मंदिरात गेल्यावर देवाचे दर्शन घेतल्यावर एक पद्धत असते ती म्हणजे प्रदक्षिणा लावण्याची. प्रदक्षिणा म्हणजे देवतेला उजवे ठेवून त्याभोवती फेरी घालणे. देवमूर्तीची प्रदक्षिणा नेहमी उजव्या बाजूपासून सुरू केली पाहिजे.
प्रदक्षिणा मंत्र
यानि कानिच पापानि,
जन्मांतर कृतानीच,
तानी तानी विनश्यन्तु प्रदक्षिणे पदेपदे.
अर्थात ह्या किंवा त्या कारणाने माझ्याकडून कळत- नकळत झालेल्या प्रत्येक चुकांचा किंवा पापांचा, ह्या प्रदक्षिणेद्वारे पडणार्या प्रत्येक पावला गणिक नाश होऊ दे.
* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात.
* प्रदक्षिणा घालत असताना गाभाऱ्याला स्पर्श करू नये.
* प्रदक्षिणा घालत असताना देवतेच्या पाठीमागच्या बाजूस आल्यावर थांबून, देवतेला नमस्कार करावा.
* प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर थांबून, देवतेला नमस्कार करून मगच पुढील प्रदक्षिणा घालावी.
* प्रदक्षिणा सुरू झाल्यानंतर मध्ये थांबू नये.
* ज्यापासून प्रदक्षिणा सुरू केली तेथेच ती पूर्ण करा.
* प्रदक्षिणा घालताना कोणाशीही बोलू नका.
* ज्या देवाची प्रदक्षिणा करत आहात त्याचे ध्यान करा.
* उलट अर्थात डाव्या बाजूला प्रदक्षिणा घालू नये.
प्रदक्षिणा प्रकार
देव प्रदक्षिणा : षोडशोपचार पूजेतील पंधरावा उपचार म्हणजे देव प्रदक्षिणा. मंदिरात गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मंत्र किंवा अन्य स्तोत्र किंवा नामस्मरण घेत प्रदक्षिणा घातली जाते.
मंदिर प्रदक्षिणा : देवांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणेचा मार्ग गाभाऱ्याभोवती नसून मंदिराभोवती असतो, त्याला मंदिरप्रदक्षिणा म्हणातात.
क्षेत्र प्रदक्षिणा : याचे दोन प्रकार असतात- लघु परिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा. लघु परिक्रमेत परिसर, गाव, शहर तीर्थकुंडे, देवस्थाने, क्षेत्रपाल मंदिर आदिंचा समावेश होतो. तर दीर्घ परिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा, तीर्थस्थानांचा समावेश होतो त्याला क्षेत्रप्रदक्षिणा म्हणतात.
नदी प्रदक्षिणा : नदी प्रदक्षिणा केवळ पायीच केली जाते. नदी परिक्रमेत नदीत स्नान करणे, नदीचे पाणी पिणे, माधुकरी मागून जेवणे, असे काही नियम पाळाले जातात.
वृक्ष प्रदक्षिणा : वृक्ष प्रदक्षिणेत पवित्र वृक्षाची प्रदक्षिणा घालतात तर काही ठिकाणी पर्वत प्रदक्षिणाही केली जाते.
अर्थ - देवीला एक, सूर्याला सात, गणपतीला तीन व विष्णूला चार प्रदक्षिणा कराव्या व शिवाला अर्धी प्रदक्षिणा करावी. शिवाच्या अर्ध्या प्रदक्षिणेची रीत अशी - शिवाच्या अभिषेकाचे जल गाभार्यातून ज्या नालीने बाहेर सोडले असेल, तिथवर प्रदक्षिणा करावी आणि ती नाली न ओलांडता परत फिरून देवापुढे यावे. हिला सोमसूत्री प्रदक्षिणा असेही म्हणतात.
हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालाव्या. सूर्य मंदिराला सात प्रदक्षिणा घालव्या.
प्रदक्षिणा कशी करावी, त्याविषयी कालिकापुराणात पुढील श्लोक दिला आहे -
प्रसार्य दक्षिणं हस्तं स्वयं नम्रशिर: पुन: । दक्षिणं दर्शयन् पार्श्व मनसापि च दक्षिण: ॥
अर्थ - उजवा हात पुढे पसरून व नतमस्तक होऊन आलले दक्षिण अंग देवाला दाखवीत आणि मनानेही दक्षिन म्हणजे ऋजू वृत्तीचे राहून प्रदक्षिणा करावी. ज्या देवाला प्रदक्षिणा घालता येत नसेल, त्या स्वत:भोवती वर्तुळ भ्रमण करून प्रदक्षिणा घालतात. पण अशा प्रदक्षिणेत देवाला पाठ दाखविली जाते त्यामुळे अशी प्रदक्षिणा शक्यतो टाळावी, असे सांगितले आहे.
प्रदक्षिणचे माहात्म्य वराहपुराणात सांगितले आहे ते असे -
प्रदक्षिणां यें कुर्वन्ति भक्तियुक्तेन चेतसा । न ते यमपुरं यान्ति यान्ति पुण्यकृतां गतिम् ॥
अर्थ - जे भक्तियुक्त अंत:करणाने देवाला प्रदक्षिणा करतात, त्यांचा यमलोक टळतो व ते पुण्यवंतांच्या गतीला जातात.