Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातला ठाकरे ब्रँड संपल्यास मुंबईचे पतन-संजय राऊत यांची निरर्धेक कोल्हेकुई

महाराष्ट्रातला ठाकरे ब्रँड संपल्यास मुंबईचे पतन-संजय राऊत यांची निरर्धेक कोल्हेकुई
, गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (14:23 IST)
गेल्या रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे मुख्यप्रवक्ते खा. संजय राऊत यांनी दै. सामनाच्या रोखठोक या सदरातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चुलतबंधू राज ठाकरे यांना भावनिक आवाहन केल्याची बातमी प्रसारीत झाली आहे.
 
ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रँड आहेत. मुंबईतून याच ब्रँडना नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायाचा हे कारस्थान उघडे पडल्याचा आरोप संजय राऊत यांनी या लेखात केला आहे. राज ठाकरे हे देखील ठाकरे बॅ्रंडचे घटक आहेत. महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यास राज ठाकरे यांनाही त्याचा फटका नसेल जरी राज ठाकरे यांचे शिवसेनेशी मतभेद असले तरी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा यासाठी राज ठाकरे यांनी सोबत यायला हवे. अशी साद संजय राऊत यांनी घातली आहे. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असा दावाही संजय राऊत यांनी या लेखात केला आहे. 
 
या लेखात संजय राऊत यांनी भाजपलाही टारगेट करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांच्या या लेखामुळे राजकीय वर्तुळात थोडी खळबळ माजणे हे क्रमप्राप्तच होते. त्यानुसार थोडी खळबळ झालीही मात्र राज ठाकरेंनी याची फारशी दखल घेतली नाही. नाही म्हणायला त्यांच्या संदीप देशपांडे नामक शिलेदाराने संजय राऊतांना द्यायचे हे उत्तर देऊन मामला निकालात काढला.
 
मुळात प्रश्न असा निर्माण होतो की, महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड आहे काय? त्या पाठोपाठ असा ही मुद्दा पुढे  येतो की आज राज ठाकरे हे ठाकरे ब्रँडचे घटक आहेत काय? त्याच बरोबर पवार ब्रँड हा देखील एक ब्रँड असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तो ब्रँडही महाराष्ट्रात आहे काय? हे ब्रँड संपले तर मुंबईचे पतन होईल काय आणि सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता एकत्र येण्याची कितपत शक्यता आहे? याच प्रश्नांची जमतील तितकी उत्तरे या लेखात शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

आपण सर्वप्रथम शेवटला मुद्दा घेऊ या. उद्धव आणि राज हे एकत्र येण्याची आज शक्यता कितपत आहे या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातले राजकीय विश्लेषक आणि राज आणि उद्धव या दोघांनाही जवळून ओळखणारे त्यांचे निकटवर्तीय नकारार्थीच देतील. मुळात राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे, ठाकरे परिवार आणि शिवसेना यांच्यापासून दूर जाण्यासाठी कारण हे उद्धव ठाकरेच झाले असल्याचे जाणकार सांगतात. उद्धव आणि राज हे दोघेही बंधू वयात आल्यानंतर राज ठाकरे हे आधी शिवसेनेत सक्रिय झाले. 
 
त्यानंतर हळूहळू उद्धव ठाकरे पुढे आले. राज ठाकरे यांची आक्रमक शैली ही कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंशी मिळतीजुळती होती. त्यामुळे सामान्य शिवसैनिक आणि सर्व राजकीय अभ्यासक हे राज ठाकरेंमध्येच पुढचा शिवसेनाप्रमुख शोधत होते. उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही अनेक दिवस राज ठाकरे हेच शिवसेनाप्रमुखांचे राजकीय वारस असे बोलले जात होते.
 
मात्र 2000 च्या दरम्यान अचानक चित्र बदलले. निवडणूक आयोगाच्या चौकटीत शिवसेना बसवायची म्हणून शिवसेनेचा कार्याध्यक्ष निवडायचे ठरले. त्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे नाव राज ठाकरे यांनीच सुचवले अशीही माहिती मिळते. मात्र उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाल्यापासून त्यांचे वजन वाढत गेले. त्या तुलनेत राज ठाकरे यांचे वजन हळूहळू घटत गेले. जर राज ठाकरे यांच्यातले प्लस पॉँईट्स लक्षात घेऊन त्यांना योग्य महत्त्व दिले गेले असते तर ते शिवसेनेतच राहिले असते आणि शिवसेना तुटलीही नसती. मात्र तसेच घडले नाही. शिवसेनेत राज ठाकरे यांना फारसे महत्त्व मिळेनासे झाले. त्यावेळी म्हणजेच 2006 च्या दरम्यान राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा स्वतःचा स्वतंत्र पक्ष उभा केला. या पक्षाने एका काळात मुंबईत तरी शिवसेनेला तगडे आव्हान उभे केले होते.
 
असे असले तरी सकृतदर्शनी तरी राज ठाकरे हे ठाकरे परिवाराबाबत आपल्या मनात कुठेतरी जिव्हाळ्याचा कोपरा ठेवून होते असे अनेक प्रसंगातून दिसून येते. उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यावर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. हे वृत्त कळताच राज ठाकरे आपला कोकणचा दौरा सोडून मुंबईला परत आले आणि त्यांनी उद्धव यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांचे पूर्ण चेकअप आटोपल्यावर जेव्हा त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली त्यावेळी स्वतः कार चालवत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना घरी घेऊन आले होते. असे इतरही अनेक प्रसंग सांगितले जातात. मात्र या सर्व प्रसंगामध्ये पुढाकार हा राज ठाकरेंचा होता आणि उद्धव ठाकरेंकडून त्यांना थंड प्रतिसाद राहिला असेच दिसून आले आहे.
 
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यावर त्यांच्या अत्यंयात्रेत राज ठाकरे आपल्या सहकार्यांसह पूर्ण वेळ सहभागी झाले होते. मात्र त्यांना मुख्य कार्यक्रमांपासून दूर कसे ठेवता येईल हाच प्रयत्तन झाल्याचे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय सांगतात. या अन्त्यात्रेत मातोश्री ते शिवाजी पार्क या अंतरात बहुतेक सर्व ठाकरे परिवार हा बाळासाहेबांचे पार्थिव नेणार्या ट्रकवर होता. मात्र राज ठाकरे एकटचे समोर पायी चालत होते. नंतर अस्थि विसर्जन किंवा इतर कार्यक्रमांपासून देखील राज ठाकरे यांना दूरच ठेवले गेले होते, असे राज यांचे निकटवर्ती सांगतात.
 
2014 च्या सप्टेंबरमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली. त्यावेळीही राज ठाकरे यांनी सहकार्याचा हात पुढे केला होता. मात्र त्यावेळी शिवसेनेतून त्यांना थंड प्रतिसाद मिळाल्याचा आरोपही दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच माध्यमांशी बोलताना केला होता. या दाव्याचा प्रतिवाद शिवसेनेने किंवा उद्धवपंतांनी केल्याचे कानावर आले नाही. असाच प्रकार 2019 मध्येही झाल्याची माहिती मिळते. म्हणजेच मराठीच्या मुद्यावर आणि बाळासाहेबांच्या नावावर अजूनही एकत्र येऊ असा प्रस्ताव वेळोवेळी राज ठाकरे यांनी पाठविला आणि दरवेळी उद्धव ठाकरे यांनी तो नाकारला. एकंदरीतच राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनी कधीतरी दुखावल्यामुळेच शिवसेना सोडावी लागली आणि नवा पक्ष स्थापन करावा लागला. नंतरही सर्व काही विसरून राज ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला तेव्हा उद्धव ठाकरेंनीच तो नाकारला. हे सर्व चित्र स्पष्ट असताना आताच संजय राऊत यांना हे पाश्चात बुद्धी का सुचली?
 
2019 च्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपशी दगाबाजी करून सत्ता कशी मिळविली हा इतिहास अगदी ताजा आहे. त्यामुळेच केंद्रात असलेला भाजप आणि महाराष्ट्रात भक्कम असलेला विरोधी पक्ष त्यांना कायम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात कोरोनाही ठाकरेंच्या म्हणजेच महाआघाडी सरकारच्या मुळावर उठला आहे. भरीसभर म्हणजे सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण आणि त्यानंतर अगदी ताजे असलेले कंगना राणावत प्रकरण हेही झालेले आहे. या सर्व प्रकारात शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे. केवळ राजकीय दृष्ट्या शिवसेनेसमोरच्या अडचणी वाढल्या असे नाही. तर शिवसेनेचा जनाधारही आता कमी झाल्यासारखा दिसतो आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये ज्या काही घटना घडल्या त्या लक्षात घेता भाजप फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी प्रसंगी महाराष्ट्रात काहीकाळ राष्ट्रपती राजवट लावेल आणि नंतर शिवसेनेला मध्यावधी निवडणूकांना सामोर जायला लावेल अशीही भीती शिवसेनेच्या मनात घोंगावत असावी. जर असे घडले तर शिवसेनेला मतदारांची कितपत साथ मिळेल याबाबत सर्वच साशंक आहेत. त्यामुळेच राज ठाकरे सोबत आले तर जुनी शिवसेना नव्याने उभी करता येईल अशा भाबड्या आशावादाच्या आडून उद्धवपंतांनी रोखठोकमध्ये हा लेख संजय राऊतांना लिहल्या लावला असे दिसून येते. एकूणच पाहुण्याच्या हातून साप मारून घेण्याचे हे उद्धवपंतांचे उद्योग असावे हे स्पष्ट दिसते.
 
महाराष्ट्र नव निर्माण सेनेने या प्रकरणी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला ते बघता संजय राऊत यांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता अतिशय धुसर दिसते. शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यात फारकत होऊन आज 14 वर्षाचा कालखंड लोटला आहे. या काळात मने सांधण्याचे झालेले अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यालाही उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे अडचणीत आले असताना राज ठाकरे त्यांच्या मदतीला धावतील का? आणि धावलेच तर त्याची किती आणि कशी किंमत वसूल करतील हे आजतरी सांगणे कठीण आहे.
 
आता मुद्दा येतो तो ठाकरे ब्रॅँड आणि पवार ब्रँडचा. शिवसेनेची स्थापना होऊन आज 50 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेना उभी झाली ती मराठी माणसाच्या हित रक्षणासाठी. सुरुवातीला शिवसेनेने मराठी माणसाचे हितरक्षण केलेही मात्र नंतर काय झाले ते उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. मराठी माणसासाठी उभ्या केलेल्या शिवसेनेत चंद्रिका केनिया, जयप्रकाश मुंदडा, सुरेश जैन, वेणूगोपाल धूत अशी अमराठी माणसेच पुढे आली आणि सत्तेची फळे लाटती झाली. ज्या मराठी माणसाचा मुद्दा घेऊन शिवसेना मुंबईत उभी झाली त्या मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर थेट डोंबिवली, पालघर, नवी मुंबई, खारघर अशा भागात हाकलले गेले. तरीही शिवसेना शांतच होती. 
 
अशा परिस्थितीत गेल्या 50 वर्षात आधी मुंबईत असलेली आणि नंतर उभ्या महाराष्ट्रात आम्ही पोहोचल्याचा दावा करणारी शिवसेना एकदातरी महाराष्ट्रात स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळू शकली आहे काय याचे उत्तर नकारार्थीची मिळते. भाजपशी युती करूनही शिवसेना कधीही 100 गाठू शकली नाही. ज्या मुंबईच्या जोरावर शिवसेना वाढली होती. त्या मुंबईत विधानसभेत शिवसेनेला भाजपच्या तुलनेत कमी जागा मिळाल्या हे वास्तव डोळ्याआड करता येत नाही. 1995 पासून शिवसेनेचा विधानसभेतील हा लेख बघता दरवेळी त्यांची घसरण झालेलीच दिसते आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकामध्येही भाजपने दंड थोपटल्यावर शिवसेनेची झालेली वाताहत अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात ठाकरे बॅ्रँड आहे हा संजय राऊत यांचा दावा कितपत विचारात घ्यायचा याचा विचार वाचकांनीच करायचा आहे.
 
आता मुद्दा पवार ब्रँडचा येतो. जे ठाकरेंबद्दल सांगितले तेच पवारांबद्दल सांगता येईल. शरद पवारांनी सर्वप्रथम 1978 मध्ये काँग्रेस फोडली. मात्र त्यानंतर ते स्वबळावर सत्ता आणू शकले नाही. 1987 मध्ये ते पुन्हा काँग्रेसच्या चरणी लीन झाले. तरीही त्यांच्या काळात ते काँग्रेसला स्वबळावर निभेळ बहुमत मिळून देऊ शकले नव्हते. 1999 मध्ये ते पुन्हा  काँग्रेसमधून वेगळे निघाले. त्यानंतर आजतागायत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही महाराष्ट्राच्या विधानसभेत शंभरी गाठलेली नाही. जर महाराष्ट्रात आज ते साठीच्या आत अडकतात आणि विदर्भ मराठवाड्यात ते कुठेही नाही. तर महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड चालतो हा संजय राऊतांचा दावा कितपत ग्राह्य धरायचा? नाही म्हणायला पवारांचा एक राजकीय सद्गुण विचारात घ्यावा लागतो. ते एखाद्याला सत्तेत बसवू शकत नाही मात्र सत्तेतून पायउतार करू शकतात. चालत्या गाड्यात खिळ कशी घालायची हे शास्त्र पवारांना चांगलेच अवगत आहेत. त्यामुळेच भाजप-शिवसेना युतीच्या चालत्या गाड्यात खिळ घालून महाराष्ट्रात ऑटोरिक्षा सरकार गठित करण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला याचे श्रेय द्यावे लागेलच. मात्र या तीन चाकांपैकी एक चाक पवार केव्हा पंक्चर करतील हे पवारच जाणोत. लवकरच ते एखादे चाक पंक्चर करतील असे राजकीय विश्लेषक म्हणतात. मात्र ते कधी होईल हे आज सांगणे कठीण आहे.
 
हा मुद्दा लक्षात घेता पवार बॅँ्रड हा महाराष्ट्रात कितपत चालेल हा मुद्दाही वादाचाच ठरू शकतो. हे देखील संजय राऊत यांचे भाबडे स्वप्नरंजन म्हणावेच लागते. हे सर्व मुद्दे लक्षात घेता संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये उपस्थित केलेले सर्वच मुद्दे हे याक्षणी तरी राजकीय अभ्यासकांच्या मते निरर्थक मुद्दे आहेत. महाराष्ट्रात ना ठाकरे ब्रँड आहे ना पवार ब्रँड चालतो. उद्या हे ब्रँड नामशेष झाले तर काय याचे उत्तरही सरळ आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राचीच राहणार आहे. ठाकरे आणि पवार ब्रँडचे पतन झाले तर मुंबईचे पतन होईल हा दावाही हास्यास्पद आणि निरर्थकच आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे ही अपेक्षाही भाबडे स्वप्नरंजनच ठरणार आहे.
 
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची आजतरी आधी म्हटल्याप्रमाणे धुसर शक्यता आहे. ते एकत्र आले किंवा न आले तरीही महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड सक्रिय राहिल हे सुद्धा भाबडे स्वप्नरंजनच आहे. महाराष्ट्रात बँ्रड चालतो तो मराठी माणसाचा आणि मराठी माणसाचा मराठी ब्रँड हा कायम राहिल याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. 
 
मराठी माणूस हा स्वबळावर पुढे जाईल, त्यासाठी त्याला पवार किंवा ठाकरे ब्रँडची काहीही गरज नाही आणि हे ब्रँड नामशेष झाले तर मुंबईचे पतन होईल ही देखील मराठी माणसाला निष्फळ भीती घालण्यासाठी संजय राऊतांची निरर्थक कोल्हेकुई आहे इतकेच आज म्हणता येईल.    
  
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
ता.क : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.
-अविनाश पाठक

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Royal Enfield Bullet 350 आणि Classic 350 च्या किमतीत वाढ, जाणून घ्या किंमत