मदर मेरीचे केरळमधील अनोखे चर्च
मदर मेरीने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिला तो दिवस सर्वत्र नाताळ म्हणून साजरा होतो. या पावन दिनी जगभरात मदर मेरीसोबत प्रभू येशूची प्रार्थना करण्यात येते. यानिमित्त प्रभू येशूची आई मदर मेरी यांच्या सन्मानार्थ केरळमध्ये बनवण्यात आलेल्या ऐतिहासिक चर्चची भेट आपणास घडवणार आहोत. नऊशे वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1023 मध्ये या चर्चची निर्मिती करण्यात आली होती. पोर्तुगाली वास्तुशैलीत चर्चचे बांधकाम करण्यात आले आहे. चर्चमध्ये स्थापन करण्यात आलेली मदर मेरी यांची मूर्ती फ्रान्सहून मागवण्यात आली होती. मूर्तीत मदर मेरीचे सुंदर रूप साकारण्यात आले आहे. चिरथल्ला मुट्टम सेंट मेरी फॅरोना नावाने हे चर्च प्रसिद्ध आहे. केरळच्या एलापुजा जिल्ह्यात चिरथल्ला हे छोटेसे गाव आहे. प्राचीन काळी हे शहर केरळमधील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. शहराची स्थापना ज्यू लोकांनी केली होती,
असे मानण्यात येते. संत थॉमस येशूच्या संदेशाच्या प्रचारासाठी सर्वप्रथम केरळात आले होते. येथे त्यांनीच सर्वप्रथम सात चर्चची स्थापना केली होती. यानंतर ख्रिश्चन धर्माच्या अनुयायात वाढ होऊन त्यांनी अनेक ठिकाणी चर्चेस स्थापन केली. चिरथला येथील मुट्टम चर्च त्यातीलच एक आहे. मुट्टम येथील चर्चमध्ये प्रत्येक धर्माचे भाविक प्रार्थनेसाठी येतात. येथे आल्यानंतर मनोकामना पूर्ण होण्यासोबतच दु:खाचे हरण होते, अशी श्रद्धा आहे. परिसरातील कोणत्याही धर्माची व्यक्ती नवकार्याच्या शुभारंभापूर्वी येथील मदर मेरीच्या चर्चमध्ये येऊन आशीर्वाद घेते. जीवनातील सुख-दु:ख वाटण्यासाठी ते येथेच येतात. मदर मेरी प्रभू येशू ख्रिस्त व भाविकांमधील दुवा असून ती भक्तांची इच्छा प्रभूपर्यंत पोहचवते, अशी श्रद्धा आहे. मदर मेरीस पवित्र माता मानण्यात येते. सहावे पोप यांनी ही बाब पहिल्यांदा सांगितली.
मुट्टम येथील चर्चमध्ये आठ डिसेंबरनंतरच्या पहिल्या रविवारी मदर मेरीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याशिवाय दुसरी मुख्य मेजवानी आठ जानेवारीस असते. यावेळी मदर मेरी व येशू ख्रिस्ताच्या मूर्तींची शोभायात्रा काढण्यात येते. मदर मेरीस मानवतेची देवी समजण्यात येते. आई मुलांचा सांभाळ करते त्याप्रमाणेच मदर मेरी सर्वांना आशीर्वाद देते, त्यांचे कल्याण करते, असे मानले जाते. म्हणूनच फक्त ख्रिश्चनच नाही तर सर्व धर्मातील भाविक येथे भेट देतात.