राज्यात सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने चांगले निर्णय घेतले, परंतु त्याचे मार्केटिंग करण्यात कमी पडलो. याउलट विरोधकांनी आमच्या चुकांचे मार्केटिंग केल्याने राज्यात आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले; अशी खंत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील म्हणाले, जनमताचा कौल आमच्या विरोधात आहे. तो आम्ही मान्य केला आहे. गेल्या दहा वर्षांत आम्ही अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. भ्रष्टाचारी लोकांना कठोर शासन केले; परंतु याची जाहिरातबाजी करण्यात आम्ही मागे राहिलो. आमच्याकडून काही चुकाही झाल्या; मात्र या चुकांचे विरोधाकांनी भांडवल करून स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. त्यामुळे देशभर काँग्रेसविरोधी संतापाची लाट निर्माण झाली. त्यातच मोदी यांची सोशल मीडियावर लाट होतीच, याचा एकत्रित परिणाम म्हणून काँग्रेस आघाडीवर मोठ्या पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली.
एका पराभवाने वसंतदादा पाटील यांचा विचार संपणार नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम उपस्थित होते.