संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 2-डीजी हे औषध रिलीज केलं. 2-डीजी हे भारतातील कोव्हिड-19 रुग्णांसाठीचं पहिलं औषध असल्याचा दावा केला जात आहे. हे औषध भारताच्या संरक्षण आणि विकास प्राधिकरणानं (डीआरडीओ) बनवलं आहे. काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 2-डीजीच्या वापराला मान्यता दिली आहे. हे औषध कोव्हिड रुग्णांची ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करायला मदत करतं, असा दावा डीआरडीओनं केला आहे.
राजनाथ सिंह यांच्या कार्यालयानं ट्वीट करून म्हटलं की, डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) या औषध उत्पादन करणाऱ्या विभागाने डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत मिळून 2-डीजी हे औषध विकसित केलं आहे.
2-DG औषधांच्या मेडिकल चाचण्या झाल्या आहेत आणि ज्या रुग्णांवर औषधांच्या चाचण्या झाल्या त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याचं दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर हे औषध घेणाऱ्या रुग्णांना फारशी ऑक्सिजनचीही गरज पडली नसल्याचं आढळलं.
याशिवाय, हे औषध घेणाऱ्या रुग्णांची कोव्हिड आरटीपीसीआर चाचणी इतर रुग्णांच्या तुलनेत कमी दिवसात निगेटिव्ह येत असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे. डीआरडीओच्या संशोधकांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या औषधावर काम सुरू केलं होतं. त्या प्रयोगात या औषधातले रेणू कोरोनाच्या Sars-CoV-2 विषाणूला आळा घालण्यात मदत करत असल्याचं आढळून आलं.
एप्रिल 2020 च्या प्रयोगाच्या आधारावर मे 2020 मध्ये औषधाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीला परवानगी मिळाली होती.
डीआरडीओने डॉक्टर रेड्डीज लॅबच्या सहकार्याने कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांवर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या. मे 2020 ते ऑक्टोबर 2020 या दरम्यान 2-DG औषधाच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी झाली.
या टप्प्यात रुग्णांसाठी हे औषध सुरक्षित असल्याचं म्हणजेच औषधामुळे कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाला अपाय होत नसल्याचं आढळलं. शिवाय, त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही आढळली.
देशभरातल्या 6 हॉस्पिटलमध्ये फेज-IIa च्या चाचण्या घेण्यात आल्या तर 11 हॉस्पिटल्समध्ये फेज-IIb च्या चाचण्या घेण्यात आल्या. फेज IIb मध्ये औषधाची मात्रा बदलण्यात आली होती. चाचणीच्या या दुसऱ्या टप्प्यात एकूण 100 कोव्हिड रुग्णांवर औषधाची चाचणी झाली.
चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात कोव्हिड रुग्णांवर सध्या जे उपचार करण्यात येतात त्या तुलनेत 2-DG औषध दिलेल्या रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं लवकर बरी होत असल्याचं आढळलं. या औषधामुळे रुग्ण जवळपास अडीच दिवस आधी बरा होत असल्याचं दिसलं.