Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजयादशमी पौराणिक कथा

विजयादशमी पौराणिक कथा
, गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (13:01 IST)
दुर्गासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला. तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला.
 
दुर्गासुराने इंद्राविरुध्द युध्द पुकारले. शुक्राचार्य दुर्गासुराचा गुरु होता. तो संजीवनी विद्येच्या जोरावर मेलेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करी. दुर्गासुराने बृहस्पतीला कैद करुन पाताळात स्थानबध्द करुन ठेवले. इंद्राचा दुर्गासुराने पराभव केला आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला. दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली. पार्वती विजया नाव धारण करुन शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. महायक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी ५६ कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिलोमा, दुर्धर, दुर्मुख, बिडाल यांच्यासारख्या अतिबलाढय राक्षसांना विजया देवीने ठार मारले. त्यामुळे तालजंघ राक्षस संतापला आणि त्याने विजया देवीवर प्रचंड पर्वत फेकला. देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. घनघोर लढाई करुन तिने दुर्गासुराचा वध केला आणि विजय मिळवला. नऊ दिवस हे युध्द चालले होते. दहाव्या दिवशी विजय मिळाल्याने विजया देवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्वाचा दिवस आहे.
 
शमीपूजन, अश्मंतक (आपटयाच्या) वृक्षाचे पूजन विजयादशमीला करण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कौत्स नावाचा एक पुत्र होता. त्याने आपल्या पुत्राला भडोच शहरी वरतंतू या ऋषीकडे विद्यार्जन करण्यासाठी पाठविले. ऋषीकडे राहून कौत्स विद्यार्जन करु लागला. विद्यार्जन पूर्ण होताच आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुदक्षिणा घ्यावी अशी कौत्साची फार इच्छा होती. कौत्साने फारच आग्रह केल्यामुळे वरतंतू ऋषी त्याला म्हणाले, 'तुझा एवढा आग्रहच आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा व त्यादेखील एकाच व्यक्तीकडून तीन दिवसात मला आणून दे!' एकाच व्यक्तीकडून तीन दिवसात एवढे द्रव्य मिळविणे फारच कठीण होते.
 
त्या काळी रघुराजा हा अयोध्येचा राजा मोठा उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा होता. कौत्स अयोध्येला रघुराजाकडे गेला. रघुराजाजवळ एवढे द्रव्य नव्हते. एवढया सुवर्णमुद्रा तीन दिवसात देण्याचे रघुराजाने कौत्साला आश्वासन दिले आणि त्याने इंद्राबरोबर लढाई करण्याची तयारी केली. इंद्राला ही गोष्ट समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर शमीच्या आणि आपटयाच्या वृक्षांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. रघुराजाने १४ कोटी सुवर्णमुद्रा कौत्साला गुरुदक्षिणा म्हणून वरतंतू या त्याच्या गुरुला अर्पण करण्यास दिल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रांचा शमीच्या आणि आपटयाच्या वृक्षांखाली ढीग करुन लोकांना त्या घेऊन जाण्यास सांगितले.
 
लोकांनी सीमेबाहेर असलेल्या त्या वृक्षांची पूजा केली. यथेच्छ सोने लुटले आणि एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून शमीची व अश्मंतक (आपटयाच्या) वृक्षांची पूजा करुन सुवर्णमुद्रा म्हणून आपटयाची पाने लुटण्याची चाल प्रचारात आली.
कथा वाचून झाल्यावर म्हणावे -
महिषासुरनिर्णाशि भक्तानां सुखदे नम: । रक्तबीजवधे देवि चण्डमुण्डविनाशिनी नम:
शुम्भनिशुम्भस्य धूम्राक्षस्य मर्दिनी नम: । सर्वशत्रुविनाशिनी सर्वसौभाग्यदायिनी नम: ।
देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्‍ । रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ।
उदयोऽस्तु ! जय जगदंब ॥ 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरस्वती देवीची उत्पत्ती