Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दारू न पिताही लिव्हर खराब करणारा हा कोणता आजार आहे?

दारू न पिताही लिव्हर खराब करणारा हा कोणता आजार आहे?
, मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (15:21 IST)
- ओंकार करंबेळकर
अरे... मी तर दारू पितच नाही... मग माझी लिव्हर कसं खराब होईल... मला काहीच होणार नाही.... असा सरसकट विचार आपण नेहमीच करतो. किंवा चारचौघांमधल्या गप्पांमध्ये असे विषय सहज कानावर पडतात. पण फक्त दारू पिणाऱ्यांनाच लिव्हर खराब होण्याचा किंवा लिव्हरसंदर्भात इतर आजार होण्याचा धोका असतो हा मोठा गैरसमज आहे.
 
बदलत्या काळात आपली जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. व्यायामाच अभाव आणि उच्चकॅलरीयुक्त खाणं यामुळे आपल्याला काही आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यांना जीवनशैलीमुळे आलेले आजार किंवा लाईफस्टाइल डिसिज असं म्हणतात.
 
त्यापैकीच एक आजार म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटि लिव्हर डिसिज (NAFLD). याच आजाराची आपण इथे माहिती घेऊ. (आपल्या सोयीसाठी इथे त्याला फक्त फॅटी लिव्हर असं संबोधू)
 
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज म्हणजे काय?
ही एक आपल्या लिव्हर म्हणजे यकृतात झालेल्या बदलांमुळे निर्माण होणारी स्थिती आहे. ही स्थिती बहुतांशवेळा प्रमाणापेक्षा जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ असणाऱ्या लोकांमध्ये दिसून येते.
 
आपल्या लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट साचत जाते आणि ही स्थिती तयार होते.
 
या स्थितीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात फारसा त्रास होत नसला तरी त्याच्या पुढील टप्प्यांमध्ये त्रास वाढत जातो. जर फॅटी लिव्हरची स्थिती अधिकाधिक बिघडत गेली तर लिव्हर सिरोसिससह लिव्हर खराब होईपर्यंत धोका वाढू शकतो.
 
ही स्थिती दारूमुळे होत नसली तर दारू प्यायल्यास ही स्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे फॅटी लिव्हरवर मात करण्यासाठी दारू, सिगारेट पूर्णपणे टाळणं आवश्यक आहे.
 
लिव्हर हेल्थ युकेच्या माहितीनुसार, यकृताच्या पेशींमध्ये मेदाचे म्हणजे फॅट नसले किंवा फॅटचे प्रमाण अत्यंत कमी असले तर त्या यकृत पेशी चांगल्या आरोग्यपूर्ण समजल्या जातात. जर 5 टक्क्यांपेक्षा जास्त मेद या यकृताच्या पेशींमध्ये साठला तर ते प्रमाण जास्त समजले जाते.
 
अशा स्थितीचे रुपांतर फॅटी लिव्हरमध्ये होते. युनायटेड किंग्डममध्ये प्रत्येक 3 पैकी एका व्यक्तीला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिझ असल्याचा अंदाज आहे.
 
याच संस्थेच्या माहितीनुसार जगामध्ये 65 कोटी लोकांना म्हणजेच 8.8 टक्के लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास होत आहे. तसेच हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावरुन हा आजार किती भीषण होत चालला आहे याची कल्पना येईल.
 
युनायटेड किंग्डमच्याच नॅशनल हेल्थ सर्विसच्या माहितीनुसार लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट साचणं हे मधुमेह, अतिरक्तदाब, मूत्रपिंडाच्या आजारांशी जोडलेले असू शकते. मधुमेही व्यक्तीमध्ये फॅटी लिव्हरची स्थिती तयार झाली तर हृदयरोग होण्याची शक्यता वाढते.
 
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिजचे टप्पे
सिंपल फॅटी लिव्हर किंवा स्टिअॅटोसिस
 
यकृतामध्ये मेदाच्या पेशींचे संचयन सुरू होते. या टप्प्यात फारसा दाह किंवा जळजळ वाटत नाही. तसेच बहुतांशवेळा या टप्प्यात कोणतीही विशेष लक्षणं जाणवत नाहीत.
 
त्यामुळे आपल्या शरीरात फॅटी लिव्हर आजाराची सुरुवात झाली आहे याची कल्पना लोकांना येत नाही. जर लोकांनी याच टप्प्यात चांगला आहार आणि व्यायाम, जीवनशैली बदल केले तर पुढील त्रास टळू शकतो.
 
स्टिअॅटोहेपटायटिस
 
या टप्प्यात यकृतात मेदपेशी म्हणजे फॅटसेल्स वाढून दाह (इन्फ्लमेशन) सुरू होतो. यकृत जेव्हा आपल्या खराब झालेल्या उतींची (टिश्यूज) दुरुस्ती करत असतं तेव्हा हा दाह होतो.
 
पण खराब झालेल्या उतींची संख्या वाढते तेव्हा आवश्यक त्या वेगानं त्यांची दुरुस्ती करणं यकृताला शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या यकृतात घाव तयार होऊ शकतो. जेव्हा घाव म्हणजे scar च्या उती वाढतात तेव्हा त्याचं रुपांतर फायब्रॉसिसमध्ये होतं.
 
फायब्रॉसिस
 
घाव किंवा व्रणाच्या उती यकृतात आणि यकृताजवळच्या रक्तवाहिन्यांजवळ वाढतात तेव्हा ही फायब्रॉसिसची स्थिती तयार होते. या स्थितीतही यकृत आपलं काम बऱ्यापैकी करत असतं. जर यावेळेस योग्य आणि तातडीचे उपचार झाले नाहीत तर धोका वाढू शकतो.
 
सामान्य यकृतपेशींच्या जागी या घावाच्या पेशींची संख्या वाढली तर यकृताला मोठा धोका पोहोचतो आणि सिर्होसिस होऊ शकतो.
 
सिर्होसिस
 
हा या स्थितीचा चौथा टप्पा. या टप्प्यात यकृत योग्यप्रमाणे काम करत नाही. याची लक्षणं दिसू लागतात. त्वचा, डोळे पिवळे दिसतात. बरगड्यांजवळ दुखू लागतं. या स्थितीत घावाच्या उती दूर करणं कठीण असतं. अर्थात पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न करता येतात.
 
पहिल्या टप्प्यापासून चौथ्या टप्प्यापर्यंत स्थिती बिघडत जाण्याची वेळ फार कमी लोकांमध्ये येते. चौथा टप्पा येण्याची स्थिती तयार होण्यास अनेक वर्षांचा काळ जातो. ही स्थिती येऊ नये यासाठी आपल्या यकृताच्या आरोग्याकडे वेळच्यावेळी लक्ष देणं गरजेचं आहे.
 
फॅटी लिव्हर आजार कोणाला होऊ शकतो?
जर तुमचे वजन जास्त असेल, तुम्ही लठ्ठ (ओबेस) असाल तर हा धोका जास्त असतो. तुमच्या शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्सची स्थिती तयार झाली असेल, अतिरक्तदाबाचा त्रास असेल, जास्त कोलेस्ट्रॉल आणि चयापचय (मेटॅबॉलिझम) संदर्भातील त्रास असतील तर फॅटी लिव्हरचा धोका संभवतो. धूम्रपान हे सुद्धा याचं एक कारण आहे.
 
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिझच्या सुुरवातीच्या काळात कोणतीही लक्षणं फारशी जाणवत नाही, तुम्ही एखादी दुसऱ्या कारणासाठी तपासणी केली असेल तर त्यावेळेस याचे सुुरुवातीचे टप्पे समजू शकतात.
 
पण एनएचएसच्या माहितीनुसार फॉयब्रॉसिसमध्ये काहीवेळेस पोटाच्या उजव्याबाजूला वरती (उजव्या बरगडीच्या खाली) दुखू लागते, फार दमायला होतं, विनाकारण वजन कमी होतं, अशक्त वाटतं. सिर्होसिस झाल्यावर त्वचा पिवळी पडते, डोळ्यांतला पांढरा भाग पिवळा होतो, पाय सुजतात.
 
या आजाराचं निदान कसं होतं?
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिजचे निदान अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग चाचणीतून होतं. तसेच लिव्हर फंक्शन टेस्ट या रक्ताच्या चाचणीतूनही केलं जातं.
 
या रक्ताच्या चाचणीत हेपेटायटिसपेक्षा काहीतरी वेगळं आहे असं लक्षात आल्यावर फॅटी लिव्हरकडे लक्ष जातं. त्यानंतर ते कितव्या टप्प्यात आहे, हे पाहाण्यासाठी वेगळ्याप्रकारची एक रक्तचाचणी करतात आणि एक विशेष अल्ट्रासाऊंड स्कॅन (फायब्रोस्कॅन) करतात. काहीवेळेस बायोप्सीही केली जाते. यामध्ये यकृतातील उतींचा एक नमुना घेऊन तो तपासला जातो. काहीवेळेस सीटीस्कॅन आणि एमआरआय स्कॅनची गरज लागते.
 
उपचार
हा या आजारातला महत्त्वाचा टप्पा आहे. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनुसार काही महत्त्वाचे बदल आपल्याला जीवनशैलीत करावे लागतात.
 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन आणि उंची यांचं प्रमाण योग्य आहे हे पाहून वजन कमी करावं लागेल. चांगला आहार घ्यावा लागेल. या आहारात फळं, भाज्यांचा भरपूर समावेश करायचा असतो. तसेच साखर, मीठ किंवा साखरयुक्त पेयं टाळावी लागतील.
 
बाहेरचं खाणं बंद करुन घरी शिजवलेलं ताजं अन्न घ्यायला सुचवलं जातं. बैठी जीवनशैली असेल तर रोज थोडा व्यायाम करणं गरजेचं आहे, त्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया वेगवान होते.
 
अर्थात आपल्या आजाराचं निदान हे आपणच न करता डॉक्टरांकडूनच करुन घेतलं पाहिजे. उपचार आणि जीवनशैली बदल तसेच आहारातले बदल हे प्रशिक्षित आहारतज्ज्ञांकडून घ्यावेत.
 
तुमचं वजन, उंची, तुमचं वय, लिंग, जीवनशैली, सवयी यांचा विचार करुन तज्ज्ञ तुम्हाला आहार आणि व्यायाम सुचवत असतात. त्यामुळे उपचार व निदानाचा निर्णय कधीही स्वतः घेऊ नये.
 
याबाबतीत बीबीसीशी बोलताना आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक म्हणाल्या, “नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिझचा विचार केल्यास त्याची बहुतांश कारमं तुमच्या मेटॅबॉलिक प्रक्रियेत त्यातही वजन वाढल्यामुळे दिसू शकतं. तसेच टाईप टू डायबेटिस आणि उच्च रक्तदाब याबरोबरही तो दिसतो.
 
"यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळी औषधं दिली जातात. डायबेटिस असणाऱ्या लोकांना वेगळी औषधं दिसतात. परंतु यावर महत्त्वाचे उपचार म्हणजे योग्य आहार हेच आहे. सर्व प्रकारची पोषणमूल्यं तुमच्या पोटात गेली पाहिजेत.
 
"केवळ भात, भाकरी, पोळी यावर आहार न ठेवता भाज्या, फळं, दूध, दही, ताक, सुकामेवा योग्य प्रमाणात पोटात जायला हवीत. रोज एखाद्या प्रकारचा व्यायाम केलाच पाहिजे. झोपेची गुणवत्ता सुधारली पाहिजे आणि ताण कमी केला पाहिजे. यामुळे या आजाराची वाढ आणि तीव्रता कमी करता येते,” डॉ. प्रणिता अशोक सांगतात.
 
युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉईसने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात एकदिवस आड केलेला उपवासामुळे, दररोज व्यायाम केल्यामुळे फॅटी लिव्हर डिसिझ कमी झाल्याचं दिसून आलं आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जागतिक महिला दिन 2023 : महिला दिन का साजरा करतात, काय आहे या दिवसाचा इतिहास?