वर्षभरात किंमती निच्चांकावर पोहचल्या आहेत. केंद्र सरकारने संसदेत या बदलाची माहिती दिली. रिफाईंड सनफ्लॉवर तेल, रिफाईंड सोयाबीन, आणि रिफाईंड पॉमोलीन तेलाच्या किंमतीत एका वर्षात मोठी घसरण झाली. त्यामुळे शुद्ध सूर्यफुल तेलामध्ये 29 टक्के, शुद्ध सोयाबीन तेलाच्या किंमतीत 19 टक्के आणि पॉमोलीन तेलाच्या भावात 25 टक्क्यांची घसरण झाली. खाद्यतेल स्वस्त झाल्याने या महागाईत जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने लोकसभेत खाद्यतेलाच्या स्वस्ताईविषयी लिखित निवेदन दिले. केंद्र सरकारने तेलाचे भाव नियंत्रीत ठेवण्यासाठी पाऊलं टाकल्याचं सांगण्यात आले. ग्राहक खात्याचे राज्यमंत्री निरंजन ज्योती यांनी निवेदन दिले. केंद्र सरकार गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत असल्याचा दावा करण्यात आला. जागतिक बाजारात पण खाद्य तेलाच्या किंमती उतरणीला आहेत.
मागणी घटल्याने सोयाबीन खाद्य तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. रिफाइंड सोयाबीन तेलाचा भाव 140-145 रुपयांवरून 115-120 रुपये प्रति लिटर आणि सूर्यफूल तेलाचा दर वर्षभरात 135-140 रुपयांवरून 115-120 रुपयांपर्यंत खाली आला आहे.