Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?
, बुधवार, 26 जून 2024 (09:48 IST)
1857च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर भारताच्या पश्चिमेस आणि दक्षिणेकडील प्रांतांमध्ये सामाजिक बदलांचे वारे सुरू झाले. नवे शिक्षण, नवे विचार यामुळे पश्चिम भारतामध्ये विशेषतः तेव्हाच्या मुंबई प्रांतातील लोकांनी इतर भारतापेक्षा विविध क्षेत्रांत आघाडी घेतली.
 
यात इंग्रजी शिक्षण, मुलींचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, विधवांचे शिक्षण अशा वेगवेगळ्या दिशांनी या भागाची पावलं पडत गेली.
 
लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्या अनेक सामाजिक-राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या नेत्यांमुळे या प्रांताने ही प्रगती केली होती.
 
बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी आपापल्या संस्थांनांमध्ये अनेक क्रांतिकारक पावलं टाकून स्वतःपासूनच बदलांची सुरुवात केली होती.
 
राजसत्तेचे प्रमुख असूनही शैक्षणिक, राजकीय, सामाजिक बदलांसाठी आवर्जून बदल करणाऱ्या नेत्यांमध्ये यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. त्यानंतरच्या काळात औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधींचं नावही यामध्ये घेतलं जातं.
 
राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता. त्या निमित्ताने आपण त्यांच्या जीवनाची आणि कार्याची माहिती येथे संक्षिप्तरुपात घेत आहोत.
 
आधी हे लक्षात घेणं आवश्यक
राजर्षी शाहू महाराज यांची माहिती घेताना छ. शिवाजी महाराजांच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही घराण्यांमध्ये अनेक व्यक्तींची नावं एकसारखीच असल्याचं लक्षात ठेवावं लागेल.
 
शिवाजी, संभाजी, राजाराम, शाहू ही नावं अनेक पिढ्यांमध्ये दिसून येतात. तसेच शाहू हे नावही अनेक जणांचं असल्याचं दिसतं. विशेषतः संभाजी महाराजांचे पुत्र शाहू आणि कोल्हापूरचे शाहू महाराज हे इतिहासात जास्त प्रसिद्ध असल्यामुळे या दोन व्यक्तींमध्ये गल्लत होण्याची शक्यता असते.
 
त्यामुळे साताऱ्याचे छ. संभाजीपुत्र शाहू महाराज वेगळे आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे महाराज वेगळे हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
 
कोल्हापूरच्या गादीची थोडक्यात माहिती
आता कोल्हापूरची गादी किंवा कोल्हापूरची सत्ता कशी तयार झाली हे पाहू. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम छत्रपती झाले. त्यांच्या मृत्यूनंतर राजाराम यांची पत्नी ताराबाई ज्या महाराणी ताराराणी या नावाने ओळखल्या जातात, त्यांनी पन्हाळा येथे आपला मुलगा शिवाजी यांच्यानावाने कारभार सुरू केला.
 
मात्र नंतर पन्हाळ्यावर अचानक झालेल्या क्रांतीत ताराराणी आणि छ.शिवाजी यांना कैद करुन राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचा मुलगा संभाजी यांनी सत्ता ताब्यात घेतली.
 
या दुसऱ्या संभाजी यांचा मृत्यू 1760 साली झाला. त्यांच्याजागी 1762 साली दुसरे शिवाजी हे दत्तकपुत्र आले. त्यांनी आपली राजगादी पन्हाळ्यावरुन कोल्हापूरला नेली. त्यांचा मृत्यू 1813 साली झाला.
 
आता राजगादीवर त्यांचे पुत्र आबासाहेब आले. त्यांचा मृत्यू 1821 साली झाला.या आबासाहेबांनंतर शहाजी म्हणजेच बुवासाहेब कोल्हापूरच्या गादीवर आले. त्यांचा 1829 साली मृत्यू झाला.त्यानंतर राजगादीवर तिसरे शिवाजी म्हणजे बाबासाहेब आले.
 
बाबासाहेबांनंतर 1866 साली राजाराम नावाचे दत्तकपुत्र कोल्हापूरचे महाराज झाले. त्यांचे 1870 साली इटलीतील फ्लॉरेन्स येथे निधन झाले.
 
त्यांच्यानंतर चौथे शिवाजी नावाने नारायणराव दत्तक आले. या काळात कागलचे जयसिंगराव घाटगे कोल्हापूरचे राजप्रतिनिधी म्हणून काम पाहात होते. 1883 साली चौथे शिवाजी यांचे अहमदनगर येथे निधन झाले.
 
त्यानंतर कोल्हापूरच्या राजगादीवर जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंत यांना दत्तक घेण्यात आलं. हेच शाहू महाराज नावाने प्रसिद्ध झाले.
 
छ. शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे. कागलच्या प्रसिद्ध घाटगे घराण्यातील यशवंत यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथे झाला.
 
शाहू महाराज यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. 17 मार्च 1884 रोजी त्यांचे कोल्हापूर राजघराण्यात दत्तक विधान झाले. शाहू महाराज यांना यानंतर राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आलं.
राजकुमार कॉलेज हे तत्कालीन राजघराण्यातील वंशजांचे तसेच अनेक उच्चपदस्थांच्या मुलांना शिक्षण देणारे कॉलेज होते. राजकुमार हायस्कुलमध्ये शाहू महाराजांबरोबर त्यांचे बंधू तसेच कोल्हापुरातील काही उच्चपदस्थ घराण्यांतील मुले होती. तसेच भावनगरचे भावसिंह महाराजही त्यांच्याबरोबर होते.
 
भावसिंह महाराज आणि शाहू महाराज यांची मैत्री अखेरपर्यंत टिकली. दोन्ही मित्रांचे एकमेकांच्या संस्थानात येणं जाणं तसेच कौटुंबिक स्नेह होता. राजकोटनंतर या सर्वांनी धारवाड येथे शिक्षण पूर्ण केले, तेथेही भावसिंह महाराज होते.
 
1886 साली शाहू महाराजांचे जनकपिता जयसिंगराव घाटगे यांचे निधन झाले.
 
विवाह आणि इतर शिक्षण
शाहू महाराज यांचा विवाह बडोद्याचे सरदार खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी 1891 साली झाला. याचवर्षी शाहू महाराजांनी संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारतात भ्रमंती केली. अगदी कोलंबोपर्यंत जाऊन त्यांनी संपूर्ण प्रदेशाची माहिती घेतली.
 
याबरोबरच त्यांनी वायव्य भारत आणि पश्चिमेस कराची-पेशावरपर्यंत प्रवास केला होता. त्यानंतर उत्तर भारत, आजच्या राजस्थानातील संस्थांनांनाही भेट देऊन तेथिल राजकीय, भौगोलिक स्थितीचा आढावा घेतला होता. पुढील आयुष्यातही त्यांचा परदेशाबरोबर दिल्ली, अलाहाबाद, कानपूर आणि मुंबईला अनेकवेळा प्रवास घडला. अभ्यासाबरोबरच व्यायाम, खेळ, घोडेस्वारी अशा बाबतीत शाहू महाराज विशेष आघाडीवर होते.
विविध प्रकारचे प्राणी जोपासणं, हत्ती-चित्ते यांची जोपासना, शिकार, कुस्ती यावर त्यांचं विशेष प्रेम होतं. अनेक संस्थांनांमधून विविध प्रकारचे प्राणी त्यांनी कोल्हापुरात आणले होते तसेच अनेक संस्थानिकांना आपल्याकडील प्राणी भेटासाठी पाठवलेही होते.
 
कुस्तीची मैदानं भरवून कुस्तीचा आनंद ते घेत असत. साठमारी, चित्त्यांकडून शिकार, डुकरांची शिकार करणं असे तत्कालीन क्रीडाप्रकार त्यांना आवडत असत.
 
राज्यकारभार आणि बदलांची घोडदौड
2 एप्रिल 1894 रोजी त्यांच्याकडे कोल्हापूरच्या राज्यकारभाराची सूत्रं आली.
 
शाहू महाराजांनी आपल्या सामाजिक बदलांच्या चळवळीला अगदी आधीपासूनच प्रारंभ केला होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे स्थापनेपासूनचे अध्यक्ष होते.
 
या शैक्षणिक-सामाजिक विचारांना पुढे गती येत गेली.
 
शाहू महाराजांनी सत्तेवर येताच सर्वात आधी संस्थानातल्या सर्व तालुक्यांना भेट दिली.
 
पन्हाळ्याला गेल्यावर त्यांनी पन्हाळ्याला चहा कॉफीची लागवड करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे भुदरगड भागातही चहाची लागवड सुरू झाली.
 
कोल्हापूरला ऊसाच्या उत्पादनामुळे भरपूर गुळ तयार होत असला तरी तिला बाजारपेठेचं स्वरुप आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर शहरात शाहूपुरी ही व्यापारी पेठ सुरू केली आणि ते एक गुळाचं केंद्र तयार झालं.
 
कोल्हापूर संस्थानाला शाहू महाराजांच्या काळात प्लेग तसेच अनेकवेळा दुष्काळाला तोंड द्यावे लागले मात्र शाहू महाराज या संकटाच्या काळात स्वतः पाहणी करुन परिस्थिती नियंत्रणात आणत होते.
 
याच काळात त्यांनी लोकांच्या औषधोपचाराची सोय केली. स्वस्तात धान्य उपलब्ध करुन दिलं.
 
अनाथालयं सुरू केली आणि मुलांच्या पालनाची सोय केली. प्लेग तसेच इतर साथीच्या काळामध्ये गावागावांतील स्वच्छतेसाठी ते प्रयत्न करत होते.
 
लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज
19 व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचं समाजमन ढवळून निघण्यात लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील संबंधांचा एक मोठा संबंध आहे.
 
शाहू महाराजांकडे कोल्हापूरची सूत्रे आल्यानंतर टिळकांनी केसरीमधून त्यांच्याप्रती अभिनंदन करुन सुयश चिंतलं होतं. मात्र पुढील 25 वर्षांमध्ये दोघांमध्ये संघर्षाची अनेकदा वेळ आली.
 
या काळात दोघांची अनेकदा भेटही झाली, चर्चा झाली तसेच वादही झाले. वेदोक्त प्रकरणाचा निकाल शाहू महाराजांच्या बाजूने आणि ताईमहाराज प्रकरणाचा निकाल टिळकांच्या बाजूने गेला.
 
दोन्ही नेत्यांच्या आयुष्यातील मोठा काळ या संघर्षावर गेल्याचं दिसून येतो.
 
वेदोक्त प्रकरण
1899 साली हे प्रकरण कोल्हापूरामध्ये घडले. कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्या परिवारातले काही सदस्य बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्यावेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत.
 
एकेदिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित राजारामशास्त्री भागवतही होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
 
त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं.
 
हे उत्तर शाहू महाराजांसाठी एक मोठ्या विचारमंथनाचं कारण ठरलं. त्या वाक्यानं ते अंतर्मूख तर झालेच त्याहून पुढील मोठ्या सामाजिक चळवळीसाठी सिद्ध झाले.
 
क्षत्रियकुलावतंस हिंदुपदपातशहा असं बिरुद लावणाऱ्या राजालाही दर्जा मिळत नसेल तर बाकी लोकांवर काय अन्याय होत असेल याची त्यांना जाणीव झाली.
 
वेदोक्ताचं असं प्रकरण उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळीही असा वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी काशीहून गागाभट्टांना बोलावून राज्याभिषेक करवून घेतला होता.
 
साताऱ्याचे महाराज प्रतापसिंह यांच्या कार्यकाळातही वेदोक्ताधिकाराचा तंटा निर्माण झाल्यावर त्यांनी पंडितांची एक निर्णयसभा बोलावली आणि त्यामध्ये मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध होऊन त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य केला गेला.
 
1896 साली बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांच्याकडील धार्मिक विधी महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिल्यावर सयाजीरावांनी राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांकरवी ते करवून घेतले होते.
 
या वेदोक्त प्रकरणाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात न पडते तरच नवल. यातून एकप्रकारचा संघर्षच निर्माण झाले. महाराष्ट्रातील तत्कालीन वर्तमानपत्रांतून, सभा-भाषणांतून त्याची दोन्ही बाजूंनी चर्चा होऊ लागली.
 
ऑक्टोबर 1901 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीमध्ये वेदोक्ताचे खूळ या नावाचे दोन अग्रलेख लिहिले. त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती थोडक्यात अशी होती, “या युगात ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ण राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्यावर मोहिती होऊन तत्कालीन कर्त्या पुरुषांनी खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करुन गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला; पण त्यावेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही.”
छत्रपतींच्या भोसले घराण्याशिवाय इतर घराण्यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारणं हे शाहू महाराजांना अस्वस्थ करणारं होतं. आधी फक्त आपल्यापुरते राजवाड्यासाठी वेदोक्ताचा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी समस्त मराठ्यांना हा अधिकार मिळावा असा आग्रह धरला आणि तसेही प्रयत्नही केले.
 
पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतींल मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले.
 
ज्या ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
 
संस्थानचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले 30 हजारांचे इनाम जप्त करण्यात आले. करवीरच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे 50 हजार रुपयांचे उत्पन्न सरकारजमा करण्यात आले. इतरही शेकडो ब्राह्मणांची उत्पन्नं आणि इनाम सरकारजमा करण्यात आले.
 
हे प्रकरण कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलपर्यंतही गेले. वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा यावर चर्चा, टीका घडत राहिली. 1905 साली डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर सभेतील ठरावात महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण निवळले.
 
शिक्षण कार्य
राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यातल सर्वात मोठा भाग हा त्यांच्या शैक्षणिक बदलांनी भरलेला आहे. सर्व जातींच्या मुलांना, मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी कोल्हापुरात जातीनुरुप वसतीगृहे काढली. 1901 सालीच त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. त्यानंतर त्याच्या पुढच्याचवर्षी त्यांनी मागास जाती-जमातीतल्या लोकांसाठी सरकारी नोकरीमध्ये निम्म्या जागा राखीव ठेवण्याचा आदेश काढला. शंभर वर्षांपुर्वी असा क्रांतिकारक निर्णय घेणं मोठं धा़डसाचं आणि आश्चर्याचं काम होतं.
 
1906 साली त्यांनी किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीही मुसलमानांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था सुरू केली आणि तिचे ते अध्यक्षही झाले.
 
1908 साली त्यांनी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह स्थापन केले. अशाप्रकारे अनेक जातीनिहाय संस्था कोल्हापुरात स्थापन झाल्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
 
मागास जातीतील विद्यार्थ्यांनाही फी माफ करण्याचा निर्णय शाहू महाराजांनी लागू केला होता. पाटीलचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी दिल्ली दरबार मेमोरियल पाटील स्कूल ही शाळा स्थापन केली होती.
 
1912 साली धार्मिक विधींचे प्रशिक्षण देण्यासाठी सत्यशोधक शाळा सुरू करण्यात आली. याबरोबरच देशातील अनेक संस्थांना, वसतीगृहांना, मुलांना त्यांनी मदत आणि देणगी दिलेली होती.
 
संस्थानामध्ये मोडी लिपीऐवजी बाळबोधचा वापर करण्याचा त्यांनी आदेश काढला होता. अनेक साहित्य, नाट्यसंस्थांना देणग्या-पालकत्व देण्याचं काम त्यांनी केलं होतं.
 
अनेक लेखकांना ग्रंथनिर्मितीसाठी, संशोधनासाठी त्यांनी मदतीचा हात दिला.
 
उद्योगासाठी चालना आणि सामाजिक सुधारणा
1906 साली शाहू महाराजांनी कोल्हापुरात कापडगिरणीही सुरू केली. यापुर्वीही त्यांनी कापडउद्योगासाठी संस्थानात प्रयत्न केले होते.
 
किर्लोस्करांना महायुद्धाच्या काळात लोखंडाची कमतरता भासली तेव्हा शाहू महारांजांनी संस्थानातील लोखंडी तोफा देऊन त्यांच्या कारखान्याचे उत्पादन कायम राहावे यासाठी मदत केली. नंतरच्या काळातही त्यांनी अशी लोखंडासाठी मदत देऊ केली होती.
 
संस्थानातील उद्योगाची, शेतीची भरभराट व्हावी यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानात धरण आणि कालव्यांची योजना आखली.
 
म्हैसूर संस्थानच्या सर एम. विश्वेश्वरय्या यांनीही संस्थानची पाहणी केलेली होती. 1909 साली राधानगरी धरणाचे कामही सुरू झाले.
 
उद्योगाबरोबरच त्यांनी सहकारी संस्थांना चालना देण्याचं काम केलं. तेव्हाच्या भारत सरकारचा सहकार कायदा संस्थानाला लागू केला आणि 1913 साली कोल्हापुरात कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटी लागू सुरू केली. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेकवेळा शेती आणि उद्योगाची प्रदर्शनं भरवली होती आणि अनेक प्रदर्शनांना त्यांनी भेटीही दिल्या होत्या.
 
1917 साली त्यांनी संस्थानात सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. त्याच्या पुढच्याच वर्षी कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा सुरू झाली. तसेच बलुतेदारी बंद करण्याचा कायदा लागू केला.
 
मिश्रविवाह तसेच आंतरजातीय विवाह व्हावेत याला प्रोत्साहन देणारा कायदा सुरू केला.
 
महार जातीच्या लोकांना कामाची सक्ती करता येणार नाही तसेच त्यांना त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करुन देण्याचा निर्णय घेतला.
 
1918 सालीच शाहू महाराजांनी गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जातींची हजेरी माफ केली तसेच कुलकर्ण्यांची वंशपरंपरागत नेमणूक बंद करुन तेथे तलाठी नेमण्यास सुरुवात केली.
 
सर्व खात्यांत अस्पृश्यांना विशेष अग्रक्रम द्यावा असेही त्यांनी जाहीर केले होते. विवाहासंदर्भातही त्यांनी अनेक नवे नियम लागू केले होते. स्त्रियांचा छळ व घटस्फोटासाठीही नियम सुरू केला.
 
सर्व शाळांमध्ये सर्व जातींच्या मुलांना प्रवेश देण्यास सुरुवात केली.
 
अस्पृश्यता पाळण्याला बंदी घालून सर्व सरकारी-सार्वजनिक ठिकाणं अस्पृश्यांसाठी खुली केली होती.
 
भारतातल्या संस्थानिकांचे प्रतिनिधी मंडळ म्हणजे नरेंद्र मंडळातही त्यांचा विशेष सहभाग असे आणि त्यात ते आपल्या सुचना मांडत असत.
 
1897 च्या सुमारास एक मशीद हिंदू अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचे प्रकरण शाहू महाराजांच्यासमोर आले होते, शाहू महाराजांनी या प्रकरणाची चौकशी करुन ते प्रकरण सलोख्याने निकालात काढले होते.
 
त्यानंतर राजवाडा परिसरातील एका मशिदीच्या जागेवरुन वाद झाला होता. या मशिदीलाही शाहू महाराजांनी शाहुपुरीत वेगळी जागा देऊन ते प्रकरण शांत केले होते. हिंदू- मुस्लीम वाद होऊ नये यासाठी ते काळजीपूर्वक पावलं टाकत असल्याचं दिसून येतं.
 
कोल्हापूरची सुत्रं हाती आल्यावर 1894 साली शाहू महाराज पुण्याला गेले होते. त्यावेळी गणपती उत्सवाच्यावेळी पुण्यात हिंदू-मुस्लीम भांडण झाले होते. तेव्हा शाहू महाराजांनी सार्वजनिक सभेला हिंदू मुस्लीम यांच्यात शांततेचा समेट घडवून आणावा असा सल्ला दिला होता. या सल्ल्याचा उल्लेख सुधारक पत्राने करुन शाहू महाराजांच्या या सुचनेवर पुण्यातील पुढारी विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. शाहू महाराजांनी मुस्लीम बोर्डिंगच्या स्थापनेत, शिक्षणकार्यात वाटा उचलला हे तर सर्वांनाच माहिती आहे.
 
अखेर
शाहू महाराज यांचे मुंबईला अनेक कामांमुळे येणं जाणं होत असे. गव्हर्नर तसेच इतर अधिकाऱ्यांशी, संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठी त्यांना मुंबईत जावं लागे.
 
सुरुवातीच्या काळात ते मुंबईतील सरदारगृह या इमारतीमध्ये उतरत असत.
 
या इमारतीत अनेक संस्थानिक, राजकीय नेते, उच्चपदस्थ मुंबईत आल्यावर मुक्काम करत असत. लोकमान्य टिळकही याच इमारतीत राहात असत. त्याच इमारतीमध्ये उतरत. सरदारगृहातच लोकमान्य टिळकांचे 1920 साली निधन झाले होते.
 
शाहू महाराजांनी मुंबईत राहाण्यासाठी स्वतःची जागा असावी यासाठी प्रयत्न केले होते. मुंबईत त्यांनी पन्हाळा लॉज हे निवासस्थान निवडले.6 मे 1922 रोजी शाहू महाराज यांचे मुंबईतील पन्हाळा लॉज या निवासस्थानी निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
 
बदलाच्या सांध्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्रात कला, क्रीडा, साहित्य, सुधारणा, शिक्षण, उद्योग, शेती अशा सर्वच क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी आपलं मार्गदर्शन केलं होतं. दोन वर्गातील भेद नष्ट व्हावा यासाठी राजसत्तेचा, अधिकाराचा सुयोग्य वापर करणारं नेतृत्व त्यांनी जोपासलं. समाजाची सुधारणा म्हणजेच देशाची सेवा हे एकमेव ब्रीद त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं.
 
48 वर्षांचं अल्पायुष्य मिळालेल्या शाहू महाराजांनी पुढच्या अनेक शतकांच्या सुधारणा करुनच विश्रांती घेतली.
 
या लेखासाठी मराठी विश्वकोश, धनंजय कीर यांचे राजर्षी शाहू छत्रपती आणि डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य’ ग्रंथांची मदत घेतली आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!