Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज 5 जून. पर्यावरण दिन. त्यानिमित्त...

आज 5 जून. पर्यावरण दिन. त्यानिमित्त...
, मंगळवार, 5 जून 2018 (12:40 IST)
निसर्गाचे सौंदर्यं र्पर्यावरणातच  
प्राचीन काळी शिक्षण देणारी गुरुकुले निबिड अरण्यात असत. गुरुदेव टागोरांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणून संगीत, नृत्य, नाट्य आणि काव्याद्वारे निसर्गाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. शांतिनिकेतन विश्र्वविद्यापीठात प्रत्येक ऋतूच्या स्वागतासाठी समारंभपूर्वक वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत. वृक्षारोपणाची संकल्पना गुरुदेवांनी 1928 सालापासून सुरू केली. पर्यावरण या संकल्पनेच्या मुळाशी निसर्गाचे तत्त्वज्ञान आहे.
 
आधुनिक जगात आपल्यापैकी बहुतेकजणांचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे. आपण वापरत असलेली प्रत्येक वस्तू कोठून आली, याचा विचार केला तर ती गोष्ट निसर्गापासूनच प्राप्त होत असल्याचे आपल्याला दिसून येईल. निसर्गाद्वारे उपलब्ध संसाधने व नैसर्गिक प्रक्रियाद्वारे आपल्याला स्वच्छ व प्रदूषणमुक्त पर्यावरण प्राप्त होत असते. अन्यथा पृथ्वीवरील जीवन शक्य होणार नाही. नैसर्गिक संसाधनावर आपण सारे अवलंबून असून संसाधनाचे समान वाटप करण्यासाठी आपण त्याचा योग्य प्रमाणात उपयोग करायला हवा. नैसर्गिक संसाधनांवर आपण अवलंबून असल्याची कल्पना देण्याबरोबरच निसर्गाचे सौंर्दय व त्यातील आश्चर्याचा आस्वाद घेण्यास शिकविले पाहिजे. पृथ्वीवरील र्पावरणाचा होणारा र्‍हास व जगातील बहुतेक विकसित व विकसनशील देशातील लोक ज्या प्रदूषित वातावरणात राहात आहेत ते बदलण्यासाठी  युवकांत जागृतीचा परिणाम होईल व याच्या नेमके उलट चित्र समोर येऊ लागेल. आपण बहुतेकवेळा निसर्गाची योग्य दखल घेत नाही व निसर्गाला गृहीत धरून चालतो. रमणीय नीरव शांतता अनुभवण्यासाठी अथवा पक्ष्यांचे गाणे ऐकण्यासाठी वा जंगलातील वार्‍यामुळे पानांची होणारी सळसळ अनुभवणसाठी आपण क्वचितच वेळ काढतो. प्राणी, पक्षी व जंगलातील परस्पर संबंधाविषयी विचार करण्यासाठी आपल्याकडे  क्वचितच वेळ असतो. आपल्या सभोवती नैसर्गिक घटनांची अनुभूती घेतली तर आपले जीवन समृद्ध होईल. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. निसर्गाची बदलती रूपे हा नित्याचा जीवनक्रम असून सभोवतीच्या समृद्ध जिवंत निसर्गाचे ते प्रकटीकरण असते. निसर्गाच्या अद्‌भुत सौंदर्याचा आस्वाद आपण घेतला तर आपले जीवन सुंदर व समृद्धतेने परिपक्व होईल. एकदा निसर्गाचे हे मूल्या जाणले की, मग आपण नैसर्गिक संसाधनाचे शोषक न बनता त्याचे रक्षक बनतो. निर्जन स्थळांच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या. याठिकाणी मनाला शांती व आनंदही मिळेल. अन्यथा निसर्गाशिवाय पृथ्वी हा एक केवळ माणसांनी गजबजलेला प्रदेश बनेल. जोपर्यंत आपण निर्जन वनप्रदेशांचे महत्त्व जाणत नाही व पर्यावरण रक्षण करणे हे आपले नैसर्गिक कर्तव्य मानत नाही तोपर्यंत पर्यवरण मूल्यांची वृद्धी होणे असंभव आहे. पृथ्वीवरील निसर्ग किंवा पृथ्वीवरील जीवन केवळ अशक्य आहे.
webdunia
प्राचीन भारतीय परंपरेनुसार डोंगर, नद्या, वने व वन्यजीवांना महत्त्व दिले. त्यामुळे निसर्गातील बहुतेक घटकांचा योग्य आदर राखला जाऊन त्याचे संरक्षणही होत असे. हिंदूधर्मात तसेच अनेक आदिवासी संस्कृतीत वनांचा संबंध देवतांशी जोडण्यात आला आहे. तसेच वनस्पतींच्या विशिष्ट जातींच्या वृक्षदेवता असल्याचे मानले जाते. पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते व हे झाड तोडले जात नाही. महाराष्ट्रातील बर्‍याच भागात वडांच्या झाडाची पूजा केली जाते. तुळशीचे रोप तर भारतीय संस्कृतीत प्रत्येक घरात लावले जाते. भारतीय संस्कृतीत विशेषतः आदिवासी संस्कृती जंगलांच्या अनेक भागांना देवराई मानून कुठल्या ना कुठल्या देवतेस समर्पित केली जाते. भारतीपरंपरेनुसार देवधर्माच्या पगड्याखाली संरक्षित राहिल्याने देवराईतून अनेक वृक्ष प्रजातींचे संवर्धन झाले आहे. या देवराईतून अनेक वनस्पतींना पवित्र मानून त्यांचे संवर्धन करतात. अनेक वनस्पतींच्या जाती, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण फळे आणि फुलांसाठी जतन केल्या जातात. जळाऊ लाकडांची कितीही टंचाई निर्माण झाली तरी शेतबांधावरील आंब्याचे झाड लाकडासाठी कापले जात नाही. यातील बरच वनस्पती वनात आढळून येतात. पण अलीकडे या औषधी वनस्पतींची संख्या झपाट्याने कमी होत असून यातील अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय पुराणात अनेक वन्यप्राणी हे देवदेवतांचे वाहन मानले जातात. 
webdunia
अनेक वनस्पतींचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व मानण्यात आले आहे. यात तुळशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या रोपट्याचा संबंध लक्ष्मी व कृष्णाबरोबर जोडण्यात आला आहे. भगवान गौतम बुद्धांना वडाच्या झाडाखाली दिव्ज्ञान प्राप्त झाले असे मानले जाते. वडाच्या झाडाशी विष्णू व भगवान कृष्ण निगडित आहेत. परंपरेनुसार या अनेक प्राणी, वनस्पती प्रजाती परंपरागत जीवनशैलीसाठी आवश्यक मानल जातात. भूतकाळात समाजात ही सर्व उदाहरणे पारंपरिक नैतिकमूल्यांवर आधारित होती व त्यामुळे पर्यावरण निसर्गाचे संवर्धन होत असे. आधुनिक विज्ञानावर आधारित नैसर्गिक संसाधनाचे शोषण करण्याची सुरुवात झाल्यापासून पर्यावरवादी पारंपरिक नीतिमूल्यांचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. या पर्यावरण दिनी पर्यावरण रक्षण करण्यासाठी सर्वांनी शपथ घेतली पाहिजे.
 
काशीनाथ जावेर 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

GoAir धमाकेदार ऑफर, आता 1299 मध्ये हवाई प्रवास