Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा देत सोडला देश, हिंसाचारात 90 हून अधिक मृत्युमुखी

sheikh haseena
, सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (15:08 IST)
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा देत देश सोडला आहे. या वृत्ताची बांगलादेशमधील बीबीसी प्रतिनिधीने पुष्टी केली आहे.
शेख हसिना यांच्याबरोबर त्यांची बहीणही असल्याची माहिती आहे. विद्यार्थी आंदोलनानं तीव्र स्वरुप घेतल्यानंतर शेख हसिना यांनी हे पाऊल उचललं आहे.
समोर येत असलेल्या ताज्या माहितीनुसार हजारो आंदोलकांनी ढाक्यामधील पंतप्रधान निवासावर हल्लाबोल केला आहे.
बांगलादेशात सरकारविरोधी ताज्या हिंसाचारात किमान 90 जण मारले गेले आहेत. याठिकाणी पोलीस आणि सरकारविरोधी आंदोलकांमध्ये संघर्ष चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बांगलादेशातील सिल्हेट येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांनी देशात राहणाऱ्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांना दूतावासाशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे.
विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करत नागरी असहकाराची चळवळ सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा हिंसक आंदोलन सुरू झालं आहे.
सिराजगंज जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर एकाचवेळी हजारो लोकांनी हल्ला केला. यात 13 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी रविवारी काही भागांमध्ये आंदोलकांवर रबरी गोळ्या आणि अश्रुधुराचा मारा केल्याचंही पाहायला मिळालं. यामध्ये सुमारे 200 जण जखमी झाले आहेत.
देशभरात सुरू असलेल्या या आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनानं रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे.
गेल्या महिन्यात बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेली कोटा सिस्टीम बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं होतं. पण आता या आंदोलनानं सरकारविरोधी आंदोलनाचं व्यापक रूप घेतलं आहे.
बांगलादेशमधील प्रशासन या प्रकरणात संयम बाळगत असल्याचं, कायदे मंत्री अनिसुल हक यांनी बीबीसीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
 
“आम्ही संयम दाखवला नसता, तर प्रचंड रक्तपात झाला असता. पण आमच्या संयमालाही मर्यादा आहेत,” असं हक म्हणाले.
बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
ढाका परिसरातील 4G इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून ब्रॉडबँड सेवा सुरू राहणार असल्याचं, बांगलादेश टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी कमिशन (BTRC) च्या अधिकाऱ्यांनी बीबीसी बंगालीशी बोलताना सांगितलं.
4G आणि 3G चा वापर करून लोकांना मोबाईलद्वारे संवाद साधता येणार नाही. या सेवा कधी पूर्ववत होतील, याबाबत मात्र काहीही माहिती समोर आलेली नाही.
 
हसिनांनी पायउतार व्हावे-आंदोलक
देशभरात आंदोलकांचे मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना समोर येत आहे. बोगरा, पाब्ना आणि रंगपूर या जिल्ह्यांतही अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत.
 
बांगलादेशातल ढाक्याच्या मुख्य चौकात हजारो लोक जमल्याचं पाहायला मिळालं. तसंच देशभरात इतर भागांतही हिंसक आंदोलनं पाहायला मिळाली आहेत.
काही भागांमध्ये आवामी लीगचे समर्थक आणि सरकारविरोधी आंदोलक यांच्यात संघर्ष होत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
“संपूर्ण शहरालाच जणू युद्धभूमीचं रूप आलं आहे,” अशी प्रतिक्रिया एका पोलीस कर्मचाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. हजारोंच्या संख्येत आलेल्या आंदोलकांनी रुग्णालयाबाहेरच्या कार, दुचाकींना आग लावल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
सरकारविरोधी आंदलोनामागं असलेल्या 'स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन' या गटानं पंतप्रधानांनी पायउतार व्हावं अशी मागणी केली आहे.
 
या गटानं रविवारपासून देशभरात असहकार चळवळीची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत नागरिकांनी कर आणि सेवांची बिलं न भरण्याची विनंती करण्यात आली आहे. तसंच सर्वप्रकारचे कारखाने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. जुलैमध्ये बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात सुमारे 200 हून अधिक लोक मारले गेले होते. त्यापैकी अनेकजण पोलिसांच्या गोळीनं मारले गेले होते.
 
भारतीय दूतावासाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
बांगलादेशातील सिल्हेट येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांनी तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यांना दूतावासाशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे.
 
भारतीय सहाय्यक उच्चायोगाने म्हटले आहे की, "सिल्हेटमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या संपर्कात राहण्याची विनंती करण्यात आली आहे आणि त्यांनी सतर्क रहावं."
 
दूतावासाकडून आपत्कालीन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. "आपत्कालीन परिस्थितीत, कृपया +88-01313076402 वर संपर्क साधा," अशा सूचना भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
बांगलादेशातील भारतीय दूतावासाने 18 जुलै रोजी जारी केलेल्या सूचना त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पिन करून ठेवल्या आहेत.
 
या सल्ल्यानुसार, "लोकांना स्थानिक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जे लोक जिथे आहेत तिथेच थांबण्याचा आणि घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे."
 
दोन आठवड्यांत 10 हजार आंदोलकांना अटक
गेल्या दोन आठवड्यांत सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सुमारे 10,000 लोकांना अटक करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विरोधकांचे समर्थक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
 
आवामी लीगच्या वतीनंही रविवारी देशभरात मोर्चे काढण्यात आले.या दोन्ही गटांसाठी आगामी काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत."शेख हसिना यांनी फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांच्यावर लोकांची हत्या, लूटमार आणि भ्रष्टाचार प्रकरणी खटला चालवायला हवा,” अशी मागणी विद्यार्थी नेते नाहीद इस्लाम यांनी केली आहे. शनिवारी ढाक्यात हजारो लोकांना संबोधित करताना त्यांनी ही मागणी केली.

हे आंदोलन म्हणजे शेख हसिना यांच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. जानेवारीत झालेल्या निवडणुकीत सलग चौथ्यावेळी शेख हसिना यांची सत्ता आली होती. पण प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला.
त्यानंतर बांगलादेशच्या 1971 च्या युद्धात सहभागी असलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांत देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या महिन्यात विद्यार्थी रस्त्यांवर उतरले होते.
 
सरकारच्या एका निर्णयानंतर बहुतांश कोटा कमी करण्यात आला. पण त्यानंतरही या आंदोलनात मृत्यू झालेले आणि जखमी झालेले विद्यार्थी यांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच होतं. आता या विद्यार्थ्यांनी हसिना यांनी पदावरून उतरावं अशी मागणी केली आहे. हसिना यांच्या समर्थकांनी मात्र राजीनामा देऊ नये असं म्हटलं आहे.

शेख हसिना यांनी विद्यार्थ्यांबरोबर बिनशर्त चर्चेची तयारी दाखवली होती. हिंसाचार संपवण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतल्याचं म्हटलं होतं."मला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर बसून त्यांचं म्हणणं ऐकूण घ्यायचं आहे. मला कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको आहे," असं त्यांनी म्हटलं होतं. पण आंदोलक विद्यार्थ्यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळला होता.
 
गेल्या महिन्यात आंदोलनात अनेक पोलीस ठाणी आणि सरकारी कार्यालयं जाळल्यानंतर हसिना यांनी लष्कराला पाचारण केलं होतं.त्यानंतर लष्करानं एक निवेदन जारी केलं होतं. बांगलादेशच लष्कर कायम लोकांबरोबर आहे. लोकांच्या हितासाठी आणि राज्याच्या भल्यासाठी काम करत राहणार असल्याचं त्यात म्हटलं होतं.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पिंपरी चिंचवड शहराला पुराचा फटका, शेकडो कुटुंबं विस्थापित