भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना टीम इंडियाने सहा गडी राखून जिंकला. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकाही जिंकली. भारताने घरच्या भूमीवर सलग सहावी टी-२० मालिका जिंकली आहे. यासह मायदेशात सलग 15 व्या मालिकेत अपराजित राहण्याचा भारताचा विक्रम अबाधित आहे. भारताने शेवटची मालिका फेब्रुवारी 2019 मध्ये घरच्या मैदानावर गमावली होती. यानंतर खेळल्या गेलेल्या 15 मालिकांपैकी दोन बरोबरीत संपल्या तर 13 भारताच्या नावावर आहेत. अनिर्णित राहिलेल्या दोन्ही मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेल्या.
या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व 10 गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 15.4 षटकात 4 गडी गमावून 173 धावा केल्या आणि सामना सहा विकेटने जिंकला. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने 57 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन आणि रवी बिश्नोई-अक्षर पटेलने प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताकडून यशस्वी जैस्वालने 68 आणि शिवम दुबेने नाबाद 63 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या करीम जनातने दोन गडी बाद केले.
मालिकेतील तिसरा आणि शेवटचा T20 सामना बुधवारी (17 जानेवारी) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय संघाने मालिका आधीच जिंकली असली तरी टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे.