोमध वसलेले 'वन विहार' राष्ट्रीय उद्यान याला अपवाद आहे. खरेतर याला 'थ्री इन वन' राष्ट्रीय उद्यानच म्हणावे लागेल. 
 
नॅशनल पार्क असले तरी याचठिकाणी पक्षीसंग्रहालय तसेच जंगली प्राण्यांसाठीचे रेस्क्यू सेंटरही आहे. 445 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या उद्यानातील प्राण्यांना मनोरंजन करण्यासाठी म्हणून जंगलातून पकडून आणण्यात आलेले नाही तर जंगलातून भटकलेले, सर्कशीतील, इतर प्राणीसंग्रहालयातील तसेच जखमी असणारे प्राणी या उद्यानात आहेत. 
 
पाच किलोमीटरपेक्षा अधिक क्षेत्र असणा-या या उद्यानात नजर जाईल तेथपर्यंत हिरवेगार दृश्य नजरेस पडते. एका बाजूस डोंगर आणि दुसरीकडे वनराई पाहताना मन भरून येते. भोपाळमधील प्रसिध्द मोठा तलावही या‍चठिकाणी आहे. मध्यप्रदेशातील सर्वांत मोठे पक्षीसंग्रहायलय याचठिकाणी पहावयास मिळते. वनविभाकडून याची देखरेख केली जाते. एवढे मोठे क्षेत्र आणि एकाचठिकाणी प्राणी-पक्षीसंग्रहायल असल्याने 18 जानेवारी 1983 रोजी याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. 
webdunia
वन विहाराच्या आत जाताच घनदाट जंगलात प्रवेश करत असल्याची अनुभूती येते. 'रामू गेट' अर्थात बोट क्लबनजीक प्रवेशव्दार आहे. याठिकाणी आपण चालत अथवा गाडीने फिरू शकतो. थोडे आत जाताच नैसर्गिक वातावरणात मोकळेपणाने वावरणा-या प्राण्यांचे सुंदर दृश्य आपल्या नजरेस पडते. या प्राण्यांना पर्यटकांपासून त्रास होऊ नये यासाठी जाळी लावण्यात आली आहे. सुरूवातीस कोल्हे, चित्ते, तरस यांच्यापासून सुरूवात होते. त्यानंतर अस्वल, वाघ, हिमालयातील अस्वले दिसतात. सकाळ व सायंकाळच्या वेळी हे प्राणी नजरेस पडतात पण, दुपारच्या वेळी सावली शोधण्यासाठी ते दूरवर निघून जातात. पाणी असणा-या भागात डोंगरी कासव, मगर आणि सुसरी आहेत. पार्कच्या मधोमध स्नेकपार्क आहे. येथे विविध प्रकारचे साप पहावयास मिळतात. 
 
हरणांचे पिंजरे लहान मुलांना आकर्षित करतात. अगदी रस्त्यालगतच हरणे चरण्यासाठी येतात. हरणांबरोबरच सांभर, चीतळ, नीलगाय, मोर, माकडे, जंगली डुक्कर, ससे असे प्राणीही याठिकाणी आहेत. एवढेच काय तर 250 हून अधिक जातींचे पक्षी याठिकाणी पहावयास मिळतात. अनेक प्रकारची जंगली वनस्पतीही याठिकाणी पहावयास मिळते. 
 
वन विहारात चालताना एका बाजूस जणू तलावही आपल्याला साथ देत असतो. या तलावामुळे वनविहायाचे दृश्य अधिकच खुलून दिसते. पर्यटकांसाठी याठिकाणी ट्रॅकिंगची सोयही करण्यात आली आहे. एवढे फिरल्यानंतर विश्रांतीसाठी आणि पोटापूजा करण्यासाठी 'वाइल्ड कॅफे' ही याठिकाणी आहे. नैसर्गिक वातावरणाची अनुभूती घेत चविष्ठ भोजन आणि चहा घेण्याची मजा काही औरच आहे. पावसाळाच्या दिवसात तर पाण्याचा आवाज आणि तुषार मन प्रसन्न करतात. 
 
सुटटीचा दिवस - 
- पार्क शुक्रवारी बंद असतो. 
- होळी आणि रंगपंचमीलाही पार्क बंद असतो. 
 
अधिक माहिती - 
- केव्हा जाल - हा पार्क वर्षभर खुला असतो. 
1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर पर्यंत सकाळी 7 ते सायंकाळी 6:30 पर्यंत 
1 ऑक्टोंबरपासून 31 मार्च पर्यंत सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिग बॉस मध्ये केव्हीआर ग्रुपचा दबदबा, कोण आहे या ग्रुपमध्ये