संपूर्ण भारतभर आज गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. फार पूर्वी अगदी पुरातन काळात आपल इथे आश्रम गुरुकुल पद्धत होती. गुरूंकडून विद्या घेण्यासाठी विद्यार्थी स्वत: गुरुकुलातच राहात असत. गुरूला पिता तर गुरुपत्नीला माता समजत. म्हणजे त्या शिष्यांच्या जीवनात गुरूंना एक अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान होते. अशी अनेक गुरुकुल त्या काळात होती आणि अनेक हुशार-पंडित-तत्त्वज्ञानी विद्यार्थी त्यातून घडले अन् जगाला आदर्श ठरले. युगानुयुगे ही गुरु-शिष्याची परंपरा सुरूच आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या काळातदेखील एवढा मोठा योगी चांगदेव पण त्यने लहानग्या मुक्ताईला गुरू मानले. इथे वयाचा संदर्भ जोडताच येत नाही. येतो प्रश्न तो ज्ञानाचा. व लहान असूनही जर जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं पांडित्य जर एखाद्यात असेल तर मग त्याला गुरूच म्हणावं लागेल. म्हणजेच जीवनाचं तत्त्वज्ञान ज्याच्याकडून शिकायला मिळतं तो म्हणजे गुरू.
आता पुढे पुढे शाळा पद्धती सुरू झाली. ठराविक वेळ, अभसक्रम. त्यातून साधला जाणारा विविधांगी विकास. यात आता गुरूचा गुरुजी म्हणून प्रवास झालेला, गुरुजींना कधी कधी मास्तरही म्हटलं जायचं. तर असे हे गुरुजी.
‘छडी लागे छम छम विद्या येई घम घम!’ असं म्हणत कधी छडी देऊन तर कधी प्रेमाने गोड बोलून विद्यार्थ्यांना विद्या देतच आलेत. पूर्वी हे गुरुजी केवळ शाळेचेच गुरुजी नसत तर गावाचे गुरुजी असत. संपूर्ण गाव अगदी गुरुजींना आदराने नमस्कार कयराचा. प्रसंगी कुठल्याही गोष्टीसाठी, सल्ला मागण्यासाठीसुद्धा गुरुजींकडे यायचा. यावेळी कधी गुरुजींची आर्थिक परिस्थिती किंवा इतर याचा मापदंड नसायचा, तर आदर केला जात होता तो ज्ञानाचा, त्या पेशाचा. साने गुरुजींसारख्या गुरुजींचा आपण आजही आदर्श घेतो. विद्यार्थ्यांसाठी ध्येयवेडे असलेलेसुद्धा अनेक गुरुजी आपल्या इथे होते अन् आहेत. आता या गुरुजींचं रूपांतर किंवा बदल ‘सर’ मध्ये झाला. काळ बदलला, थोडं वातावरण बदललं पण समाजात शिक्षकाचं स्थान आदराचंच आहे. पारंपरिक वेशातले गुरुजी बदलत वेशभूषेतील ‘सर’ झाले असले तरी या पेशातील तत्त्वं बदलली नाहीत. बे एके बे एवढंच बोलून, शिकवून आता चालत नाही तर बदलत्या पर्यावरणाचं भान ठेवावं लागतं. ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं लागतं. काळाच्या या ओघात विद्यार्थी टिकावेत, वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावेत यासाठी आता हे शिक्षक प्रयत्न करीत आहेत. आज आपल्या विद्यार्थ्याला केवळ स्वत:पुरता घडवून चालणार नाही म्हणून त्याचा सामाजिक जाणिवा, राष्ट्राप्रतिच जाणिवा, बदलत्या सर्व परिस्थितीचा जाणिवा जागृत करण्याचं कामही शिक्षकच करीत आहेत. समाजाचं ऋण, राष्ट्राचं ऋण ह्या सर्व कल्पना विद्यार्थ्यात रुजविण्याचं कामही शिक्षकच करीत आहेत. आजही विद्यार्थ्यांबद्दलच्या शिक्षकांच्या स्वप्नातील कल्पना फार वेगळ्या आहेत. विद्यार्थी जेव्हा शिक्षकांपेक्षाही ज्ञानाने मोठा होईल तोच शिक्षकाचा खरा आनंद आहे.
जेव्हा कर्तृत्वाने मोठा होऊन शिक्षकांच्या समोर तो विद्यार्थी येईल तेव्हा खर्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केल्याचे समाधान शिक्षकांना मिळेल. आजही अनेक ध्येयवेडे शिक्षक आहेत. आदर्श कल्पना डोक्यात घेऊन झपाटलेले कृतिशील, उपक्रमाशील शिक्षक समाजात आहेत. शिक्षक हा खर्या अर्थाने समाजाचा शिल्पकार असतो.