एखाद्या रेस्तराँमध्ये गेल्यावर तिथं तुम्हाला वाइन ऐवजी लक्झरी पाण्याचा मेन्यू दिलेला तुम्ही कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का? किंवा एखाद्या सेलिब्रेशनसाठी जेव्हा ड्रिंक टोस्ट करतात तेव्हा शॅम्पेन किंवा फ्रूट ज्युसऐवजी फॅन्सी पाण्यानं भरलेला ग्लास कधी दिसला आहे का?
वरच्या प्रश्नांमध्ये ज्या पाण्याबाबत चर्चा होत आहे, त्यातून साध्या मिनरल वॉटर किंवा नळाच्या पाण्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं मिळेल असं आश्वासन दिलं जातं. पाण्याच्या अशा पाण्याच्या बाटलीसाठी तुम्हाला हजारो रुपये खर्चही करावे लागतात.
स्टेकपासून (बीफचा तुकडा) ते माश्यासारख्या खाद्यपदार्थांबरोबरही ते सर्व्ह केलं जाऊ शकतं. अगदी वाइनसारखं.
या महागड्या पाण्याला किंवा पेयाला फाइन वॉटर म्हणून ओळखलं जातं. ते ज्वालामुखीमुळं निर्माण झालेले दगड, हिमपर्वतांवरील वितळणारा बर्फ किंवा दव अशाप्रकारच्या नैसर्गिक स्त्रोतांपासून मिळवलं जातं. तसंच थेट ढगांमधूनही ते काढलं जाऊ शकतं.
यापैकी प्रत्येक प्रकारच्या पाण्यात ते ज्याठिकाणाहून आलेले असते त्याची वैशिष्ट्ये असतात. तसंच बाटलीबंद पाण्याच्या अगदी उलट हे पाणी पूर्णपणे प्रक्रियामुक्त असतं, म्हणजे त्यावर काहीच प्रक्रिया केलेली नसते.
सध्या जगभरात फाइन वॉटरचे शेकडो ब्रँड तयार झाले आहेत. एवढंच काय पण याबाबत सल्ला देणारे तज्ज्ञही उपलब्ध आहेत.
पाण्याला चव असते का?
वाइन टेस्टिंगप्रमाणेच पाण्याचं मूल्यमापन करणारेही असतात. प्रत्येक उत्पादनातील खनिजांचं प्रमाण, चव आणि पिताना येणारा अनुभव या पातळींवर त्याचं मूल्यांकन करणं हे त्यांचं काम असतं.
"पाणी हे केवळ पाणी नसतं. जगातील प्रत्येक पाणी हे वेगळं असतं आणि त्याला चव असते," असं लंडनमध्ये पॉप अप नावाचं स्टोर चालवणारे पाण्यासंबंधीचे सल्लागार आणि सोमलियर (वाइनचं मूल्यमापन करणारे) मिलिन पटेल यांनी म्हटलं.
पाण्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्यांसाठी ते टेस्टिंग सेशन आयोजित करत असतात. त्यात नळाचं आणि बाटलीबंद पाणी यांचाही समावेश असतो.
पाण्याचे विविध प्रकार आणि त्याची चव याबाबत लोकांना आणि प्रामुख्यानं तरुण पिढीला माहिती करून देण्याच्या मिशनवर असल्याचं पटेल बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.
"शाळेत आपल्याला नैसर्गिक जलचक्राबद्दल शिकवल्याचं आठवतं का? त्यात बाष्पीभवन (पाण्याची वाफ होणे), संघनन (वाफेचे ढग तयार होणे) आणि पाऊस याचा समावेश होता. पण त्यातील पुनर्खनिजीकरण हा मुद्दा राहून गेला," असं ते म्हणाले.
"त्यामुळं एकदा पावसाचं पाणी जमिनीवर पडलं की ते शोषलं जातं. त्यानंतर ते माती, विविध प्रकारचे दगड यातून प्रवाहीत होत कॅल्शियम, मॅग्नेशिय, पोटॅशियम आणि सिलिका अशा प्रकारच्या खनिजांचा पुरवठा करतं. या प्रक्रियेमुळंच पाण्याचा खनिजांची चव प्राप्त होत असते," असंही पटेल यांनी सांगितलं.
हिमपर्वत किंवा पाऊस अशा स्त्रोतांच्या माध्यमातून मिळणारं पाणी हे नैसर्गिकरित्या जमीन किंवा मातीच्या संपर्कात येत नाही. अशा पाण्याची टीडीएस (टोटल डिझॉल्व्ह्ड सॉलिड्स) पातळी ही झरे किंवा विहिरीच्या पाण्याच्या तुलनेत कमी असते.
पटेल यांच्याकडं जगभरातील पाण्याचं कलेक्शन आहे. अगदी नळाच्या पाण्यापासून ते जवळपास 25 हजार रुपयांत ($318) एक बाटली मिळणाऱ्या फाइन वॉटरपर्यंतचा त्यात समावेश आहे. त्यांच्या सेशनमध्ये लोक जेव्हा त्यांची चव चाखतात तेव्हा ते प्रत्येक पाण्याची चव कशी वेगळी आहे, याचं वर्णन करतात.
"पाण्याकडं चव नसलेलं अशाच दृष्टिकोनातून पाहू नये म्हणून आम्ही लोकांना संधी उपलब्ध करून देतो. जेव्हा तुम्हाला पाण्याबद्दल माहिती मिळू लागते आणि त्याचा विचार करून तुम्ही ते प्यायला लागता तेव्हा तुम्हाला यातील विविध पैलू समजल्यानंतर त्याच्या चवीचं वर्णन करणारे सुचलेले शब्द पाहून आश्चर्य वाटू शकतं.
"आम्हाला यात सॉफ्ट(मऊ), क्रिमी(मलाईदार), टिंगली(तिखट किंवा मसाल्यासारखे), वेलवेटी, बिटर (कडू) आणि कधीकधी सावर(आंबट) असे अनेक शब्द किंवा चवीचे प्रकार मिळाले. त्याला मी अॅक्वाटेस्टोलॉजी म्हणतो," असं पटेल यांनी सांगितलं.
"अनेक लोक असंही म्हणतात की, 'यानं मला तरुणपणातील दिवस आठवले, 'मला सुटीच्या दिवसाची आठवण झाली,' किंवा 'यानं मला आजी-आजोबांच्या घराची आठवण आली," असंही त्यांनी सांगितलं.
वॉटर टेस्टिंगच्या स्पर्धा
फाइन वॉटर सोसायटीचे सदस्य दरवर्षी एकत्र येतात. भुतानपासून-इक्वाडोरपर्यंत जगभरातील फाइन वॉटर उत्पादकांना इथं एकत्रित आणलं जातं आणि आंतरराष्ट्रीय टेस्टिंग स्पर्धांचं आयोजन केलं जातं.
या वार्षिक परिषदेत सहभागी होणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं दुर्गम भागातून पाण्याचं उत्पादन करणाऱ्या पिढीजात व्यवसायातील लोकांचा समावेश असतो.
"वॉटर टेस्टिंगकडं सुरुवातीला अत्यंत हास्यास्पद कल्पना म्हणून पाहिलं गेलं होतं," असं फाइन वॉटर सोसायटीचे सहसंस्थापक डॉक्टर मायकल माशा यांनी सांगितलं.
"मला 20 वर्षांपूर्वी दारु पिणं सोडावं लागलं होतं तेव्हा मी ही सगळी प्रक्रिया सुरू केली होती," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
"अचानक जेव्हा वाइन बाजुला सारावी लागली तेव्हा मी टेबलच्या चारही बाजुंना पाहिलं. तेव्हा मला आणखी एक बाटली दिसली ती मी आधी पाहिली नव्हती. ती पाण्याची बाटली होती. मी विचार केला की आपण उत्सुकतेचा वापर वाइन ऐवजी पाण्याच्या बाबतीत करायवा हवा," असंही त्यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, फाइन वॉटर फक्त शरिराची पाण्याची गरज पूर्ण करण्यापेक्षाही अधिक बरंच काही प्रदान करतं. लोकांसाठी काहीतरी नवं करणं, त्याचा अनुभव एकमेकांबरोबर शेअर करणं आणि वेगळा आनंद घेण्याची ही संधी आहे. तुम्ही मुलांबरोबरही हे करू शकता ते वाइनबाबत शक्य नाही, असंही ते म्हणाले.
डॉ. माशा यांच्या दाव्यानुसार आता फाइन वॉटरची मागणी वाढू लागली आहे. दारु आणि कार्बोनेटेड शीतपेयांचं प्रमाण कमी करण्यामुळं हा ट्रेंड वाढत असल्याचं त्यांना वाटतं. विशेषतः तरुण पिढीला अधिक आरोग्यदायी जीवनशैली हवी असल्यानं त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.
त्याशिवाय या दुर्मिळ आणि प्रक्रियामुक्त पाण्याचं विंटेज वाइनसारखं एखाद्या कथेद्वारे मार्केटिंग केलं जाऊ शकतं. त्यामुळं ते अधिक आकर्षक बनण्यास मदत होऊ शकते.
पाणी आणि अन्न
अमेरिका आणि स्पेनसारख्या देशांमधील काही रेस्तराँच्या मेन्यूमध्ये आता काही डिशबरोबर संलग्न करून विशिष्ट प्रकारच्या फाइन वॉटरचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.
"मी सध्या अमेरिकेतील एका थ्री स्टार मिशेलिन रेस्तराँसाठी फाइन वॉटरचा मेन्यू तयार करत आहे. खाद्यपदार्थ आणि वातावरण याला पूरक ठरणाऱ्या 12 ते 15 अत्यंत काळजीपूर्वक निवडून शोधून आणलेल्या पाण्यांचा समावेश करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असं डॉ. माशा यांनी म्हटलं.
"तुम्ही मासे खात असाल तेव्हा तुम्हाला ते विशिष्ट पाण्याबरोबर सर्व्ह केले जाईल. मासे खाताना तुलनेनं कमी खनिजांचा समावेश असलेल्या पाण्याची गरज असते."
डॉ. माशा हे सध्या सुपर लक्झरी हाऊसिंग आणि अपार्टमेंट प्रोजेक्टमध्ये 'वाइन सेलर' ऐवजी 'वॉटर एक्सपिरियन्स रूम्स' तयार करण्याचं कामही करत आहेत.
धार्मिक कारणांमुळं दारु निषिद्ध मानणाऱ्या संस्कृतींमध्ये आणि विशेषतः लग्न सोहळ्यात फाइन वॉटर लोकप्रिय आहे, असंही डॉ. माशा यांनी सांगितलं. महागड्या शॅम्पेनऐवजी पर्यायी भेटवस्तू म्हणूनही ते उत्तम असल्याचा दावाही माशा करतात.
पण इतर गोष्टींप्रमाणेच यावरही टीका होतच आहे.
'नैतिकदृष्ट्या चुकीचे'
जगभरात असे लाखो लोक आहेत ज्यांचा साधं स्वच्छ पाणी मिळण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्वांत मूलभूत गरज असलेल्या पाण्याचं अशा प्रकारे व्यावसायिकरण करण्याची कल्पना अनेकांना खटकते.
संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार 2022 मध्ये 2.2 अब्ज लोकांना सुरक्षितपणे पिण्याचं पाणी मिळत नाही. त्यापैकी 70 कोटी लोकांकडं तर पाण्याची अगदी पायाभूत सुविधाही उपलब्ध नाही.
तर काही टीकाकारांच्ये मते, ही फॅशन म्हणजे एक प्रकारचा धोका आहे. पाणी हे पाणीच असून नळाचं पाणी, बाटलीबंद पाणी आणि तथाकथिक फाइन वॉटर यात किमतीपेक्षा वेगळं काहीही नाही.
तर पर्यावरणवाद्यांच्या मते, कोणत्याही प्रकराच्या बाटलीबंद पाण्यामुळं पर्यावरणाची हानीच होते. कारण शेवटी त्यापासून लवकर नष्ट न होणारा कचरा तयार होतो.
लंडनच्या ग्रेशम कॉलेजमधील पर्यावरणाच्या प्राध्यापक कॅरोलिना रॉबर्ट्स यांच्या मते, एकिकडं लाखो लोकांना साधं स्वच्छ पाणी मिळत नसताना, पाण्याच्या एका बाटलीसाठी हजारो रुपये खर्च करणं नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे.
"तुम्ही इतरांबरोबर बाहेर डिनरसाठी जाता तेव्हा तुमच्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यापलिकडं त्यात दुसरं काहीही नाही. अंटार्क्टिका किंवा हवाईतून कुठूनतरी वाहणाऱ्या पाण्यानं भरलेल्या या बाटलीसाठी मी पैसे मोजत आहे, असं जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा लोकांना चांगलं वाटत असतं. पण प्रत्यक्षात त्याचा कोणालाही काहीही फायदा नसतो. सर्वकाही पैशासाठी आहे," असं त्या बीबीसीबरोबर बोलताना म्हणाल्या.
"महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनंही ते अधिक घातक आहे. मग ते मायक्रोप्लास्टीकमध्ये रुपांतरीत होणारं प्लास्टिक असेल ज्यासाठी जीवाश्म इंधन जाळलं जातं किवा काच असेल जी दुर्गम भागातून हजारो किलोमीटर लांबून वाहतूक करून आणावी लागते. दोन्हीमुळं कार्बन उत्सर्जनाचे परिणाम भोगावे लागतात," असं त्या म्हणाल्या.
"त्यामुळं विषय फक्त पैशाचा नाही. तर या तथाकथित फाइन वॉटरमुळं होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीचाही मुद्दा आहेच. "
पण डॉक्टर माशा याला प्रतिवाद करताना सांगतात की, फाइन वॉटर फक्त श्रीमंतांसाठीच आहे असं नाही. काही चांगल्या दर्जाचे फाइन वॉटर अवघ्या $2 मध्येही उपलब्ध आहे. तसंच त्यांनी पर्यारणावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या प्रक्रिया केलेलं पाणी आणि नैसर्गिक फाइन वॉटर याच फरक असल्याचंही म्हटलं.
"शाश्वत दृष्टीकोनातून विचार करता नळाचं प्रक्रिया केलेलं पाणी बाटलीत भरण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही सुपमार्केटमध्ये जाता, प्लास्टिकच्या बाटल्या घरी आणता ते पाणी पिता आणि रिकाम्या बाटल्या फेकून देता. ते प्रचंड कचरा तयार करतं."
त्यामुळं बाटलीतील पाणी पिण्याऐवजी गरज म्हणून नळाचंच पाणी प्यावं असा सल्ला ते देतात.
"आपण अनेकदा विसरतो की, नळाद्वारे मिळणारं पिण्यायोग्य पाणी हा एक प्रकारचा विशेष अधिकार असून, जगातील अनेक लोकांना हा अधिकार मिळत नाही," असंही ते म्हणाले.