सोमवारी लखनौत झालेल्या आयपीएल लढतीनंतर लखनौ सुपरजायंट्स संघाचा मेन्टॉर गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात वादावादी झाली.
दहा वर्षांपूर्वी गंभीर आणि कोहली एकमेकांशी भिडले होते. त्यावेळी गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तर कोहली बंगळुरूचा कर्णधार होता. त्यावेळी रजत भाटियाने मध्यस्थी करत दोघांना दूर केलं होतं.
गंभीर आणि कोहली दोघेही दिल्लीकर आहेत. अनेक वर्ष एकत्र खेळलेले गंभीर-कोहली जेव्हाही एकमेकांसमोर येतात तेव्हा वाद निर्माण होतो. पण अनेक वर्षांपूर्वी या दोघांचा समावेश असलेल्या लढतीत एक सुखद घटना पाहायला मिळाली होती.
24 डिसेंबर 2009 रोजी इडन गार्डन्स इथे भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मुकाबला झाला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 315 धावांचा डोंगर उभारला होता. श्रीलंकेतर्फे सलामीवीर उपुल थारंगाने 14 चौकार आणि 2 षटकारांसह 118 धावांची खेळी केली. कर्णधार कुमार संगकाराने 60 धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारतातर्फे झहीर खान, आशिष नेहरा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था 23/2 अशी झाली. वीरेंद्र सेहवाग (10) आणि सचिन तेंडुलकर (8) झटपट माघारी परतले. पण यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी 224 धावांची मॅरेथॉन भागीदारी करत विजयाचा पाया रचला.
गंभीरने 14 चौकारांसह नाबाद 150 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 11 चौकार आणि एका षटकारासह 107 धावांची खेळी केली. विराट कोहलीचं वनडेतलं हे पहिलंच शतक होतं. भारतीय संघाने 11 चेंडू आणि 7 विकेट्स राखून विजय मिळवला.
दीडशतकी खेळीसाठी गंभीरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार घेताना गंभीरने सांगितलं की विराटने वनडेतलं पहिलंवहिलं शतक झळकावलं आहे. माझ्यापेक्षा तोच या पुरस्काराचा खरा मानकरी आहे. मी हा पुरस्कार त्याला देऊ इच्छितो. असं म्हणून गंभीरने कोहलीला मंचावर बोलावलं. त्याला पुरस्कार दिला.
त्यानंतर बोलताना गंभीरने सांगितलं, "दवाचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल हे आम्हाला माहिती होतं. आम्ही काही दिवसांपूर्वी इथे खेळलो तेव्हा ग्रॅमी स्मिथने शतक झळकावलं होतं. आज आम्ही दोन विकेट झटपट गमावल्या पण विराट सकारात्मक पद्धतीने खेळणारा खेळाडू आहे. तो वेगाने धावा करतो. त्यामुळेच मला स्थिरावण्याची संधी मिळाली. विराटने माझ्यावरचं दडपण कमी केलं. 35व्या षटकापर्यंत भागीदारी नेऊ आणि नंतर काय होतंय ते पाहूया असा आमचा विचार होता. पण आम्हाला पॉवरप्ले घ्यावाच लागला नाही. गेल्या दोन डावात मला मोठी खेळी करता आली नव्हती. पण या लढतीत शतकी खेळी साकारून संघाच्या विजयात योगदान देता आलं याचा आनंद आहे. इडन गार्डन्स इथे शतक झळकावण्याचा आनंद अनोखा आहे".
या सामन्यात विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली होती. त्यावेळी गौतम गंभीरच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं.
Published by -Priya Dixit