सध्या बार्शी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे 'विशाल फटे'. त्याला कारणही तसंच आहे.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवून विशालने बार्शी, सोलापूरातील अनेकांना करोडोंचा गंडा घातला आहे.
त्याच्याविरोधात दीपक आंबरे यांनी पहिल्यांदा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी फटे याच्या भावाला आणि वडिलांना अटक केली आहे. तर फटे आणि त्याची पत्नी सध्या फरार आहेत.
नुकताच फटे याने एका व्हिडीओच्या माध्यमातून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार असल्याचे सांगितले आहे.
कोण आहे विशाल फटे?
विशाल हा मूळचा मंगळवेढ्याचा आहे. त्याचे वडील बार्शीतल्या एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे त्या सगळ्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून बार्शीतच वास्तव्य आहे.
विशाल बार्शीमध्ये नेटकॅफे चालवत होता. नेट कॅफे चालवताना तो काही प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता. लोकांना त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले.
फटे हा लाखो रुपये लोकांकडून घेत होता. सुरुवातीला त्याने गुंतवणूकदारांना परतावा देखील दिला. परंतु नंतर जेव्हा लोक पैसे काढून घ्यायला जायचे तेव्हा आता काढू नका, एक दोन महिन्यात नवीन आयपीओ येणार आहे असं सागायचा.
दीपक आंबरे हे विशाल याचे मित्र होते. दीपक यांनी देखील विशालच म्हणणं ऐकून गुंतवणुकीसाठी त्याला पैसे दिले होते. आपली फसवणूक झाली असल्याचे समोर आल्यानंतर दीपक यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
दीपक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले की, "2019 पासून हे प्रकरण सुरू आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा त्यात नफा झाला की ते पैसे मी तुम्हाला देत जाईन, असं विशाल सांगायचा. सुरुवातीला त्याने लोकांना गुंतवणुकीचा परतावा सुद्धा दिला.
"त्यामुळे अनेक लोक त्याच्याशी जोडले गेले. जस जशी गुंतवणूकीची रक्कम वाढत गेली. तस तसं परतावा कमी होत गेला. लोक पैसे काढायला गेलं की तो सांगायचे आता नवीन आयपीओ येणार आहे. त्यात जास्त टक्के नफा मिळेल. लोक त्यात अडकत गेले. फटे पळून जाईल असं कधीत वाटलं नव्हतं," दीपक सांगतात.
''त्याने तीन कंपन्या देखील काढल्या होत्या. अल्गो ट्रेडिंग करतो असं तो सांगायचे. माझ्या सारख्या अनेकांनी विशालच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. सातारा, चाळीसगाव, पुणे, निपाणी, कोल्हापूर, सोलापूर या भागातून आता नागरिक पुढे येऊन त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करत आहेत, असंही दीपक यांनी सांगितलं.
18 कोटी रुपयांची फसवणूक
विशाल फटेच्या विरोधात आत्तापर्यंत 50 लोकांनी तक्रारी करत फसवणूक झाल्याचं म्हंटलं आहे. साधारण 18 कोटी रुपयांची ही फसवणूक असल्याचं सोलापूरच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
सातपुते म्हणाल्या, "फटे याने स्वतःचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट केला आहे. त्यात मला आत्महत्या करावीशी वाटतीये, मी संध्याकाळपर्यंत पोलिसांसमोर हजर होणार आहे असं तो म्हणतोय. पोलिसांच्या टीम त्याच्या मागावर आहेत."
"एक दोन ठिकाणी पोलिसांना मिळालेली माहिती बरोबर होती परंतु पोलीस पोहचण्यापूर्वी तो तिथून निघून गेला होता. आत्तापर्यंत 50 च्या सुमारास लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यात 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात आता आणखी लोक पुढे येण्याची शक्यता आहे तसंच ही रक्कम देखील वाढण्याची शक्यता आहे."
फटे याने व्हिडीओमध्ये काय म्हंटलंय?
फटे याने एक व्हिडीओ प्रसारित केला असून त्याने त्यात स्पष्टीकरण दिलं आहे.
त्या व्हिडीओत फटे म्हणतो, "अनेक लोकांनी माझ्या नावावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न केला. नेमकं प्रकरण मला माहित आहे. कोणाचेही पैसे बुडविण्याचा माझा कधीच विचार नव्हता आणि पुढेही नाही.
"सहा महिन्याच्या आत लोकांचे कॅपिटल परत केले आहे. गेल्या तीन चार महिन्यात मी कुठलाच नवीन क्लायंट घेतला नाही. माझ्याकडनं झालेल्या चुकीमुळं मला जे परिणाम भोगावे लागणार आहे त्याची मी मानसिक तयारी केली आहे."
"माझ्या घरच्यांचा माझ्या व्यवहाराशी कुठलाही संबंध नाही. अनेकांना मी व्यवसाय सुरू करायला मदत केली आहे. मी कोणालाही प्रलोभन दाखवलं नाही मी प्रॅक्टिकली ते करण्याचा प्रयत्न केला. मी संध्याकाळपर्यंत जवळच्या पोलीस स्टेशनला हजर होणार आहे," फटे सांगतो.