प्रेमविवाहपूर्वीच 'गडबड झाली' तरुणांनो सावधान हा धम्माल,कौटुंबिक गडबळ गोंधळ असलेला विनोदी चित्रपट शुक्रवार, 1 जून रोजी प्रदर्शित होत आहे.
प्रांजली फिल्म प्रॉड्रक्शन निर्माता डॉ. जितेंद्र राठोड यांचा हा पहिला धम्माल विनोदी चित्रपट असून सहनिर्माता रमेश रोशन तर लेखक, दिग्दर्शक संतराम हे आहे. संतराम यांचाही हा पहिला सिनेमा असला तरी यापूर्वी त्यांनी एकता कपूर व सचिन पिळगावकर यांच्या कितीतरी मालिकांसाठी मुख्य सहायक दिग्दर्शक व दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. राजेश शृंगारपुरे, नेहा गद्रे या रोमॅन्टीक जोडीसोबत गडबड करणारे विकास पाटील, संजय मोहिते, अक्षता पाटील, उषा नाडकर्णी, हर्षा गुप्ते, प्रतिभा भगत, हर्षी, प्रमोद शिंदे, निरंजन नलावडे, रूपा आणि मोहन जोशी हे कलावंत धम्माल करताना पाहावयास मिळणार आहेत.
या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातील रोमॅन्टीक गाणे खास कुलूमनाली येथे मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये बर्फात राजेश शृंगारपुरे व नेहा गद्रे या जोडीवर चित्रीत करण्यात आले आहे.
हे गाणे कानाबरोबरच डोळ्यांनाही सुखावणारे आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन अनिल पवार यांनी केले असून ते हसायला आणि विचार करायला लावणारे खुसखुशीत असे आहेत. छायाचित्रण संदीप शिंदे (सॅण्डी), अॅक्शन प्रशांत नाईक, आर्ट डायरेक्टर पप्पू राज प्रॉड्रक्शन कंट्रोलर अजय सिंग मल्ल यांचे आहे. या चित्रपटातील चारही गाणी सदैव आठवणीत राहतील आणि नाचायला लावतील, अशी असून ती रमेश रोशन यांनी स्वरबध्द केली आहेत. गीतकार मंगेश कांगणे, यतिन त्रिंबकर, योगिराज माने हे असून स्वप्निल बांदोडकर, आदर्श शिंदे, बेला शेंडे, रमेश सोनवणे, वैशाली माडे, ओम झा, सुवर्णा दत्त आणि खुशबू जैन हे गायक आहेत.
लग्नाच्या मांडवातून नवरी मुलगी पळून गेल्यावर घराण्याची इज्जत वाचविण्यासाठी प्रीतीच्या कुटुंबाने जो काही गोंधळ घातला तो खूपच विनोदी असला तरी करमणूक हा या चित्रपटाचा गाभा नाही, परंतु हल्ली प्रेमप्रकरणात पडून फसणारंचे प्रमाण वाढल्याने आपली मुलगी अशा प्रकरणाला बळी पडून फसू नये हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला असून कुटुंबासह पाहावा, असाच हा चित्रपट आहे.