जालंधर- बहुतांश स्मार्टफोन्स हातातून निसटून खाली पडतात आणि त्यामुळे स्क्रीनवर भेगा निर्माण होतात. त्या ठीक करण्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो. आता संशोधकांनी क्रॅकप्रूफ टचस्क्रीन विकसित केली आहे. ही स्क्रीन कधीही तुटणार नाही की तिला तडा जाणार नाही असा त्यांचा दावा आहे.
इंग्लंडच्या ससेक्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ही स्क्रीन विकसित केली आहे. ही स्क्रीन लवचिक आणि स्वस्तही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही स्क्रीन बनवण्यासाठी ग्राफिन आणि चांदीचा वापर करण्यात आला आहे. चांदीच्या नॅनो वायर्समध्ये ग्राफिनला संयुक्त करुन त्यांनी एक वेगळेच मटेरियल बनवले. या मटेरियलपासून बनवलेली ही टच स्क्रीन सध्याच्या सक्रीनपेक्षा अनेक बाबतीत सरस आहे.