Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कादंबरीकार आशा बगे यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

asah
, शनिवार, 28 जानेवारी 2023 (20:25 IST)
कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे. दि. १० मार्च २०२३ रोजी पुरस्काराचे वितरण नाशिकच्या कालिदास कलामंदिर या ठिकाणी करण्यात येणार आहे.  बगे या मराठी भाषेत लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार आणि लेखिका आहेत. त्यांच्या ‘भूमी’ या कादंबरीला २००६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 
 
आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’ पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री.पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला व नंतर मौज व बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.
 
आशा बगे यांचा ‘मारवा’हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे. तर ‘भूमी’व ‘त्रिदल’या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ला २००७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला.
 
आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेले आहे. त्यांच्या लेखनात सुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतो. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्याहीमुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे. त्यांनी अनंत (कथासंग्रह), अनुवाद (माहितीपर), ऑर्गन (कथासंग्रह), आशा बगे यांच्या निवडक कथा (संपादित, संपादक – प्रभा गणोरकर), ऋतूवेगळे (कथासंग्रह), चक्रवर्ती (धार्मिक), चंदन (कथासंग्रह), जलसाघर (कथासंग्रह), त्रिदल (ललित), दर्पण (कथासंग्रह), धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (ललित कथा), निसटलेले (कथासंग्रह), पाऊलवाटेवरले गाव (कथासंग्रह), पिंपळपान भाग १, २, ३ (कथासंग्रह; सहलेखक – शं.ना. नवरे, हमीद दलवाई), पूजा (कथासंग्रह), प्रतिद्वंद्वी (कादंबरी), भूमिला आणि उत्सव (कथासंग्रह), भूमी (कादंबरी), मांडव, मारवा (कथासंग्रह), मुद्रा (कादंबरी), वाटा आणि मुक्काम (अनुभव कथन; सहलेखक – भारत सासणे, मिलिंद बोकील, सानिया), वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग १, २ (संपादित), श्रावणसरी, सेतू (कादंबरी) असे साहित्य लेखन केले आहे.
 
आशा बगे यांच्या लेखनाला दर्पण या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार, ‘भूमी’साठी २००६चा साहित्य अकादमी पुरस्कार, २०१२चा मालतीबाई दांडेकर पुरस्कार, २०१८ : राम शेवाळकर यांच्या नावाचा (पहिला) साहित्यव्रती पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Strawberries are good for health आरोग्यासाठी स्ट्रॉबेरी आहे गुणकारी