मनसेचे बेलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गजानन काळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मनपा कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मनपाच्या एकूण 1000 कामगारांनी स्वतः पैसे जमा करत गजानन काळे यांची अनामत रक्कम भरली.
कामगारांसाठी लढणारा, आमचे थकीत पगार मिळवून देणारा, आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी एका हाकेवर धावून येणारा, आमच्या सुरक्षेची काळजी घेणारा उमेदवार गजानन काळे आमदार व्हावा अशीही सदिच्छा यावेळी उपस्थित कामगारांनी व्यक्त केली. या कामगारांनी गजानन काळे यांच्या विजयासाठी त्यांना घराघरात घेऊन जाऊ, अशीही भावना व्यक्त केली. नवी मुंबई मनपा कामगारांच्या या प्रतिसादाने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
गजानन काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः अमित ठाकरे यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते. काळे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात बेलापूर मतदारसंघात 151 झाडे लावून केली.