Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणवीर सिंगने ट्वीटरद्वारे केले 'भिकारी'चे टिजर पोस्टर लाँच

रणवीर सिंगने ट्वीटरद्वारे केले 'भिकारी'चे टिजर पोस्टर लाँच
, मंगळवार, 13 जून 2017 (14:46 IST)
मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच गणेश आचार्य दिग्दर्शित 'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. गतवर्षी मोठ्या गाजवाजात या चित्रपटाचा मुहूर्त महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या हस्ते झाला, आणि आज हिंदीचा सुपरस्टार रणवीर सिंग याने आपल्या सोशल साईटवर 'भिकारी' सिनेमाचे टीजर पोस्टर ट्वीट करत, सिनेमाच्या संपूर्ण टीमला भरपूर शुभेच्छा देखील दिल्या.
 
या सिनेमाचं टिजर पोस्टर पाहताचक्षणी मनात भरतं. छत्री तोंडावर घेऊन एक मनुष्य झोपला असल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. सुटाबुटात असलेला हा मनुष्य मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी असावा असे वाटते, परंतु छत्रीत त्याचे तोंड झाकले असून, त्याच्या शेजारी भिकारीचं  वाडगं दिसत असल्यामुळे, या टिजर पोस्टरवरील मनुष्य स्वप्नीलच आहे का? आणि त्याची या सिनेमात नेमकी काय भूमिका आहे, असे अनेक प्रश्न पडतात. अशाप्रकारे आपल्याला नकळत संभ्रमात  टाकणा-या या  टिजर पोस्टरने, अल्पावधीतच सोशल साईटवर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. 
 
स्वप्नीलदेखील या सिनेमाबाबत खूप उत्सुक आहे. आतापर्यतच्या भूमिकेहून अगदी वेगळी अशी भूमिका त्याची यात असल्यामुळे हा चॉकलेट बॉय 'भिकारी' सिनेमामध्ये नेमका काय करणार असेल, हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.
 
बॉलीवूडचे  आघाडीचे  नृत्यदिग्दर्शक म्हणून ख्याती असलेले गणेश आचार्य यांनी याआधी काही हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. मात्र, मराठीत ते पहिल्यांदाच 'भिकारी' या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. तसेच गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रॉडक्शनची स्थापना करून चित्रपट निर्मितीमध्ये प्रथम पाऊल टाकले आहे. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद तसेच गीत गुरु ठाकूर यांचे असून, त्यांनी यात अभिनय देखील केला आहे. आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर आधारित असलेल्या या सिनेमात रुचा इनामदार, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काबरा अशी तगडी स्टारकास्टदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 
 
शिवाय तब्बल एक हजार कलाकारांचा सहभाग असलेले 'गजानना' हे भव्य गाणे देखील या सिनेमाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गणेश आचार्य यांनी कोरियोग्राफ केलेले हे गाणे बॉलीवूडच्या गाण्यांना लाजवेल अशा धाटणीचे असून, मराठी गाण्यांच्या चित्रीकरणात ते 'सुपरसॉंग' ठरणार असल्याचा निकष देखील लावला जात आहे.  छायाचित्रकार महेश लिमये यांच्या कॅमे-यातून 'भिकारी' सिनेमा साकार झाला असल्यामुळे चित्रीकरणात देखील तो समृध्द ठरला आहे.  या चित्रपटाचा आशय, बांधणी आणि निर्मितीमूल्य पाहता 'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' हा सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांमधला एक महत्वपूर्ण आणि बिगबजेट सिनेमा ठरणार, यात शंका नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्ची झाली दहावी पास