Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाऊस आणि ती

पाऊस आणि ती
, रविवार, 31 ऑगस्ट 2014 (21:54 IST)
प्रत्येकाच्या प्रेमात या रिमझिम पावसाची ओढ लावणारी मध्यस्ती असते. म्हणूनच या रिमझिम बरसणा-या पावसात आणि तिच्यात काही तरी साम्य असल्याचे नेहमीच त्याच्या मनाला स्पर्श करून जाते. कारण सुगंधाची दरवळ घेऊन पृथ्वीच्या सानिध्यात बरसणा-या या पावसाच्या आगमनामुळेच ओसाड माळरानावरही प्रीतीची पालवी फु टते. अगदी तसेच ती आल्यावरही त्याच्या मनामध्ये या प्रीतीचा गंध दरवळू लागतो आणि पाहता पाहता वातावरणातला गुलमोहर कधी गुलाबी होऊन जातो हे त्यालाही कळत नाही. मित्रांनो, अशाच या रिमझिम पावसाच्या आणि तिच्या आठवणींनी तुमच्याही मनामध्ये घर केलं असेलच ना. मग हा रिमझिम पाऊस पाहिला की खुलतोना तुमच्याही मनाचा पिसारा त्याच पावसाच्या व तिच्या आठवणींनी.

webdunia
त्याची आणि पावसाची मैत्री काही न्यारी असते. नेमकी ती भेटावयास आली की पाऊस बरसून त्याला मदत करणार. मग तीच या पावसावर आणि त्याच्यावर रुसव्या-फुगव्यांची बरसात करते. पण मनापासून तिला हा पाऊसही आवडतो आणि तोही. कारण या पावसाच्या साक्षीनेच प्रीतीचा गारवा दोघांच्याही मनामध्ये गंधित होत असतो . पावसामुळे दरवळणारा मातीचा गंध, पावसाचे ते टपोरे थेंब, मधूनच वा-याची येणारी ती झुळुक, चिंब भिजल्यानंतर एकमेकांना नयनात शोधणा-या त्या नजरा आणि तिच्या भिज-या चेह-यावरील आनंद पाहण्याचे मिळालेले ते भाग्य त्याला आणि तिला अगदी बेधुंद करून जाते. पावसाने तिची अडवलेली वाट त्याच्यासाठी एक प्रीतीची भेटच ठरून जाते. मित्रांनो, यामध्ये पाऊस आपली मैत्री निभावतो आणि आपण आपली प्रीत फुलवतो.

अजूनही आठवतं मला, एकदा या वेड्या पावसाने तिची अशीच वाट अडविली होती. पण ती त्या पावसावर थोडीही रागावली नाही. उलट तिनं या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. या पावसाचा तिला इतका आनंद झाला होता की, तिला तिनं आणलेल्या छत्रीचंही भान राहिलं नव्हतं की घरी जाण्यासाठी होणारा उशीरही ती विसरली होती. त्या पावसात अगदी चिंब चिंब भिजली ती. पावसाच्या रिमझिम सरी अंगावर घेत ती माझ्यावर पाणी उडवीत होती आणि मी तिचं भिजलेलं रूप न्याहाळत होतो. माझ्याशी हुज्जत घालून चहा पिण्याचा आनंदही अगदी मनमुरादपणे तिनं यावेळी घेतला होता. पावसाची सर आणि तिचं सौंदर्य यांचा मिलाफ त्या क्षणाला अगदी गुलाबी करून गेला होता.

दादासाहेब कदम

Share this Story:

Follow Webdunia marathi