Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर -शब्द यांचा सुरेल मेळ- "कवितासंग्रह - सूर शब्दफुलांचे

सूर -शब्द यांचा सुरेल मेळ-
रसिक हो नमस्कार ,
संगीताची विद्यार्थी ,साहित्यातली लेखिका आणि  कवयित्री अशी व्यक्ती, कवयित्री स्वाती अनिल दोंदे, यांचा पहिला काव्यसंग्रह  "सूर शब्दफुलांचे", प्रकाशित झाला तो एका नव्या माध्यमातून. 
 
इंटरनेटवर ऑनलाईन ई-बुक्सचे  प्रकाशन करणारी  Shopizen.in  या प्रसिध्द प्रकाशन संस्थाने डिसेंम्बर - २०२२ वर्षात या काव्यसंग्रहाचे प्रिंट -बुक स्वरूपात प्रकाशन केले आहे. 
 
रसिक हो, या संग्रहात - ५ सलग शुभेच्छा.
या शुभेच्छा देणाऱ्या मान्यवर व्यक्ती संगीत क्षेत्रातील हे सर्व नवीन वाटणारे आहे.
या शुभेच्छा वाचून कळते की -
काव्यरचना वृत्तबद्ध ,छंदोबद्ध असल्या की  कवितांचे भावगीत ,किंवा कवितेचे गाणे होणे हे सहजपणाने करता येते . 
 
कविता लेखन करणाऱ्या, विशेषता: नवोदित कवी आणि कवियत्री मित्रांनी या  शुभेच्छा अभ्यासून ,कविता-स्वरूप , कवितेत अंगभूत लयीचे महत्व, जाणून घ्यावे . तसेच शब्द आणि सूर यांचा मेळ कवीला कसा  साध्य होऊ शकतो ?
अशा अनेक पैलूंचे महत्व जाणून घेता येईल.
कवयित्री स्वाती दोंदे यांचे कविता लेखन आणि हा संग्रह  कविता लेखनास खूप उपयुक्त ठरेल .
याच कारणासाठी " सूर शब्दफुलांचे" हा कविता संग्रह पूरक -वाचन म्हणून आपल्या संग्रही ठेवावा असे म्हणावेसे वाटते.
 
कवयित्री स्वाती यांच्या शब्दफुलातच सूर कसे आहेत हे सांगतांना -
१.गीतकार आणि संगीतकार -अशोक पत्की म्हणतात -
स्वाती दोंदे हिची गाणं लिहिण्याची स्टाईल कवितेच्या किंवा गझलच्या स्वरूपाची आहे. खूप छान छान कल्पना.. नवनवीन शब्दअक्षर..तसेच वेगळेच वृत्त ..
थोडक्यात ,कविता लिहिणारी ही कवयित्री गीतकार देखील कशी आहे हे या संग्रहातील कविता वाचून जाणवेल.
 
२.पंडित  सुरेश बापट यांच्या मते, यातील प्रत्येक काव्य हे मनातील भावना व्यक्त करणारे एक रेखाचित्र आहे जणू .
कल्पनेच्या कुंचल्यातून साकारलेल्या या काव्यात अलंकारिक जडणघडण देखील मनोहर आहे.
 
३.शास्त्रीय गायिका आणि कवयित्री - कल्याणी साळुंके म्हणतात -
संगीत साधना आणि कविता या दोन्हीही कला हातात हात घालून आल्या की नवनिर्मिती होणारच. कविता करण्यासाठी अंगभूत लय असणे खूप महत्वाचे ठरते . कवितेचे छंद, वृत्त सांभाळून भावाविष्कार सगळ्यांनाच नाही जमत . ते स्वाती दोंदे यांनी आपल्या कवितेतून दाखवून दिलं आहे. वेगवेगळे विचार , वेगवगळ्या कल्पना त्यांच्या कवितेतून सहजपणे व्यक्त झाल्या आहेत..
 
४. संगीतकार आणि गायक -श्रेयस पाटकर यांनी देखील खूप छान विवेचन करीत आपले अभिप्राय मत दिले आहे-
"कुठल्याही रचनेला किंवा कवितेला गाण्याचे स्वरूप देण्याकरिता जे महत्वाचे मुद्दे कोणीही संगीतकार पाहतो ते म्हणजे 
वृत्त आणि छंदाचा समतोल . तुम्ही केलेल्या या विविध वृत्तातील रचनांमध्ये त्या वृताचे फोनिक्स साऊंड तर अप्रतिम आहेतच.
त्याची सुत्रता फार सुंदर पद्धतीने मांडली आहे. त्याच बरोबर त्या रचनातील जो मतितार्थ आहे, तो सुद्धा त्याला साजेशा शब्दांनी परिपूर्ण झालेला दिसतो. नुसता मुक्तछंद नव्हे तर त्या वृताचे नियम आणि भान राखून तुमची प्रतिभा व्यक्त होते , 
 
५. तनुजा अळवणी-संगीत विशारद , संचालिका - केदार संगीत विद्यालय , कळवा. या म्हणतात -
संगीताच्या आवडीबरोबर काव्यरचनेची आवड ही जोपासली आहेस . काव्याचे किती विविध प्रकार तू लीलया हाताळले आहेस .अनेक शुभेच्छा .
 
मित्र हो ..या शुभेच्छा देण्याचा हेतू आणि याचे महत्व मी आरंभीच विषद केले आहे. कवयित्री स्वाती दोंदे यांच्या संगीत क्षेत्रातील सक्रियतेमुळे आणि सोबत कविता लेखनामुळे - माझ्यासारख्या अनेक वाचकांचा मोठाच लाभ झाला आहे. तो म्हणजे -वाचकाला काव्य रचना , छंदोबद्ध , वृत्बद्ध रचना ..कवितेचे गीत होणे , गाणे होणे ..याचा जणू मार्गदर्शक पाठ या संग्रहात वाचण्यास मिळाला आहे.
 
अजित महाडकर, कवी ,हायकुकार , समीक्षक यांची प्रस्तावना या कवितांच्या मौलीकतेत मोठीच भर घालणारी आहे. 
ते म्हणतात - 
सौ.स्वाती दोंदे यांच्या या काव्यसंग्रहातील निरनिराळ्या वृतातील कविता व गझला वाचल्यावर त्यांना हा प्रकारही जमला आहे असे जाणवते.
त्यांनी समजाती, अर्धसमजाती अशा दोन्ही प्रकारात लिहिलेल्या वृत्बद्ध कवितांचा तसेच व्योमगंगा ,आनंदकंद , देवप्रिया , विद्युलता, लज्जिता ,रागिणी ,रसना  अशा निरनिराळ्या वृतात लिहिलेल्या गझलांचा या पुस्तकात समावेश केला आहे.निरनिराळ्या प्रकारात कविता कशा लिहाव्यात हे समजण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल.
 
मित्रांनी - हे सगळ्या विवेचन वाचून "कविता लिहिणारी ही कवयित्री गीतकार देखील कशी आहे ,हे या संग्रहातील कविता वाचून जाणवेल.
 
एखाद्या पुस्तकातील कवितांच्या संदर्भात कविता लेखनाचे व्याकरण "हा अत्यंत महत्वाचा विषय वाचावयास मिळणे ", हा  सुखद तरीही दुर्मिळ असा योग आहे. यासाठी कवयित्री स्वाती दोंदे यांचे आभार मानने रास्त होईल.
 
"सूर शब्दफुलांचे" या ८९ पानांच्या संग्रहात - एकूण ५९ कविता आहेत आणि वरील विवेचनावरून इथे कवितांची उदाहरणे न देता , "संग्रह वाचावा" अशी विनंती करून तुमची उत्सुकता अधिक वाढविणे जास्त आवडेल.
 
कविता संग्रह वाचून एक सूचना करावीशी वाटते . ती म्हणजे प्रस्तावना आणि शुभेच्छा यातून या कविता वृतबद्ध आहेत, छंदोबद्ध आहेत, हे कळाले .पण प्रत्येक कवितेसोबत कवितेचे वृत्त, लगावली, मात्रा ..ही माहिती द्यायला हवी होती ती माहिती असती तर  ..
ही कविता काव्य-परंपरा जपणारी आहे, हे वाचकांना ठळकपणे जाणवले असते. दुसऱ्या आवृतीत हे जरूर करणे.
 
प्रकाशक -टीम शॉपिजन 
मराठी विभाग प्रमुख - ऋचा कर्पे यांचे हा छानसा कविता संग्रह प्रकशित केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.
कवयित्री -स्वाती अनिल दोंदे यांच्या लेखन-प्रवासास हार्दिक शुभेच्छा .
 
पुस्तक-परिचय  लेख :
ले- अरुण वि. देशपांडे .- पुणे 
संपर्क -9850177342
 
कविता संग्रह - सूर शब्दफुलांचे
कवयित्री - स्वाती अनिल दोंदे
पृ.८९ , मूल्य- रु.२४५ /-

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Recruitment in the health department आरोग्य विभागात बंपर भरती!