Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रमेश देव यांचं निधन, 3 दिवसांपूर्वीच त्यांनी ‘हे’ गुपित सांगितलं होतं…

रमेश देव यांचं निधन, 3 दिवसांपूर्वीच त्यांनी ‘हे’ गुपित सांगितलं होतं…
, बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (22:41 IST)
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते.
30 जानेवारी रोजी रमेश देव यांनी 93वा वाढदिवस साजरा केला होता. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.
 
रमेश देव यांनी 1956 साली प्रदर्शित झालेल्या 'आंधळा मागतो एक डोळा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यांनी 180 हून अधिक मराठी चित्रपटांतून भूमिका साकारल्या. सुवासिनी, माझा होशील का, पडछाया, अपराध, या सुखांनो या, झेप यांसारखे त्यांचे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले होते.
 
राजश्री प्रॉडक्शनच्या आरती चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. आनंद, खिलौना, कोशिश, जमीर, तीन बहुरानीयाँ या आणि अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केलं होतं.
 
रमेश देव यांचे ते गुपित
"फुलं आणि सुंदर मुली हे माझे वीक पॉइंट होते," असं म्हणत अभिनेते रमेश देव यांनी आपलं खास गुपित93 व्या वाढदिवसानिमित्त सांगितलं होतं.
कॉलेजमध्ये अनेक मुली तुमच्यावर फिदा असतील असं विचारल्यावर रमेश देव यांनी त्यांच्या कॉलेजच्या काही आठवणींनाही उजाळा दिला.
 
"त्यावेळी आतासारखं वातावरण नव्हतं, लेडीज रुम वेगळी असायची आणि जेन्ट्स वेगळी. आम्ही पोर्चमध्ये वगैरे उभं राहायचो. त्यामुळे मुली थोड्या लांबच असायच्या," असं देव यांनी सांगितलं.
 
हिंदीत स्थिरावलेला मराठी नट
"मराठी चित्रपटसृष्टीतील जे नट हिंदीमध्ये स्थिरावले, त्यामध्ये रमेश देव यांचा समावेश होतो. 1960च्या दशकातील 'आरती' सारख्या चित्रपटापासून ते आनंद, शिकार, मस्ताना, खिलौना अशा अनेक यशस्वी चित्रपटांत देव दिसले. नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांत ते लीलया वावरले, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई देतात.
 
ते पुढे सांगतात, "जाहिरातपट, दूरचित्रवाणीपट, लघुपट आणि फिचर फिल्म यांची निर्मिती आणि दिग्दर्शनदेखील त्यांनी केले. त्यांचा अभिनय कृत्रिम होता, परंतु हृषीदांसारखा चांगला दिग्दर्शक असेल, तर त्यांच्या अभिनयातला कृत्रिमपणा जाऊन सहजता यायची."
 
"मुख्यत: रमेश देव यांनी कधी 'गेले ते दिन गेले' असे सूर छेडले नाहीत. नवीन नवीन कलावंतांमध्ये ते रमायचे. कोल्हापूर, पुण्याचे अनेक नट मराठीतच अडकून पडले, तसे रमेश देव यांनी केले नाही. ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या मोठ्या जगात गेले आणि यशस्वी झाले. 1950 च्या दशकातील रमेश देव यांचे चित्रपट हे खूप साधे आणि चांगले होते. त्यातला त्यांचा अभिनयही वास्तववादी होता," असंही ते सांगतात.
 
रमेश देव यांना श्रद्धांजली
अशोक सराफ यांनी रमेश देव यांचं जाणं हा मराठी चित्रपटसृष्टीला धक्का असल्याची भावना व्यक्त केली.
 
अशोक सराफ यांनी म्हटलं की, "मोठा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नट आपल्यातून गेला माझ्या आयुष्यातलं पहिलं शूटिंग, पहिला शॉट मी त्यांच्यासोबत दिला होता. ही 1967 मधली गोष्ट आहे. त्यानंतर त्यांनी आणि मी बरेच चित्रपट केले."
 
मी त्यांना 'रमेश भैय्या' म्हणायचो, मोठा भाऊ मानायचो, असंही अशोक सराफ यांनी म्हटलं.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रमेश देव यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.
नॅशनल फिल्म अर्काईव्ह्ज ऑफ इंडियानं रमेश देव यांच्या 'दैवाचा खेळ' सिनेमातील एक छायाचित्र पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन