एकादशी, सण आणि उत्सव कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येणा-या जास्तीत जास्त वारकरी भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे, यासाठी यात्रा काळात देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे ठेवले जाते. देवाच्या राजोपचारामुळे भाविकांची दर्शन रांग थांबू नये यासाठी राजोपचारही बंद केले जातात. या प्रथेप्रमाणे मागील गुरुवार पासून भाविकांना विठुरायाचे 24 तास दर्शन सुरु करण्यात आले. 30 नोव्हेंबरपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर अहोरात्र उघडे ठेवले जाणार आहे.
ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशी!!! तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात..
तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरु होतात..पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस.या रात्री श्रीविष्णूला बेल वाहतात आणि शिवाला तुळशीपत्र वाहतात. याला हरिहर-भेट किंवाहरिहर-अद्वैत म्हणतात. कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा लंघून (ओलांडून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत !
कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का ? एकतर ही गोष्ट हरि आणि हर म्हणजे श्रीविष्णु आणि शिव यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे (अध्यात्मशास्त्रीय कारण) म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो.
ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणार्या भक्तांनी शैव-वैष्णव भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून (स्वसंप्रदायाच्या सीमा लंघून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे; कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांत एकादशीचे व्रत केले जाते. या व्रताचे महत्त्व आणि त्याचे प्रकार यांविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.
कार्तिकी एकादशी माहिती मराठी (kartiki ekadashi 2022)
सन 2022 मध्ये 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहे. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते. तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो.
कार्तिक पौर्णिमेला तुम्ही या 5 गोष्टी केल्या तर तुम्हाला धन, आरोग्य आणि मान-सन्मान मिळेल
विष्णुप्रबोधोत्सव (vishnu prabodhotsav)
दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी म्हटले आहे; त्या दिवशी देव झोपी जातात, अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात; म्हणून तिला प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.
तुलसी विवाह (tulsi vivah)
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीवाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला, असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात.