राजस्थानमधील जोधपूर येथे ब्युटीशियनची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून खड्ड्यात लपवल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला मुंबईतून अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, आरोपी गुलामुद्दीन फारुकी हा गेल्या 9 दिवसांपासून फरार होता आणि त्याला व्ही.पी. रोड पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि राजस्थान पोलिस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही अटक केली.
दागिन्यांसाठी ब्युटीशियनची हत्या: अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी दक्षिण मुंबईत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यांनी सांगितले की, आरोपीला जोधपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, 'ब्युटीशियन' अनिता चौधरी (50) यांची गुलामुद्दीनने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हत्या केली होती आणि हत्येचा उद्देश अनिताने घातलेले सोन्याचे दागिने लुटणे हा होता. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून घराजवळील 10 फूट खोल खड्ड्यात लपवून ठेवले.
ही घटना 28 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली होती. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान अनिता गुलामुद्दीनच्या घरी गेली होती आणि तेव्हापासून बेपत्ता असल्याचे समोर आले. गुलामुद्दीनच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिने ही हत्या आपल्या पतीनेच केल्याचे मान्य केले. पोलिसांनी पत्नीला अटक केली होती. त्याने सांगितले की, अनिताच्या हत्येनंतर गुलामुद्दीन अटक टाळण्यासाठी मुंबईत आला होता.