हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर आता प्रथमच एका मराठी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'वेबदुनिया'शी बोलताना शक्ती कपूरने सांगितले, मी अनेक दिवसांपासून मराठी चित्रपट करण्याचा विचार करीत होतो परंतु चांगली भूमिका मिळत नव्हती. बायको झाली गायबच्या भूमिकेची ऑफर आली तेव्हा ती भूमिका मला आवडली आणि मी लगेच होकार दिला.
ओम चिंतामणी फिल्म्स प्रस्तुत निर्माता विजय ल. शिंदे यांचा पाचवा चित्रपट 'बायको झाली गायब' फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात वर्षा उसगांवकर दुहेरी भूमिकेत असून विजय पटवर्धन नायकाची भूमिका साकारीत आहे. नायक म्हणून विजयचा हा पहिलाच चित्रपट आहे.
ग्यान नरसिंगानी आणि किसन बोंगाळे दिग्दर्शित या चित्रपटात शक्ती कपूर खलनायक मसूद खानची भूमिका साकारीत आहे.
शक्ती कपूरने सांगितले, मी दिल्लीहून मुंबई चित्रपटात काम करण्यासाठी आलो. महाराष्ट्राने मला नाव, पैसा, बायको, मुले दिली. महाराष्ट्राचा मी खूप आभारी आहे. मी स्वतःला मराठी समजतो. माझी बायको मराठी, मुले मराठी. मराठीतील सुपरस्टार दादा कोंडके यांच्याबरोबर एक हिंदी चित्रपट केला आहे. मला मराठी चित्रपट करायचा होता. विजय शिंदे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला मसूद खानच्या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा मी तयार झालो. परंतु माझ्या मुलांनी म्हटले की बाबा, पहिल्याच मराठी चित्रपटात तुम्ही खलनायक का साकारता तेव्हा मी म्हटले की, मी एक अभिनेता आहे आणि जी भूमिका मिळेल ती मी साकारेन.
या चित्रपटात मी खलनायक मसूद खानची भूमिका साकारीत आहे. मसूद खान आंतरराष्ट्रीय दहशतवादी असून लश्करे तोयबाबरोबर त्याचे संबंध आहेत. तो मुंबईत अण्णा पाटील नावाने रहात असतो. तो मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसून नागरिकांना ओलीस ठेवतो आणि नंतर काय होते ते तुम्ही चित्रपटातच पहा.
मुंबईवर २६-११ ला झालेल्या हल्ल्यावर आधारित हा चित्रपट आहे. विजय शिंदे यांनी भव्य पद्धतीने चित्रपट तयार केला आहे.
मराठी कलाकारांबद्दल तर प्रश्नच नाही. त्यांच्याऐवढे चांगले कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत फारच कमी आहेत. माझा हा पहिलाच मराठी चित्रपट असून माझ्या खूप अपेक्षा आहेत. शक्ती कपूर यांनी पुढे सांगितले, मराठी चित्रपटांना आता चांगले दिवस आले आहेत. हरिश्चंद्रांची फॅक्टरी, नटरंग सारखे चांगले चित्रपट प्रदर्शित होत आहेत. एक मराठी म्हणून मला हा मराठी चित्रपट करताना खूप आनंद झाला.
तू यात मराठी बोलला आहेस का? विचारता शक्ती कपूर म्हणाला, मला मराठी तेवढे चांगले अजून येत नाही. मात्र मराठी समजते. माझ्या घरात पत्नी शिवांगी आणि मुले मराठीत बोलतात. मी पाकिस्तानी दहशतवादी आहे त्यामुळे मला यात जास्त हिंदीच बोलावे लागले आहे.