Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री भक्तविजय अध्याय २८

श्री भक्तविजय अध्याय २८
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरुक्मिणीरमणाय नमः ॥    
पुंडलीकवरदा पांडुरंगा ॥ मदनताता रुक्मिणीरंगा ॥ व्रजनारींच्या रासरंगा ॥ तूं श्रीरंगा क्रीडसी ॥१॥
तुझा चित्तीं धरितां काम ॥ भक्त होती सदा निष्काम ॥ सकळ जीवांचा तूं विश्राम ॥ आत्माराम रघुवीर ॥२॥
तूं चित्तचालक चैतन्यघन ॥ गुणातीत आणि निर्गुण ॥ वैरियां देसी सायुज्यसदन ॥ आनंदघन तूं एक ॥३॥
तूं देवाधिदेव सनातन ॥ अंबरीष आला तुज शरण ॥ एकादशीव्रतादि नेम जाण ॥ करी सप्रेम आवडी ॥४॥
दुर्वासऋषि तपोनिधी ॥ पातला छळावया तयासंधी ॥ शाप देतां निष्ठुरबुद्धी ॥ कृपानिधि तुज स्तवियलें ॥५॥
अंबरीषाची ऐकोनि करुणा ॥ मोहें दाटला तुज पान्हा ॥ सत्वर पावलासी जगज्जीवना ॥ मनमोहना श्रीकृष्णा ॥६॥
चक्र लावूनि ऋषीचे पाठीं ॥ दुर्वास केला हिंपुटी ॥ अंबरीषास कृपादृष्टीं ॥ त्वां जगजेठी विलोकिलें ॥७॥
अभय देऊनि निजभक्तांसी ॥ दहा गर्भवास स्वयें सोशिसी ॥ मत्स्य कूर्म वराह होसी ॥ वसुधा दाढेसी धरूनियां ॥८॥
हिरण्यकश्यपें प्रल्हाद भक्त ॥ गांजितां पावलासी त्वरित ॥ गुरगुर करोनि स्तंभाआंत ॥ प्रकट त्वरित जाहलासी ॥९॥
क्रोधें मारूनियां असुर ॥ प्रल्हाद रक्षिला निजकिंकर ॥ क्षत्रिय माजतां पृथ्वीवर ॥ परशुधर तूं होसी ॥१०॥
जमदग्निरेणुकेचें उदरीं ॥ अवतार घेऊनि ते अवसरीं ॥ एकला एक तूं श्रीहरी ॥ केली बोहरी क्षत्रियांची ॥११॥
क्षत्रिय निवटूनि त्या अवसरा ॥ राज्य दिधलें धरामरां ॥ ऐसा तूं कृपासागरा ॥ विश्वोद्धारा रामकृष्णा ॥१२॥
अति उन्मत्त राक्षस रावण ॥ शिवें त्यास दिधलें वरदान ॥ सकळ देव जिंकूनि त्यानें ॥ बंदीं संपूर्ण घातले ॥१३॥
नवग्रहांच्या पायर्‍य़ा करून ॥ राज्य करीतसे तो दशानन ॥ वायु येऊनि झाडी अंगण ॥ सडा पर्जन्य घालीतसे ॥१४॥
मार्तंड नापिक होऊन ॥ श्मश्रु करी स्वकरेंकरून ॥ गाई राखी गजवदन ॥ मनांत लाज न धरितां ॥१५॥
आदिमाया जे भगवती ॥ नित्य रगडी रावणाप्रती ॥ सटवी धूतसे बाळंती ॥ लज्जा चित्तीं न धरीच ॥१६॥
कामें करिती सकळ देव ॥ बंदीं घातले इंद्रराव ॥ ऐसिया संकटीं तुझा स्तव ॥ करिती देव सकळिक ॥१७॥
ऐकोनि त्यांचीं करुणावचनें ॥ कृपा आली तुजकारण ॥ अवतार धरूनि रघुनंदन ॥ रावण मर्दोन टाकिला ॥१८॥
सकळ देवांसी सोडवून ॥ केलें धर्माचें स्थापन ॥ कंस चाणूर माजतां जाण ॥ स्वयें श्रीकृष्ण जाहलासी ॥१९॥
सकळ निवटोनि दुराचारी ॥ भक्त रक्षिले नानापरी ॥ द्रौपदीस वस्त्रें मुरारी ॥ अंगें श्रीहरी नेसवी ॥२०॥
कलियुगींचे भक्तराज ॥ सद्भावें अनुसरले तुज ॥ निजांगेंकरून त्यांचें काज ॥ मुक्ति सायुज्य त्यां देशी ॥२१॥
रामदासाचे भक्तीसाठीं ॥ डाकुरा आलासी जगजेठी ॥ वालभर सोन्यासाठीं ॥ विकिलें हाटीं तुजलागीं ॥२२॥
जयदेव तुझा प्रेमळ भक्त ॥ त्याचें गह्रींचें उठविलें प्रेत ॥ वर देऊनि अभय हस्त ॥ जगीं कीर्ति वाढविली ॥२३॥
नरसी मेहेता भक्त प्रेमळ ॥ त्यास दाखविलें रासमंडळ ॥ आतां ऐका श्रोते सकळ ॥ कथा रसाळ निरुपम ॥२४॥
नरसी मेहेत्यासे धूर्जटी ॥ रासमंडळ दावी दिठी ॥ ते श्रीकृष्णलीला अति गोमटी ॥ त्याचें दृष्टी पडतसे ॥२५॥
जैसें दृष्टीसी देखिलें सांगे ॥ त्याचीं पदें रचिलीं अंगें ॥ वर दिधला श्रीरंगें ॥ भक्तभवसंगें तयासी ॥२६॥
नानापरींचे प्रबंध गात ॥ नित्य हरीचे गुण वर्णीत ॥ टाळ वीणा घेऊनि हातांत ॥ नृत्य करीत कीर्तनीं ॥२७॥
न करी कोणाचें उपार्जन ॥ अहोरात्र नामस्मरण ॥ राजा आणि रंक दीन ॥ लेखी समान निजदृष्टीं ॥२८॥
कल्पतरु आणि बाभुळ ॥ पंडित आणि अजापाळ ॥ साधु आणि निंदक खळ ॥ देखे सकळ समदृष्टीं ॥२९॥
अयाचितवृत्तीकरून ॥ कोणी देईल वस्त्र अन्न ॥ त्यांतचि अतीतां तोषवून ॥ कुटुंबरक्षण करीतसे ॥३०॥
जुन्यागडासमीप आणिक ॥ शामपुर ग्राम एक ॥ तेथील सावकार त्रिपुरांतक ॥ असे स्वशाखा तयाची ॥३१॥
त्याची कन्या जाहली उपवर ॥ लग्नविचार करी सावकार ॥ पुरोहित पाठविले सत्वर ॥ वरविचार करावया ॥३२॥
कृष्णभट नामाभिधान ॥ परम भाविक होता ब्राह्मण ॥ नरसी मेहेत्याच्या घरा येऊन ॥ काय वचन बोलिला ॥३३॥
कृष्णभट बोलिला वचनें ॥ आम्हांसी पाठविलें यजमानें ॥ कीं तुमच्या पुत्राकारणें ॥ कन्यादान अर्पावें ॥३४॥
राशि नक्षत्र पाहतां जाण ॥ घटित आले छत्तीस गुण ॥ लग्ननिश्चय करून ॥ आला परतोन मागुती ॥३५॥
पुरोहितें केली सोयरीक ॥ तेचि मान्य सर्वांसी देख ॥ त्या देशींचा ऐसा दंडक ॥ मान्य सकळिक करिती कीं ॥३६॥
पुरोहितें केलिया वचन ॥ नायकेल जरी यजमान ॥ तरी उपाध्याय अंगुली कापून ॥ वराकारणें देतसे ॥३७॥
देशदंडक ऐसा जाण ॥ म्हणोनि निश्चय करी ब्राह्मण ॥ यजमानासी बोले वचन ॥ धरिलें लग्न कन्येचें ॥३८॥
जुन्यागडीं नागर ब्राह्मण ॥ परम भाविक वैष्णव जाण ॥ त्याच्या पुत्रासी कन्या अर्पण ॥ निश्चय करून आलों मी ॥३९॥
अकोनि पुराहिताचें वचन ॥ हांसों लागले सकळ जन ॥ म्हणती मुलीचें प्राक्तन ॥ आलें दिसोन विपरीत ॥४०॥
म्हणती तो वैष्णव उदासी ॥ कीर्तनीं नाचे अहर्निशीं ॥ कन्या त्यासी अर्पिली कैसी ॥ सोयरा आम्हांसी साजेना ॥४१॥
ज्याचें घरीं श्रीभागवत ॥ श्रवण करिती साधुसंत ॥ अवघे उदास आणि विरक्त ॥ तो सोयरा आम्हांतें साजेना ॥४२॥
जयासी आपुलें आणि परावें ॥ सम विषम नाहीं ठावें ॥ सर्वां भूतीं सारिख्या भावें ॥ सोयरा नव्हे तो आम्हां ॥४३॥
अक्रोध आणि सदाचारी ॥ सर्वां भूतीं मैत्री बरी ॥ अन्न वस्त्र संकीर्ण घरीं ॥ कैसी नोवरी दिधली तया ॥४४॥
पुरोहित म्हणे ऐका वचन ॥ मी तरी आलों निश्चय करून ॥ तुम्हीं करितां अनुमान ॥ देईन कापून अंगुली ॥४५॥
ऐसें ऐकूनि म्हणे त्रिपुरांतक ॥ लग्नतिथि आहे उदयीक ॥ सर्व साहित्य घेऊनि देख ॥ यावें सम्यक लग्नासी ॥४६॥
आम्ही गृहस्थ नामांकित ॥ सोयरा दुर्बळ विष्णुभक्त ॥ हांसें होईल पिशुनांत ॥ ऐसी मात न करावी ॥४७॥
लग्ना आणावें पांचशत ॥ हत्ती घोडे शिबिका रथ ॥ वाद्यें लावूनि अपरिमित ॥ यावें त्वरित सप्रेमें ॥४८॥
वस्त्रें अलंकार भूषणें ॥ घेऊनि यावें वधूकारण ॥ आमुचे ग्रामवासी जनांलागून ॥ मिष्टान्न भोजन द्यावें ॥४९॥
ऐसें साहित्य घेऊन ॥ उदयीक न होतां त्यांचें आगमन ॥ तरी निश्चयेंसीं मोडेल लग्न ॥ सत्य जाण गुरुवर्या ॥५०॥
ऐसी अटक घालितां जाण ॥ पुरोहितासी कळली खूण ॥ त्रिपुरांतकास उपलक्षण ॥ दृष्टांत देऊन बोलत ॥५१॥
म्हणे भीमकरायाची कन्या नोवरी ॥ कृष्णासी अर्पिली जे अवसरीं ॥ रुक्मी तयाची हेळणा करी ॥ तैसी परी त्वां केली ॥५२॥
कीं पार्वती हिमालयाची कुमरी ॥ तीस वर नेमिला त्रिपुरारी ॥ हेळणा करिती त्याच्या नारी ॥ तैसी परी त्वां केली ॥५३॥
तुमचें इच्छित असेल जें मन ॥ तें सर्वही येईल घडोन ॥ ऐसें म्हणोनि ब्राह्मण ॥ गेला परतोन सांगावया ॥५४॥
नरसी मेहेत्यासी बोले वचन ॥ उदयीक उत्तम आहे लग्न ॥ तुम्ही सर्व साहित्य घेऊन ॥ साह्य श्रीकृष्ण करावा ॥५५॥
परम चतुर कृष्णभट जाण ॥ अति भाविक वैष्णवजन ॥ जेणें सिद्धीस जाईल लग्न ॥ तैसीं वचनें बोलिला ॥५६॥
म्हणे तिकडील गोष्टी सांगतां यास ॥ तरी आतांचि होईल नाश ॥ नरसी मेहेता परम उदास ॥ न धरी आस कवणाची ॥५७॥
लग्नसिद्धि होईल जेण ॥ तैसींच बोलोनि नम्रवचन ॥ पुरोहित निश्चय करून ॥ आला कुर्‍हाड कातर कुमानुष ॥५८॥
सुई सुहागी सुमनुष्य पाहीं ॥ मध्यस्थ पडिलीं जिये ठायीं ॥ तेथें द्वैत न दिसे कांहीं ॥ एके ठायीं करिती कीं ॥५९॥
कुर्‍हाड कातर कुमानुष ॥ मध्यस्थ पडिले ज्या ठायास ॥ तेथें तत्काल होईल नाश ॥ अनर्थास हेंचि मूळ ॥६०॥
लग्नांत नसावा चाहाड ॥ युद्धांत नसावा अत्यंत भ्याड ॥ कीर्तनीं नसावी बडबड ॥ तुळसींत बोकड नसावा ॥६१॥
पुराणांत नसावा अति वाचाळ ॥ भाविकांत नसावा निंदक खळ ॥ प्रवासीं नसावा भुकाळ ॥ भजनीं तळमळ नसावी ॥६२॥
शेजारी नसावा सोयरा ॥ पर्जन्यीं नसावा दक्षिणवारा ॥ श्रीगुरुमंत्र घेतां खरा ॥ विकल्प दुसरा नसावा ॥६३॥
विरक्तांस नसावा द्रव्यसांठा ॥ दुर्बळांत नसावा उन्मत्तगाठा ॥ सूक्ष्ममार्गीं नसावा कांटा ॥ ज्ञानियासी ताठा नसावा ॥६४॥
आशाबद्ध नसावा सत्पात्र ॥ कुग्रामीं न घ्यावें अग्निहोत्र ॥ अपथ्यासी औषधमात्र ॥ स्वतंत्र वैद्यें न द्यावें ॥६५॥
मित्र नसावा कंटक कृपण ॥ सोयर्‍याची न द्यावें व्याजीं धन ॥ साधकीं सेवितां राजान्न ॥ सुकृतखंडन होतसे ॥६६॥
असो आतां बहु भाषण ॥ राहील ग्रंथनिरूपण ॥ पुरोहित निश्चय सांगून ॥ आला परतोन निजग्रामा ॥६७॥
यजमानासी सांगे वचन ॥ उदयीक सत्वर येईल लग्न ॥ तुम्ही सर्व साहित्य करून ॥ सावधपणें असावें ॥६८॥
हांसोनि बोले त्रिपुरांतक ॥ नरसी मेहेता एकला एक ॥ कांहीं साहित्य नसतां देख ॥ कैसा उदयीक येईल ॥६९॥
सोयरीक मोडावयाकारण ॥ म्हणवोनि उदयीक धरिलें लग्न ॥ येचविषयीं उपक्रम करून ॥ दृष्टांतवचन बोलत ॥७०॥
दुतोंडे दवणे श्रावणमासीं ॥ मागों गले शेषकन्येसी ॥ तेणें उत्तर दिधलें त्यांसी ॥ वैशाख मासीं लग्न करूं ॥७१॥
उष्णकाळ येतां जवळ ॥ तों दवणे पावले अंतकाळ ॥ तेवीं मी बोलिलों उतावीळ ॥ लग्न सकाळीं म्हणोनी ॥७२॥
पुरोहित म्हणे तूं अविश्वासी ॥ विवेक नाहीं निजमानसीं ॥ अहंभाव धरिला चित्तासी ॥ तरी शीघ्रचि पावसी अपमान ॥७३॥
द्रौपदी सतीचें करितां हेळण ॥ अपमान पावला सुयोधन ॥ तैसेंचि आजि तुजकारण ॥ होईल मज वाटतसे ॥७४॥
तों दुसरे दिवसीं नरसी मेहेता ॥ वासरमणि उदयासी येतां ॥ स्नान करूनियां तत्त्वतां ॥ श्रीकृष्णनाथा पूजीतसे ॥७५॥
द्वादश टिळे रेखिले जाण ॥ गळां घातलें तुलसीभूषण ॥ सवें घेऊनि वैष्णवजन ॥ नामस्मरण करीतसे ॥७६॥
पुत्र कांता घेऊनि त्वरित ॥ लग्नासीं चालिला विष्णुभक्त ॥ टाळ मृदंग वीणे वाजत ॥ गुण वर्णीत हरीचे ॥७७॥
जय जय मुकुंदा मुरारी ॥ अनाथनाथा भक्तकैवारी ॥ पुराणपुरुषा मधुकैटभारी ॥ वससी अंतरीं भक्तांचिया ॥७८॥
जय द्वारकावासी जयन्नायका ॥ रुक्मिणीकांता विधिजनका ॥ मथुरावासी कंतांतकां ॥ भक्तांसी सखा तूं एक ॥७९॥
जय जेवाधिदेवा सनातना ॥ भक्तरक्षका मधुसूदना ॥ विश्वव्यापका जगज्जीवना ॥ मनमोहना गोविंदा ॥८०॥
जय पुराणपुरुषा अनंतनामा ॥ सगुणपुरुषा मेघश्यामा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥ मनोभिरामा श्रीहरे ॥८१॥
ऐसें श्रीहरीचे गुण वर्णींत ॥ प्रेमेंकरूनि गात नाचत ॥ नरसी मेहेता चालिला त्वरित ॥ स्वानंदभरित ते काळीं ॥८२॥
तंव द्वारकेमाजी चक्रपाणी ॥ बैसले असतां सिंहासनीं ॥ जाऊनियां एकांतसदनीं ॥ जवळी रुक्मिणी बोलाविली ॥८३॥
म्हणे नरसी मेहेता भक्तराज ॥ सद्भावें अनुसरला मज ॥ त्याचे पुत्राचें लग्न आज ॥ गातो निर्लज्ज गुण नाम ॥८४॥
तरी आपण जाऊनि तयाआधीं ॥ स्वअंगें करावी कार्यसिद्धी ॥ ऐसें म्हणूनि कृपानिधी ॥ मेळवी मांदी भक्तांची ॥८५॥
उद्धव अक्रून नारद तुंबर ॥ शुक वाल्मीकि प्रल्हाद थोर ॥ भीष्म विभीषण आणि विदुर ॥ मारुती सत्वर पाचारिला ॥८६॥
सुदामा पेंदा आणि बांकडा ॥ वडजा काना मुका बोबडा ॥ एकडोळा खुजट लंगडा ॥ चिपडा शेंबडा गोपाळ ॥८७॥
ऐसे लहानथोर सकळ ॥ भक्त बोलावूनि ते वेळ ॥ तयांसी सांगे घननीळ ॥ लग्नासी तत्काळ चला कीं ॥८८॥
ऐसें सांगोनि तयांप्रती ॥ बोलाविली जांबवती ॥ सत्यभामा कालिंदी सती ॥ स्वयें श्रीपती बोलावी ॥८९॥
मित्रविंदा आणि याज्ञजिती ॥ लक्ष्मणा आणि मद्रावती ॥ यांसी घेऊनि सत्वरगती ॥ लग्नासी श्रीपती चालिले ॥९०॥
गोपिका घेऊनि वर्‍हाडिणी ॥ शिबिकेंत बैसे माता रुक्मिणी ॥ लागल्या वाजंत्र्यांच्या ध्वनी ॥ घाव निशाणीं घातला ॥९१॥
अष्टसिद्धि सकळ दासी ॥ सवें घेऊनि हृषीकेशी ॥ नरसी मेहेत्याचिया लग्नासी ॥ अतिवेगेंसीं चालिले ॥९२॥
नरसी मेहेता मार्गीं चालत ॥ प्रेमभरें गात नाचत ॥ तयापुढें जगन्नाथ ॥ जाती त्वरित लगबगें ॥९३॥
सन्निध नगर देखतां कृष्णें ॥ सांगूनि पाठविलें त्याकारणें ॥ त्रिपुरांतक ऐकोनि वचनें ॥ विस्मित मनें जाहला ॥९४॥
गांवींचें लोक सांगती मात ॥ लग्न आलें असंख्यात ॥ ठाव न पुरे गांग आंत ॥ कैशी मात करावी ॥९५॥
उपरिया माड्यांवर चढोनी ॥ लोक पाहती विलोकूनी ॥ मंगळवाद्यें वाजतां ऐकतां कर्णीं ॥ गगन भरूनि कोंदलें ॥९६॥
ग्रामवासी घेऊनी लोक ॥ सामोरा चालिला त्रिपुरांतक ॥ वाजंत्र्यांचा जोड एक ॥ घेऊनियां देख निघाला ॥९७॥
जैसा उगवतां वासरमणी ॥ चांदण्या जाती हारपोनी ॥ कीं समुद्रजळ देखोनि नयनीं ॥ थिल्लर मनीं लज्जित ॥९८॥
गरुडाचे उड्डाणापुढें ॥ शलभ काय तें बापुडें ॥ अमूल्य रत्नांचियापुढें ॥ कांचखडे झांकोळती ॥९९॥
कीं सिद्धांतज्ञानियापुढें ॥ धादांत हारपे बापुडें ॥ किंवा सज्ञान पंडितापुढें ॥ मूर्ख बापुडें लज्जित ॥१००॥
तेवीं वराकडील देखोनि लग्न ॥ सकळ जाहले लज्जायमान ॥ पुरोहित म्हणे जगज्जीवन ॥ मजकारणें पावला ॥१॥
विश्वकर्मा येऊनि आपण ॥ सर्व साहित्य केलें त्याण ॥ दिव्य मंडप विस्तीर्ण ॥ बैठका संपूर्ण साधिल्या ॥२॥
लोडें तिवाशा गालिचे ॥ चौक घातले नानापरींचे ॥ रंभा तिलोत्तमा येऊनि नाचे ॥ देव स्वर्गींचें पाहाती ॥३॥
नानापरींचीं उपायन ॥ केशर कस्तूरी सुगंध चंदन ॥ वरासमवेत नारायण ॥ तेथें येऊन बैसले ॥४॥
भोंवत्या शोभती वर्‍हाडिणी ॥ मध्यें बसली माता रुक्मिणी ॥ नरसी मेहेत्याची राणी ॥ बैसली येऊनी सन्निध ॥५॥
नानापरींचे सुमनहार ॥ गळां घातले परिकर ॥ वैष्णवमेळीं स्वानंदनिर्भर ॥ शारंगधर बैसले ॥६॥
सवें घेऊनि ग्रामवासी लोक ॥ सामोरा आला त्रिपुरांतक ॥ जवळी येतां सम्यक ॥ वैकुंठनायक ऊठिले ॥७॥
सकळ भक्तांसमवेत हरी ॥ सोयर्‍यांसी भेटले ते अवसरीं ॥ त्रिपुरांतकासी मुरारी ॥ मधुरोत्तरीं बोलत ॥८॥
म्हणे नदीस पूर आलिया बरा ॥ भोंपळा पाववी पैलतीरा ॥ तेवीं नरसी मेहेता तुम्हांसी खरा ॥ सखा सोयरा जोडला ॥९॥
कां आयुष्य सरतिये वेळ ॥ सुधारस चुकवी मृत्युकाळ ॥ तेवीं नरसी मेहेता भक्त प्रेमळ ॥ सोयरा केवळ तुम्हांसी ॥११०॥
कामक्रोधादि अहंभाव ॥ भवरोगें पीडला होता जीव ॥ तेचि निवारावया सर्व ॥ सोयरा वैष्णव केला कीं ॥११॥
कीं लोह परिसासी लागतां जाण ॥ अलंकार करिती श्रीमंत जन ॥ तेवीं याच्या योगें तुमचें दर्शन ॥ आम्हांकारण घडलें कीं ॥१२॥
ऐकोनि त्रिपुरांतक बोले वचन ॥ आपुलें सांगा जी नामाभिधान ॥ जाहलें नव्हतें कधीं दर्शन ॥ केलें आगमन कोठोनि ॥१३॥
ऐकोनि बोले देवाधिदेव ॥ सांवळसा आमुचें नांव ॥ नरसी मेहेत्याचा देवघेव ॥ करितों सर्व निजांगें ॥१४॥
गुमास्तेगिरी करितों त्याची ॥ द्वारकेमाजी वस्ति आमुची ॥ निजखूण याचे जीवींची ॥ एक मीच जाणता ॥१५॥
ऐसें बोले जगज्जीवन ॥ परी कोणासी न कळे निजखूण ॥ तो मायालाघवी मनमोहन ॥ न कळे महिमान तयाचें ॥१६॥
सीमांतपूजन करावयासी ॥ वस्त्रें आणिलीं जीं वरासी ॥ तीं नीच म्हणोनि अर्पावयासी ॥ लज्जित मानसीं जाहले ॥१७॥
ऐसें जाणोनि वैकुंठनाथ ॥ त्रिपुरांतकासी काय बोलत ॥ लग्न तों आलें अगणित ॥ संकोचे चित्त तूमचें ॥१८॥
तरी स्वयंपाक करितां रुचिकर ॥ त्यांत लवण न घालावें फार ॥ आणि आपुलेपरीस थोर ॥ सोयरा साचार न करावा ॥१९॥
आणि आपुले गांवींचा राजा जाण ॥ त्यासी न द्यावें व्याजी धन ॥ तेवीं सोयरा थोर पाहून ॥ कन्यादान न करावें ॥१२०॥
कीं कवीश्वराची वाणी ॥ वाद घालितां न पुरे कोणी ॥ तेवीं सोयरा थोर आपणाहूनी ॥ सर्व जनीं न करावा ॥२१॥
जैसा उदयासी येतां गभस्ती ॥ तेजोहीन दिसे निशापती ॥ तेवीं नरसी मेहेत्याची देखोनि संपत्ती ॥ संकोच चित्तीं जाहला ॥२२॥
सामग्री केली असेल किंचित ॥ लग्न तों आलें अपरिमित ॥ ऐसें बोलोनि वैकुंठनाथ ॥ विचार सांगत तयासी ॥२३॥
त्रिपुरांतकासी म्हणे घननीळ ॥ जें साहित्य असेल अनुकूळ ॥ तें येथें आणोनि तत्काळ ॥ न्यावें मंगळ सिद्धीसी ॥२४॥
सर्वसिद्धि अनुकूळ येथ ॥ किंचित आणोनि टाकीं यांत ॥ मनीं होऊनि संकोचित ॥ चित्तीं द्वैत न धरावें ॥२५॥
शरीरसंबंधाच्या साठीं ॥ पडिल्या रेशमाच्या गांठी ॥ विचरा करूनि ज्ञानदृष्टीं ॥ द्वैत पोटीं न धरावें ॥२६॥
अवश्य म्हणोनि तये क्षणीं ॥ नगरासी गेला परतोनी ॥ वधूसह साहित्य घेऊनी ॥ आला परतोनि त्या ठाया ॥२७॥
भीमकराजा अनन्यभक्ती ॥ कन्या अर्पोनि श्रीपती ॥ मूळमाधवीं सत्वरगती ॥ लग्नासी प्रीतीं पावला ॥२८॥
तयापरी त्रिपुरांतक ॥ विरोधभाव त्यागोनि देख ॥ वधूसह साहित्य सकळिक ॥ घेऊनियां पातला ॥२९॥
गंगेंसी ओहळ मिळतां जाण ॥ तयासी अपवित्र म्हणे कोण ॥ तेवीं अंगिकार करितां जगज्जीवन ॥ भाविकासी उणें न ये कीं ॥१३०॥
लग्न मांडिलें अति गजरें ॥ वाद्यें वाजती मंगलतुरें ॥ हळदी लाविल्या परिकरें ॥ सोहळा थोर मांडला ॥३१॥
देवकप्रतिष्ठा ब्राह्मणभोजनें ॥ नानापरींचीं दिव्यान्नें ॥ द्विजांसी अर्पूनि नारायणें ॥ दक्षिणादानें दीधलीं ॥३२॥
नरसी मेहेत्यासी श्रीपती ॥ अहेर अर्पी निजप्रीतीं ॥ तों अस्तमाना पातला गभस्ती ॥ विप्र बोलती मंगलाष्टकें ॥३३॥
दुर्वासें छळितां अंबरीषासी ॥ दहा गर्भवास अंगें सोशी ॥ तो देवाधिदेव वैकुंठवासी ॥ वधूवरांसी रक्षिता ॥३४॥
जयाचें करितां नामस्मरण ॥ सकळ दुरितें जाती जळोन ॥ तो द्वारकावासी मनमोहन ॥ याकारणें रक्षिता ॥३५॥
ब्रह्मादि शंकर जयासी ॥ अखंड ध्याती निजमानसीं ॥ तो भक्तवत्सल हृषीकेशी ॥ वधूवरांसी रक्षिता ॥३६॥
तूं देवाधिदेव सनातन ॥ क्षीरसागरीं शेषशयन ॥ लक्ष्मीकांत जगजीवन ॥ वधूवरांसी रक्षीं कां ॥३७॥
ऐसीं अष्टकें म्हणूनी ॥ लग्न लाविलें तेव्हां ब्राह्मणीं ॥ वाद्यें वाजती मंगळध्वनी ॥ घाव निशाणीं घातला ॥३८॥
जेथें आला वैकुंठनायक ॥ उणा पदार्थ न दिसे तेथ ॥ कन्यादानीं अपरिमित ॥ विप्रांसी देत दक्षिणा ॥३९॥
ग्रामवासी सकल जन ॥ त्यांसी दिधलें इच्छाभोजन ॥ दिव्यालंकार वस्त्रभूषणें ॥ वधूवरांकारणें दीधलीं ॥१४०॥
धन्य धन्य तेथींचे जन ॥ जयांसी भेटले नारायण ॥ दोन्ही पक्षीं जगज्जीवन ॥ सोहळा संपूर्ण करीतसे ॥४१॥
संभ्रमें मिरवती वर्‍हाडिणी ॥ लागल्या वाजंत्रांच्या ध्वनी ॥ चारी मुक्ती अंगें येऊनी ॥ पायीं लोळणी घालितीं ॥४२॥
नळे हवया चंद्रज्योती ॥ नानापरींचीं यंत्रें सुटती ॥ अष्ट नायिका गात नाचती ॥ वैष्णव गर्जती हरिनामें ॥४३॥
नानापरींचे सोहळे करूनी ॥ सन्मुख पाहे माता रुक्मिणी ॥ नरसी मेहेत्याची राणी ॥ विस्मित मनीं जाहली ॥४४॥
पांच दिवस करूनि लग्न ॥ साडे करीत जगज्जीवन ॥ वर्‍हाडियांसी श्रीकृष्णें ॥ वस्त्रें भूषणें अर्पिलीं ॥४५॥
त्रिपुरांतकासी पुसोनि त्वरित ॥ काय बोले वैकुंठनाथ ॥ सोयरा केला विष्णुभक्त ॥ देखिला परमार्थ प्रपंची ॥४६॥
लग्नासमवेत वर्‍हाडी ॥ परतोनि आले जुन्यागडीं ॥ नरसी मेहेता श्रीकृष्णप्रौढी ॥ गातो गोडीं हरिनाम ॥४७॥
नरसी मेहेत्याकारण ॥ कानीं सांगे जगज्जीवन ॥ कांहीं संकट पडतां जाण ॥ माझें चिंतन करावें ॥४८॥
ऐसें बोलोनि तयाप्रती ॥ द्वारकेसी गेला रुक्मिणीपती ॥ पुढें सादर होऊन श्रोतीं ॥ अवधान प्रीतीं मज द्यावें ॥४९॥
अहो भक्तविजयग्रंथ जाण ॥ कीं हें कोमळ तुळसीचें वन ॥ भीमातीरवासी रुक्मिणीरमण ॥ ये स्थळीं जाण वसतसे ॥१५०॥
आवडी सप्रेम जीवन ॥ त्यावरी वर्षला आनंदघन ॥ भाविक सभाग्य वैष्णव जन ॥ जाहले ऐकूनि निजसुखी ॥५१॥
पुढील अध्यायीं रसाळ कथा ॥ हुंडी लिहील नरसी मेहेता ॥ महीपति म्हणे सभाग्य श्रोता ॥ सादर श्रवणार्था असावा ॥५२॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ अष्टविंशाध्याय रसाळ हा ॥१५३॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥ अध्याय ॥२८॥ ओंव्या ॥१५३॥
श्रीभक्तविजय अष्टविंशाध्याय समाप्त

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री भक्तविजय अध्याय २७