Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई आणि पुण्यात आज लढत

मुंबई आणि पुण्यात आज लढत
WD
सहाव्या आयपीएल ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेतून प्ले ऑफ फेरीच्या आशा संपलेला पुणे वॉरिअर्स आणि मुंबई इंडियन्स या संघामध्ये शनिवारी 11मे रोजी ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे. मुंबईच्यादृष्टीने हा सामना महत्त्वपूर्ण असा आहे.

मुंबईने बारा सामन्यातून आठ विजय चार पराभवांसह (16 गुण) आपल्या प्ले ऑफ फेरीच्या आशा प्रफुल्लित केल्या आहेत. आता त्यांना चार साखळी सामने खेळावाचे आहेत. या चारपैकी दोन सामन्यात विजय मिळविला तरी मुंबईचा संघ प्ले ऑफ फेरी गाठू शकतो. त्यासाठी मुंबईला पुण्याविरुद्धध विजय मिळवावा लागेल. पुणे संघ हा तळाशी आहे. त्यांनी 13 सामन्यातून फक्त 2 विजय मिळविले आहेत, तर 11 सामने गमावले आहेत. त्यांचे फक्त चार गुण आहेत. 13 एप्रिल रोजी मुंबईने पुणे वॉरिअर्सचा 41 धावांनी मुंबईतील वानखेडेवर पराभव केला होता.

हा परतीचा साखळी सामना पुण्यात खेळला जात आहे. पुणे संघाला त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि या पराभवाची परतफेड करण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. गुरुवारी रात्री कोलकाता नाईट राडर्सने 152 धावांचे आव्हान दिले. परंतु, पुण्याला 106 धावाच करता आल्या. पुण्याचे फलंदाज त्यांच्या फिरकीपुढे गडगडले. सलामीचा रॉबिन उथप्पा (31) आणि अष्टपैलू अँजेलो मॅथूज (40) या दोघांनीच थोडाफार प्रतिकार केला. युवराजसिंगने या स्पर्धेत एकच अर्धशतक पूर्ण केलेले आहे. त्याने 10 सामन्यातून 172 धावा जमविल्या आहेत. धोकादायक फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा पाठदुखीमुळे मायदेशी परतला आहे. गोलंदाजी ही पुणे संघाची डोकेदुखी आहे. डेथ ओव्हर्समध्ये ते फार धावा देतात. अशोक डिंडाने मुंबईविरुद्ध 63 धावा दिल्या होत्या.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने साखळी गुणतक्त्यात तिसरे स्थान घेताना चेन्नई सुपर किंग्ज (60) आणि माजी विजेता कोलकाता नाईट राडर्स (65 धावांनी) यांना पराभूत केले होते. त्यामुळे त्यांचा विश्वास बळावला आहे. कोलकाताविरुद्धच सामन्यात सचिन तेंडुलकरला फलंदाजीत सूर गवसला आहे. वेस्ट इंडीजचा ड्वेन स्मिथ हा फॉर्ममध्ये आहे. त्याने आठ सामन्यात दोन अर्धशतकांसह 263 धावा केलेल्या आहेत. मधली फळी ही मुबईची ताकद आहे. 12 सामन्यातून यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने 388 तर रोहित शर्मान 430 धावा काढल आहेत.

मुंबईने सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याला खरेदी केले आहे. परंतु, अद्यापि त्याला खेळवलेले नाही. त्याळे कदाचित त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. डावखुरा वेगवान मिशेल जॉन्सन (17 बळी) आणि लसित मलिंगा याने मुंबईचे आक्रमण सांभाळले आहे. फिरकीपटू हरभजनसिंग (16) आणि प्रगन ओझा (14) हे दोघेही उत्तम मारा करीत आहेत. मुंबईचे पारडे हे जड आहे. परंतु, ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये कोणत्यावेळी काय घडेल हे सांगता येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi