ना उम्र की सीमा हो ...........
नात्याला अंकुर फुटण्यासाठी वातावरण अनुकूल असावे लागते, मग ते कोणतेही नाते असो. नाते फूलण्यासाठी सामंजस्य, सहनशीलता आणि प्रेमाची आवश्यकता असते. यापैकी एक जरी कमी असेल तर तिथे नात्याला मर्यादा पडते. इतकेच काय नात्याला वयोमर्यादाही नसते. नाते तयार करण्यासाठी वयाची अट अजिबात नसते. तरीही दोन वेगवेगळ्या वयातील मैत्रीची उदाहरणे चटकन आपल्या डोळ्यासमोर येत नाहीत. मैत्री म्हणजे समवयस्कांमधीलच असेच आपण गृहित धरतो. प्रौढ महिला आणि तरूण मुलगा किंवा मुलगी यांच्यात मैत्री असू शकते हे आपल्या लक्षातच येतन नाही. किंबहूना त्याकडे आपण या दृष्टीकोनातून पहातही नाही. मैत्रीसाठी एखाद्या वयाची अट ठेवली आहे का? किंवा आपल्या राज्यघटनेत असा काही नियम आहे का? मग समाजात अशा मैत्रीचे उदाहरण बघितल्यावर आपण त्याचा स्वीकार का करत नाही?
मित्रात भांडणे, राग आणि स्पर्धेची भावना असतेच. परंतु, हेच नाते एखाद्या परिपक्व व्यक्तीचे आपल्यापेक्षा कमी वयाच्या मित्रांबरोबर असेल तर ही भावना स्वाभाविकरित्या कमी होते. वयाने मोठा असलेला मित्र आपला अनुभव आणि मोठेपणाच्या भावनेने केवळ मैत्री नाही तर सुरक्षिततेची सावली देतो. विशेषत: मित्र जेव्हा एखाद्या कौंटूबिक समस्येवर निर्णय घेऊ शकत नसेल, त्यावेळी प्रौढ मित्र त्याचा मार्गदर्शक ठरू शकतो.
मैत्रीचा फायदा केवळ एकतर्फी नसतो. एखादी प्रौढ महिला घरातील कामे बाजूला ठेवून एखादी बाब एंजॉय करू शकत नाही. अशावेळी एखादी युवती तिची मैत्रीण असेल तर तिचा जिवंतपणा आणि उमेद पाहून त्या महिलेच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळू शकते. अर्थात युवक-युवतींचे स्वप्न, काहीतरी करून दाखविण्याची हिंमत आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा जोश याचा महिलांवर प्रभाव पडून त्या संकुचित वृत्तीतून बाहेर पडू शकतात.पिता पुत्र किंवा पती पत्नी यांचे नाते मैत्रीचे नसते, परंतु या नात्यांमध्ये आपल्या मर्यादेबरोबर मैत्रीचा गंध नसेल तर नाते नीरस होते. कारण मैत्रीचे नाते परिपूर्ण असून सर्व नात्यांमध्ये पूर्णता आणते.