Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनोज जरांगे सभा : पाटिलकीची उतरत चाललेली नशा आणि ‘20 रुपयांचं पेट्रोल’

Manoj Jarange
, रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (17:38 IST)
मनोज जरांगे यांची जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात शनिवारी (14 ऑक्टोबर) रोजी सभा पार पडली.
गेला आठवडाभर मी रिपोर्टिंगदरम्यान मराठवाड्यात फिरत असताना या सभेला लोकांची प्रचंड गर्दी जमणार अशी कल्पना आली होती.
 
12 ऑक्टोबर रोजी संभाजीनगरमधील दौलताबाद येथे असताना माझी भेट दोन तरुणांशी झाली. ते पैठण तालुक्यातील होते. आमच्या हातातील कॅमेरा बघून 14 तारखेला अंतरवाली सराटी गावात येणार का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
पाटील लोकांना आरक्षण कशासाठी हवंय, पाटील लोकांकडे काय कमी आहे, असा उपरोधिक स्वरात सवाल केल्यावर त्यानं म्हटलं, “पूर्वी होते पाटील. आता काही नाही राहिलं पाटिलकी वगैरे. आता गरीब झालाय समाज.”
 
10 ऑक्टोबरला जालन्यात एका बातमीनिमित्तानं गेलो असताना जरांगेंच्या सभेचा विषय निघाल्यावर एकानं मला सांगितलं, “आमच्या भागातील गावं कुलूप बंद ठेवणार आहेत. गावच्या गावं जरांगेंच्या सभेला जाणार आहेत.”
14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत हे प्रत्यक्ष दिसून आलं. जवळपास 150 एकर क्षेत्रावर लोकच लोक दिसत होते.
 
सकाळी 7 वाजता लोकांचे लोंढेंच्या लोंढे सभास्थळी येत होते. आम्ही स्वत: 2 किलोमीटर पायी चालत सभास्थळ गाठलं.
 
आमच्या एका पत्रकार मित्राला 6 किलोमीटर पायी चालत गेल्यावर सभास्थळ गाठता आलं.
 
सभास्थळी ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ असं लिहिलेल्या टोप्या तरुणांनी घातल्या होत्या.
 
सभास्थळी असलेल्या बॅनरवर, ‘एकच मिशन, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण’ असं लिहिलेले मोठमोठे बॅनर्स दिसून आले.
 
त्यावर जरांगेंचा उल्लेख ‘मराठा योद्धा’ असा करण्यात आला होता.
 
जरांगे ज्या स्टेजवरून लोकांना संबोधित करणार होते गरजवंत मराठ्यांचा लढा, असं लिहिण्यात आलं होतं.
 
सभास्थळी आमची भेट किरण पंडितराव खरात यांच्याशी झाली. ते परभणी जिल्ह्यातल्या मालेटाकळी गावातून आले होते.
 
त्यांच्या गावातून 20 गाड्यांमध्ये लोक सभेसाठी आले होते.
ते म्हणाले, “कित्येक वर्षांपासूनचा आमचा आरक्षणासाठीचा लढा आहे. कित्येक मराठा मुख्यमंत्री झाले. आमदार झाले. पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची भावना कधीच राहिली नाही. मनोज जरांगेंसारखं निस्वार्थ नेतृत्व मराठा समाजाला आज लाभलंय. आज आमच्या मराठा समाजाला तेवढा एकच आश्वासक चेहरा दिसतोय.”
 
ते पुढे म्हणाले, “आम्ही पहिले वतनदार होतो, जहागीरदार होतो, पाटिलकी करत होतो, पण कुटुंब विभक्त झाले. प्रत्येकाला शेती थोडीथोडी मिळत गेली. आता सध्या आम्हाला मुंबई-पुण्याला कामधंदा शोधायला जावं लागतं.”
 
विदर्भातल्या शेतकऱ्यांना कुणबीमध्ये समाविष्ट केलं. ते पण शेतकरी आहेत आणि आम्ही पण शेतकऱ्याचे पुत्र आहोत. मग त्यांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय का?, असा सवाल खरात यांनी केला.
दादाराव गावंडे हातात झेंडा घेऊन सभास्थळ गाठण्यासाठी वेगानं चालत होते. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातून ते आले होते.
 
त्यांच्या स्वत:कडे कुणबी प्रमाणपत्र आहे, पण भावकीतल्या आणि आजूबाजूच्या लोकांकडे नाही. त्यांच्यासाठी सभेला आल्याचं ते म्हणाले.
 
“आम्ही तिघं बाप-लेक आलो आहेत. आता नाही तर कधीच नाही,” असं म्हणत ते पुढे निघून गेले.
 
काही तरुण त्यांच्या हातात छोटछोटे भोंगे घेऊन सभास्थळाकडे येत होते. काही जण मराठा, ब्राह्मण आणि ओबीसी समाजातल्या राज्यकर्त्यांना शिव्या देत होते.
 
सभास्थळावर चितेगावच्या तरुणांच्या एक ग्रूप आम्हाला दिसला. हे अगदी विशीतले तरुण होते.
 
यापैकी वैभव गोरे म्हणाला, “आम्हाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. आरक्षण नसल्यामुळे शाळा- कॉलेजात जास्त पैसे जातात. जास्त टक्के पडले तरी आम्ही मागे राहतो. 90 टक्के पडूनही आम्ही मागे राहतो आणि 40 टक्क्यांवाला टॉपला बसतो.”
 
28 वर्षांचा दिनेश औटी हा संभाजीनगरच्या मुदलवाडी गावात राहतो. त्याचं शिक्षण एमए बीएड झालंय.
 
सध्या तो कोचिंग क्लासेस घेत आहेत. बीबीसी मराठीला मी नियमितपणे फॉलो करतो. मला बोलायचं आहे, असं म्हणत तो आमच्याकडे आला.
 
“माझ्या पणजोबाच्या खासरावर (शेतीसंबंधीचा दस्ताऐवज) कुणबी मराठा अशी नोंद आहे. वडिलांच्या टीसीवर हिंदू मराठा आणि माझ्या स्वतःच्या टीसीवरसुद्धा हिंदू मराठा अशी नोंद आहे. तरीही मला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे हे पुरावे असताना मराठ्यांना कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे. माझ्या सख्ख्या चुलत्याच्या टीसीवर कुणबी नोंद आहे, पण आमच्या याच्यावर नाही,” दिनेश सांगत होता.
पण केवळ आरक्षण देऊन मराठा समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का, असा प्रश्न विचारल्यावर दिनेश म्हणाला, “मराठ्यांचे प्रश्न फक्त आरक्षण देऊन सुटणार नाही. पण शिक्षणाचे प्रश्न मिटतील. त्यानंतर बाकीचे प्रश्न आपोआप मिटत जातील.
 
"विषय असा आहे की, पूर्वी 100 एकर जमीन असलेला मराठा आज अडीच एकरवर आलाय. अडीच एकरवाला लाखो रुपये फी भरू शकतो का? आम्हाला राजकीय आरक्षण नको, शैक्षणिक आरक्षण हवंय. विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत हवीय, नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवंय.”
 
सभास्थळी असलेले अनेक जण आमच्याकडे नेमकी गर्दी किती असेल अशी विचारणा करत होते. मीडियावाले आहेत, तुम्हाला माहिती असेल अशी भावना ते बोलून दाखवत होते.
 
सभास्थळी ठिकठिकाणी स्वयंसेवकांची फौज उभी होती. त्यांच्याकडून लोकांना वेळोवेळे सूचना दिल्या जात होत्या.
 
सभेच्या एका बाजूला महिलांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
गेवराई तालुक्यातील धोंडाई गावची सरपंच शितल साखरे गळ्यात भगवा रुमाल टाकून उभी होती.
 
सभेला येण्याचं कारण विचारल्यावर ती म्हणाली, “माझ्या लहान बहिण-भावांना आरक्षण भेटावं यासाठी आम्ही इथं आलो आहोत. त्यांना शिक्षणात समान अधिकार असावा, असं आम्हाला वाटतं.”
 
मनोज जरांगे दुपारी 12 वाजता सभेला संबोधित करण्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं होतं.
 
जरांगे 11 च्या सुमारास सभास्थळी तयार करण्यात आलेल्या रॅम्पवर चढले आणि उपस्थित लोकांना हात दाखवत व्यासपीठावर गेले.
 
आपण 20 मिनिटे थांबू असं ते म्हणाले. तेव्हा माझ्या शेजारीच बसलेला एक तरुण म्हणाला, लवकर चालू करायला पाहिजे कारण आता उन लागून राहिलं.
 
सभास्थळी सगळीकडे ड्रोन कॅमेरे फिरत होते. त्याच्याकडे बघून एक जण म्हणाला, कॅमेरा खाली येऊ द्या, थोडी गरमी तरी कमी होईल.
 
जरांगेंनी पुढच्या 10 मिनिटांत त्यांचं भाषण सुरू केलं. त्यांचा सुरुवातीचा काही वेळ सभास्थळी आरडाओरडा करणाऱ्या तरुणांना सूचना देण्यात गेला.
 
या तरुणांना बोलताना जरांगे म्हणाले, “इथं सभेसाठी 50 लाखापेक्षा जास्त मराठे आलेत. तुम्ही 100 लोक आरडा करुन राहिले, तुमच्या पाया पडू का? शांत बसा.”
 
पुढे जरांगेंनी त्यांच्या सरकारकडे असलेल्या 5 प्रमुख मागण्या सांगितल्या.
 
“महाराष्ट्रातल्या मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा. मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग म्हणून आरक्षण दिले तरी चालेल, पण 50 टक्क्यांच्या आत टिकणारे आरक्षण हवे,” अशी प्रमुख मागणी असल्याचं जरांगेंनी सांगितलं.
 
उन्हाच्या कडाक्यामुळे शरीरातून घामाच्या धारा येत होत्या. पण जरांगेंच्या प्रत्येक वाक्यानंतर त्यांना लोकांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता.
 
पुढे जरांगेंनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिलं. जरांगेंनी सभेसाठी 7 कोटी रुपये कुठून आणले, असा सवाल भुजबळांनी केला होता.
 
जरांगे त्याला उत्तर देत असताना उपस्थितांमधून काहींनी भुजबळांविरोधात घोषणा दिल्या.
 
जरांगे म्हणाले, “गोदाकाठच्या 123 गावांमधून 22 गावातल्या लोकांनी पैसे दिले. ते 21 लाख झाले. बाकी गावांकडे पैसा तसाच जमा आहे, तो अद्याप आम्ही घेतला नाही.”
 
22 ऑक्टोबर रोजी मराठ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याचं जरांगे म्हणाले आणि 12.20 वाजता त्यांची सभा संपली.
 
सभा संपल्यानंतर काही वेळानं आम्ही पार्किंगकडे निघालो. घराकडे परत जाणाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.
 
एक जण म्हणाला, "आजच्या सभेला आमदार-खासदार कुणी दिसले नाही". त्याला उत्तर देताना दुसरा म्हणाला, "कशाला अपमान करुन घ्यायला येतील का? इथं आले असते तर त्यांना खाली पब्लिकमध्ये बसावं लागलं असतं."
 
पाऊले चालती पंढरीची वाट, असं गाणं गुणगुणताना पाहून त्याला त्याच्या शेजारून जाणारा म्हणाला, "पाऊले चालते, आरक्षणाची वाट,” असं म्हणा.
सभा संपल्यानंतर लोक पार्किंग स्थळाकडे जात होते. तर तेवढ्याच प्रमाणात लोक सभास्थळाकडे येताना दिसत होते.
 
पार्किंगस्थळी पोहोचलो, तर गाडीमध्ये बसलेला एक जण म्हणाला, “कहो किती गर्दी जमली असेल?”
 
आमच्यासोबत चालत चालत आलेल्या त्याच्या ओळखीच्या माणसाला त्यानं विचारलं, "काय बोलले जरांगे पाटील? छगन भुजबळवर काय बोलले?"
 
सभास्थळाहून हायवेपर्यंत पोहचणारा मार्ग जवळपास 6 किलोमीटर एवढ्या अंतरावर होता. ते पार करण्यासाठी आम्हाला 3 तास लागले. 15 ते 20 किलोमीटर अंतरावर गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या.
 
अनेक तरुण ही सभा ऐकण्यासाठी मोटारसायकलवर आले होते. त्यांच्या मोटारसायलवर भगवा झेंडा आणि जरांगेंच्या सभेचं स्टिकर लावलेलं होतं. संध्याकाळी ते घराकडे परतत होते.
 
त्यांना बघून भुजबळांच्या आरोपांना उत्तर देताना जरांगेंनी म्हटलेलं एक वाक्य प्रकर्षानं आठवलं. जरांगे म्हणाले, “भुजबळ म्हणताय की सभेला 7 कोटी खर्च आला. अहो, कोटीच पहिल्यांदा ऐकलेय आम्ही. आम्ही 20-20 रुपयांचं दुसऱ्याकडूनच पेट्रोल घेऊन मोटारसायकलमध्ये टाकितो.”
 










Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इस्रायल-हमास युद्ध: व्हाईट फॉस्फरस म्हणजे काय, त्याबद्दल चिंता का वाढतेय?