भक्ताची जीभ मागणारी आंत्री देवी
देवावर असलेल्या श्रध्देसाठी भक्त काहीही करायला तयार असतात. यावेळी श्रध्दा आणि अंधश्रद्धा या सदरात आम्ही तुम्हाला अतिशय धक्कादायक माहिती देऊ इच्छितो. शक्तीपूजा या नावाने नवरात्रीच्या पवित्र वातावरणात भाविकांच्या आंधळ्या भक्तीला कसे उधाण आले होते, हे दाखविण्याचा आमचा हेतू आहे. भक्तीच्या (?) नावाखाली लोक स्वतःच्या शरीराला इजा करून आपलाच जीव कसा धोक्यात घालतात हेही आम्ही दाखवू इच्छितो. नवरात्रीत देवीच्या नावाने अंगात येणे वगैरे प्रकार घडतात. पण इंदूरच्या दुर्गा माता मंदिरातील दृश्य काही वेगळेच होते. येथील पुजार्याच्या अंगात म्हणे दुर्गा देवी येते. मंदिरातील दृश्य पाहून आमच्या पायाखालील
जमीनच जणू सरकली. तेथे जमलेले लोक चित्रविचित्र पद्धतीने नाचत होते. पुजारी जळता कापूर तोंडात व एका हातात तलवार घेऊन नाचणाऱ्या भक्तांमध्ये उडी घेत होता. भाविकही देव समजून त्याची पूजा करत होते. यात मोठमोठे व्यावसायिक व सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश होता. भक्तांमध्ये सगळ्याच वर्गातील लोकांचा समावेश होता. सुरेशबाबा या पुजाऱ्याशी बोलल्यावर खूप पूर्वीपासून आपल्या अंगात देवी येते, असे त्याने सांगितले. ओंकारेश्वरला स्नान करताना आपल्याला ही देणगी (!) मिळाल्याचे तो सांगतो.
अंगात आल्यावर कोणतीच व्यक्ती रिकाम्या हाताने परत जात नाही. येथे येऊन त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असा त्याचा दावा आहे. यानंतर धार रोडवरील काही गावांना आम्ही भेट दिली. गावाजवळ असलेल्या तलावाजवळ सुरू असलेली शक्ती पूजा पाहून अंगावर शहारे आले. काही स्त्रिया भावनेच्या भरात जिभेवर तलवार फिरवत होत्या. भक्त कोणत्या ना कोणत्या प्रकारे शरीराला हानी पोहचवत होते.
मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी हेच दृश्य पहावयास मिळाले. काही ठिकाणी स्वत:ला दुर्गेचा अवतार तर कोणी स्वत:ला कालीमातेचा अवतार सांगत होते. शक्ती पूजा हळूहळू भयावह स्वरूप धारण करत होते. चित्रविचित्र उपायांद्वारे भक्त देवीला रक्त चढवीत होते. नीमचपासून जवळपास 60 किलोमीटरवर असणार्या आंत्री मातेच्या मंदिरातील दृश्य अंगावर काटा आणणारे होते. जी व्यक्ती मातेच्या दरबारात जीभदान करते त्या व्यक्तिची प्रत्येक इच्छा म्हणे पूर्ण होते. येथील पुजार्याच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत
मातेच्या दरबारात शेकडो लोकांनी आपली जीभ दान केली आहे. येथे देवीला जीभ अर्पण करणारे मनोहर स्वरूप यांचे बंधू सांगतात, की लग्नानंतर बारा वर्षे उलटली तरीही मूल न झाल्याने मनोहरने आंत्री मातेच्या दरबारात नवस केला होता. मूल बाळ झाले तर जीभ अर्पण करेन असे सांगितले होते. हा नवस फेडण्यासाठी तो येथे आला होता. आमच्या समोरच त्याने जीभ कापून देवीला अर्पण केली. मनोहरप्रमाणेच अनेकांनी देवीला जीभ अर्पण केली. जीभ चढविल्यानंतर भक्तांना मंदिरातच थांबावे लागते. आठ दहा दिवस मंदिरात थांबल्यानंतर जीभ परत येते, असेही म्हटले जाते. या आधी जीभ चढविणारे प्रभात देव यांनी मातेच्या कृपेने जीभ परत आल्याचा दावा केला.
जीभ अर्पण करण्याचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. मातेला प्रसन्न करण्यासाठी खरंच असे काही करावे लागते? वेड्यासारखे नाचणार्यांच्या अंगात खरंच दैवी शक्ती प्रवेश करत असेल? या प्रश्नांचे उत्तर आमच्याजवळ नव्हते. आमच्यासमोर होता तो केवळ भक्तांनी मांडलेला उन्माद. हा उन्माद पाहून आम्ही हतबुद्ध झालो. श्रद्धेच्या नावाखाली जे काही चालले होते त्याला खरोखरच श्रद्धा म्हणावे काय असा प्रश्न आमच्या मनात आला. तुम्हाला काय वाटते?