लावणी म्हणजे लावण्य. लावणी म्हणजे नृत्य, संगीत आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम. अशीच सुरेख कलाकृती घेऊन अवधूत गुप्ते पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. 'लावण्यवती'तील दुसरे गाणे आता लवकरच लावणीप्रेमींना घायाळ करण्यासाठी येत आहे. एकविरा म्युझिकतर्फे प्रदर्शित झालेल्या 'लावण्यवती' या अल्बममधील 'करा ऊस मोठा' या लावणीचा टिझर प्रदर्शित झाला आहे. 'लावणी नाही कापणी' अशी या अल्बमची टॅगलाईन आहे. त्यानुसारच थेट संगीतप्रेमींच्या काळजाचा ठाव घेणारी ही लावणी आहे. मुळात शेतकऱ्यांसाठी ऊस कापणीचा हंगाम सुरू असताना नेमकी वेळ साधून अवधूत गुप्ते ही लावणी घेऊन येत आहेत. ऋतुजा जुन्नरकर यांनी ही बहारदार लावणी सादर केली असून जान्हवी प्रभू अरोरा यांच्या आवाजातील या फक्कड लावणीला अवधूत गुप्ते यांचे बोल आणि संगीत लाभले आहे. तर आशिष पाटील यांनी या सदाबहार लावणीचे नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शन केले आहे. 'करा ऊस मोठा' या लावणीतील ऋतुजा जुन्नरकर यांच्या दिलखेचक, नखरेल अदा आणि ठसकेबाज शब्दरचना अतिशय यांचे जबरदस्त मिश्रण यात पाहायला मिळणार असून या अल्बमची निर्मिती गिरिजा गुप्ते यांनी केली आहे. या अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, '' लावणीचे विविध प्रकार आहेत. त्यापैकीच एकेक प्रकार आम्ही 'लावण्यवती'मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही लावणी ठसकेबाज असून प्रत्येकालाच ठेका धरायला लावणारी आहे. ज्याप्रमाणे 'गणराया'वर संगीत, नृत्यप्रेमींनी प्रेम केले तसेच प्रेम या लावणीही मिळेल, याची खात्री आहे.''