सटाणा- बागलाण तालुक्यातील आरम नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना दहिंदुले येथे शुक्रवारी घडली आहे. गणेश रामचंद्र जगताप (वय ३२) व रोशन देवेंद्र बागुल (१८) अशी मृतांची नावे आहेत.
दोघे चाफ्याचा पाडा (देवपूर) येथील रहिवासी असून नात्याने मामा-भाचे होते. याबाबत सटाणा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार केळझर धरणातून आरम नदीपात्रात शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे. आरम नदीला पाणी आल्याने चाफ्याचा पाडा येथील जगताप कुटुंबीय आरम नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुतल्यानंतर जगताप कुटुंबीय घरी निघालेले असताना गणेश जगताप व रोशन बागुल हे मामा-भाचे अंघोळीसाठी नदीजवळ थांबले. दहिंदुले येथील बंधाऱ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.