Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुणाच्याही पर्सनल इशूवर नो कमेंटस !!!

कुणाच्याही पर्सनल इशूवर नो कमेंटस !!!
संक्रांत स्पेशल
काल ना आम्ही स्वातीच्या घरी गेलो होतो.. बाप रे.. कित्ती पसारा होता तिच्या घरी !! सोफ्यावर कपडे पडलेले.. पेपर अस्वाव्यस्त.. किचन ओट्यावर भांड्यांचा पसारा.. झाडलेलं ही नव्हतं वाटत घर.. श्शी बाई!! मला नाही आवडत पसारा.. मला कसं, सगळं जागच्या जागी नीटनेटकं ठेवलेलं लागतं. 
 
त्या मीनाक्षीने दिराच्या लग्नात कसली साडी नेसली होती.. घरातलचं लग्न आणि हिची साडी इतकी साधी.. अगदी आपण घरात वापरतो तसली !! पाहुणेमंडळी, व्याही काय म्हणतील याचा तरी विचार करायचा..
 
ती शेजारच्या बिल्डिंगमधली मधुरा.. रोज सकाळी उठून ते झुंबा की काय म्हणतात, ते करायला जाते.. आता दोन पोरांची आई झाली ही.. हिला काय गरज आहे त्याची? आपलं वय काय.. आपण करतो काय.. जरा तरी भान असावं.. काहीतरीच बाई ! 
 
कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकवून या असल्या कमेंट करत असतो आपण बायका.. वेळ-काळ, परिस्थिती, अर्धवट माहिती कशाचंही भान न ठेवता आपली ही नकारात्मक कमेंटगिरी सुरूच असते.  
 
काय मिळतं खरं असं करून आपल्याला? आपल्या हुशारीचा टेंभा मिरवल्याचा आनंद की आपल्याला फार कळतं असा दिखावा केल्याचं समाधान? वास्तविक संबंधित व्यक्तीची आवड निवड, वागण्याची-बोलण्याची- राहण्याची पद्धत ही खरं तर त्याची किंवा तिची खासगी बाब.. जोवर या बाबींचा आपल्याला किंवा सामाजिकदृष्ट्या इतर कुणाला त्रास नाही, तोवर आपण त्यात नाक खुपसण्याचं कारणच नाही. पण आपण किती सहजगत्या या गोष्टी सार्वजनिक करतो!! इतकंच नाही तर त्यावर आपलं मतही व्यक्त करून मोकळे होतो (तेही कुणी विचारलं नसतानाही..). 
 
विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या खासगी गोष्टींबाबत, घरातील विषयांबाबत तिसर्‍या व्यक्तीकडे बोलून काहीच उपयोग नसतो. अगदीच जर काही सांगावसं-सुचवावंसं वाटलं तर त्या व्यक्तीकडेच योग्य त्या शब्दांत  व्यक्त करायला हवं. पण आपल्या भावना पोचवणं आणि त्या व्यक्तीला नाराज न करणं, हा तोल सांभाळणं जरा अवघडच ना..  मग आपण सोपी वाट शोधून सरळ इतरांकडे चर्चा करण्याचा मार्ग निवडतो, ज्यातून काहीच साध्य होत नाही.
 
या बाबतीत मला पुरूषांचं खूप कौतुक वाटतं. पुरूष मंडळी अगदी चार दिवस जरी कुणाच्या घरी राहिली ना तरी घरातल्या गोष्टीत नाक खुपसत नाहीत.. कुणाच्या खासगी गोष्टीत लक्षही देत नाहीत. आपण भलं-आपलं काम भलं, असे राहतात.
पण आपण बायका मात्र जरा कुणाकडे 10-15 मिनिटं जरी गेलो तरी सगळं निरखून पाहतो आणि मग चार चौघीत आपली कमेंटगिरी सुरू ! 
 
आता वर दिलेल्या तीन उदहारणांतील पडद्यामागचा भाग लक्षात घेऊ.. स्मिताचे चुलत सासरे दवाखान्यात अ‍ॅडमिट होते. त्यामुळे रोज दावखान्यात जेवणाचा डबा, चहा, नाश्ता देण्याची जबाबदारी निभावताना स्मिताचं घराकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं. मीनाक्षीच्या दिराच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच तिच्या माहेरच्या नात्यातील एका व्यक्तीचं निधन झालं होतं. अगदी दुसर्‍याच दिवशी लग्न असल्याने लग्न-मानपान सगळं करावं लागलं. पण नातलगाच्या निधनामुळे मीनाक्षीला त्या दिवशी नटावं वाटलंच नाही आणि साधेपणाने ती लग्न सोहळ्यात सहभागी झाली. मधुराला वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांनी व्यायाम करण्याचा सल्ला दिला होता. नृत्याची आवड असल्याने मधुराने झुंबा करण्यास सुरवात केली. 
 
वरील कारणांची माहिती नसताना आजूबाजूच्या बायकांनी पटकन तोंड उघडून आपलं मत व्यक्त केलं होतं. ज्यात जराही विवेक किंवा विचार नव्हता. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपलं घर कसं ठेवावं, आपण कसे कपडे घालावेत, आपण काय करावं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. किंबहुना ते स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, हे आपण कधी समजून घेणार आहोत? 
 
मैत्रिणींनो, अशा पद्धतीने कुणाच्या व्यक्तिगत गोष्टींवर चटकन रिअ‍ॅक्ट होणं आपण टाळू शकतो. सतत प्रतिक्रिया देण्याची टिपिकल सवय आपल्याला मोडता येईल? अगदी लगेच नाही पण प्रयत्न केला तर नक्कीच जमू शकेल.
 
चला तर मग, आज संक्रांतीलाच हा वसा घेऊया.. यापुढे कुणाच्याही पर्सनल इशूवर नो कमेंटस !!!
 
तिळगुळ घ्या आणि (खरं च) गोड बोला !
 
(ता. क. : आता संक्रांतीला ‘तिने हळदी कुंकवाला प्लास्टिकचा डबा दिला.. हिने एवढीशी वाटी दिली,’ अशा कमेंट करू नका.. कारण काय द्यावं हा जिचा तिचा प्रश्न !!  नाहीतर... सगळंच मुसळ केरात !!

- ऊर्मिला हिरवे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आम्हालाही हळदीकुंकू करावसं वाटतं