IND vs AUS: भारताने चौथ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ सात विकेट्स गमावून केवळ 154 धावा करू शकला आणि सामन्यासह मालिकाही गमावली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 डिसेंबरला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 37 आणि जितेश शर्माने 35 धावांचे योगदान दिले. रुतुराज गायकवाड 32 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियातर्फे बेन डॉलिशने तीन तर तनवीर संघा-जेसन बेहरेनडॉर्फने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डीला एक विकेट मिळाली. या सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकात केवळ 13 धावा करता आल्या आणि पाच विकेट गमावल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या 200 धावांच्या जवळपास पोहोचू शकली नाही.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद 36 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 31 आणि मॅथ्यू शॉर्टने 22 धावांचे योगदान दिले. बेन मॅकडरमॉट आणि टीम डेव्हिडने प्रत्येकी 19 धावांचे योगदान दिले. भारताच्या विजयात फिरकी गोलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. अक्षर पटेलने तीन आणि दीपक चहरने दोन गडी बाद केले.
रवी बिश्नोई आणि आवेश खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, भारतीय फिरकीपटूंनी अतिशय संयमी गोलंदाजी केली आणि अक्षर-रवीने मिळून आठ षटकांत 33 धावा देत चार बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार सूर्यकुमारने श्रेयस अय्यर, जितेश शर्मा, दीपक चहर आणि मुकेश कुमार यांचा समावेश करून प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले .