जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली असून, ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर, भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी जो बायडन यांना शपथ दिली. बायडन यांनी बायबलवर हात ठेवून शपथ घेतली. तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर यांनी त्यांना शपथ दिली.
"हा अमेरिकेचा दिवस आहे. हा लोकशाहीचा दिवस आहे. हा ऐतिहासिक दिवस आहे, आज कुणा एका व्यक्तीचा नाही तर लोकशाही मूल्यांचा उत्सव आहे. आज लोकशाहीचा विजय झाला आहे," असं शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी म्हटलं आहे.
बायडन पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष झाले आहेत यापूर्वी त्यांनी तीनवेळा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात बायडन यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली आहे.
सर्वांत आधी फादर लिओ ओ'डोनोव्हॅन यांनी प्रार्थना म्हटली. त्यानंतर लेडी गागा यांनी अमेरिकेचं राष्ट्रगीत गायलं.