नागपूर ऐतिहासिक नगरी आहे. या नगरीत अनेक ऐतिहासिक स्मारके आहेतच शिवाय अत्यंत प्राचीन आणि पुरातन मंदिरंही या नगरीत आपल्याला पाहायला मिळतील. नागपूरचा इतिहास पाहता इथे ताम्राश्य संस्कृती होती. नागसंस्कृतीचा उल्लेखही नागपूरच्या इतिहासात आढळतो. येथील संस्कृतीत अनेक देवी देवतांचे उल्लेख आपल्याला आढळून येतात. गजाननाला नागपुरात नागानन या नावाने संबोधण्याची प्रथा प्राचीन आहे. त्यामुळे गजाननाची आराधना करणाऱ्या नागपूरकरांना गणपती अत्यंत प्रिय आहे.
नागपूरचा प्राचीन इतिहास पाहता येथे गवळ्यांच्या बारा टोळ्या होत्या, यात सीताबर्डी ही अत्यंत सधन अशी टोळी मानली जाते. या टेकडीवर शिवमंदिर आणि गणेश मंदिर होते असा पुरातन उल्लेखही आढळतो. हे मंदिर आजही अस्तित्वात असून, अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.
येथे रेल्वे स्टेशनच्या कामासाठी 1866 साली खोदकाम करण्यात येत असताना गणपतीची शेंदूर लावलेली मूर्ती सापडली. हीच ती आजच्या टेकडी गणपतीची मूर्ती. नागपूरातील प्रसिद्ध असलेल्या सर्व गणेशांचा आद्य श्रद्धेचा मान टेकडीवरील गणपतीला दिला जातो. जसा मुंबईकरांना सिद्धीविनायक तसाच नागपूरकरांना टेकडीवरील वरदविनायक मानला जातो.
मंदिराची जागा बरीच मोठी असून येथे इतरही अनेक मंदिरे आहेत, यात गणेश मूर्तीच्या पाठीमागे डाव्या हाताला भैरवाची पाषाण मूर्ती आहे. हा काळभैरव अत्यंत जागृत आणि जगाचा पालनकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. देवालयाच्या मागील बाजूस काळ्या पाषाणाची महादेवाची पिंड आहे. काळभैरवाची मूर्ती आणि ही पिंड एकाच दगडाच्या बनलेल्या असून नंदीच्या पाठीवर असलेली ही नंदीच्या पाठीवरची ही पिंड दुर्मिळ आहे.
महादेवाजवळच डावीकडे गणेशाची दगडी मूर्ती आहे. 1970 च्या सुमारास या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापण करण्यात आली. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला ऋद्धी सिद्धी आहेत. गणेश मंदिरातच श्री राधाकृष्णाचे मंदिरही आहे. गणेशाच्या उजव्या बाजूला हनुमान मंदिर आहे. ही मूर्ती अत्यंत रेखीव असली तरी शेंदूर लेपनाने तिचा रेखीवपणा फारसा दिसून येत नाही. मंदिरासमोरच महालक्ष्मी मंदिर आहे.
मंदिरात गणेश जयंतीच्या दिवशी गणेश यागाचे आयोजन करण्यात येते. सध्या देवस्थानात येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून विदर्भातील सर्वांत श्रीमंत गणपती अशी या देवस्थानाची ओळख होत आहे. देवस्थान इतके प्राचीन आणि जागृत आहे की, आपण याला एकदा अवश्य भेट द्यावी.