Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महालक्ष्मी मंदिर डहाणू

dahanu mahalakshmi

वेबदुनिया

ऑक्टोंबर महिन्यात शारदीय नवरात्री सुरु होणार आहे. भारतात अनेक प्राचीन देवी मंदिरे आहे. तसेच आधुनिक उभारलेले मंदिर देखील प्रेक्षणीय आहे. महाराष्ट्राताला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तसेच महाराष्ट्रात प्राचीन देवी मंदिरे देखील आहे. त्यापैकी एक आहे डहाणूची महालक्ष्मी. डहाणूची महालक्ष्मी हे एक जागृत देवस्थान मानले जाते. 
 
मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणू रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असणाऱ्या महालक्ष्मीचे हे देवस्थान जागृत आहे. या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून पुढे 15दिवस चालते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या जत्रेसाठी भाविक येतात. तसेच डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्र देखील मोठ्या उत्साहात साजरे होते. लाखोंच्या संख्येने भाविक देवी आईच्या दर्शनासाठी येतात. 
 
देव, धर्म, धार्मिक संस्कार, श्रद्धा यांचा पगडा भारतीय जनमाणसावर सर्वात जास्त आहे. मनः शांती मिळविण्यासाठी जे उत्तम, उन्नत, महामंगल असते, त्याकरिता नतमस्तक होणे हा मानवी स्वभाव धर्मच आहे. आदिशक्ती महालक्ष्मीची महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी स्थाने आहे. यातीलच एक महत्वाचे स्थान म्हणजे डहाणूची महालक्ष्मी.  
 
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे. या लोकात ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली. गुजरातमधील सुपीकता धार्मिकता पाहण्यासाठी घनदाट जंगल, दऱ्या, डोंगर पार करत महालक्ष्मी देवी प्रवासाला निघाली. त्यामुळे त्या भागातील राक्षस दैत्यांची झोप उडाली. महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून राक्षसांचे डोळे क्रोधाने लाल झाले. महालक्ष्मीने अवतार घेत राक्षसदैत्यांना त्रिशूळाने ठार केले. राक्षसाबरोबर झालेल्या युद्धात देवी दमली. तिला विश्रांतीची गरज भासू लागली. विश्रांतीसाठी तिची नजर जवळ असलेल्या मुसा डोंगरावर गेली. हेच डोंगराचे शिखर आपल्याला विश्रांतीसाठी योग्य आहे, असे तिने ठरविले. महालक्ष्मी देवीचे वास्तव रानशेतच्या डोंगरावर दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे आहे, अशी आख्यायिका आहे.
 
वंशपरंपरेने डहाणूतील वाघाडी या गावातील सातवी कुटुंबाकडे मंदिर व्यवस्थापन व पूजेचा हक्क आहे. मातेचे एक मंदिर गडावर आहे. तर दुसरे मंदिर पायथ्याशी आहे. या गड पायथ्याशी महामार्गालगत असलेल्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. डोंगरावरील देवीचे मूळ वास्तव असलेले मंदिर मात्र आता सुंदररित्या बांधले गेले आहे. मंदिराचा गाभारा सजवला गेला आहे.
 
तसेच या मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगरावर देवीचे मुख्य ठाणे दोन कड्यांच्या गुहेत आहे. ज्या भाविकांना अथवा पर्यंटकांना डोंगरावर चढून जावयाचे आहे, त्यांच्यासाठी चारेाटीपासून 6 किमी तर वरील वधवा गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे. साधारणतः 900पायऱ्या चढून जाव्या लागतात. गडावर जाण्यासाठी दुसरा रस्ता पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी मंदिरापासून सुरु होतो. देवीच्या डोंगरावरील स्थानावर जाण्यासाठी 200फूट भुयारातून जावे लागते. या उंच ठिकाणी पाण्याचा झरा व कुंड आहे. विशेष म्हणजे येथील पाणी कधीच कमी होत नाही.
 
या मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे. मूर्ती गाभाऱ्यांत असून देवीचा मुखवटा दर्शनी आहे. तो दोन फूट उंचीचा लांबट चेहऱ्याचा आहे. मस्तकावर चांदीचा मुकुट आणि कुंडले आहेत. मागील बाजूस भव्य पाषाण असून याच पाषाणाचा दर्शनी मुखवटा कोरुन काढला आहे. मुखवट्याला सोने चांदी अलंकारांनी सजवले असून मुखवट्यासमोर सिंह आणि जय-विजय यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. बाजूला सभा मंडप, यज्ञकुंड, दीपमाळा त्यांच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. समोर देवीचा ध्वज लावण्यासाठी उंच लाकडी खांब उभा आहे.
 
यात्रा काळात विविध धार्मिक विधी, उत्सव येथे पार पडतात. चैत्र पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री 12.०० वा पुजारी ध्वज पूजेचे साहित्य, नारळ घेवून पायथ्याच्या मंदिरापासून धावत जातो व तीन मैलाचे अंतर पार करुन रात्री तीन वाजता डोंगरावर चढतो. तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो व सकाळी 7.०० वा. परत येतो. डोंगरावर 600फूट अंतरावर ध्वज लावण्यासाठी जातो.
 
अकबर बादशहाच्या वेळी राजा तोरडमल येथे आला होता. त्याने देवीचे दर्शन घेतले होते,अशी इतिहासांत नोंद आहे. तसेच, पंजाबचा राजा रणजित सिंह याने पंजाब सर केल्यावर देवीची महापूजा करुन मंदिरावर सोन्याचा कळस चढवल्यांची नोंद आहे.
 
डहाणूची महालक्ष्मीला जावे कसे?  
रस्ता मार्ग-   
पालघर जिल्ह्यातील रस्ते शेजारील जिल्ह्यातील रस्त्यांशी जोडलेले आहे.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसने महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जात येते. तसेच मुंबई, ठाणे, डहाणू आणि नाशिक येथून दररोज परिवहन महामंडळाच्या बस सेवा पालघर जातात.  
 
विमान मार्ग-
डहाणूपासून जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई हे पालघर पासून दोन तास अंतरावर आहे. तसेच विमान तळावरून कॅब किंवा टॅक्सीच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचता येते.  
 
रेल्वे मार्ग-
पालघरमधील डहाणूजवळ डहाणू रोड रेल्वे स्टेशन आहे. मुंबई वरून डहाणू येथे जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे. तसेच स्टेशनवरून तुम्ही कॅब किंवा रिक्षाच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचू शकतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला