Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mumbai Rain : अंडरग्राउंड पॉंड मुंबईत पावसाचं पाणी साचणं रोखतील का?

Mumbai Rain : अंडरग्राउंड पॉंड मुंबईत पावसाचं पाणी साचणं रोखतील का?
, शनिवार, 12 जून 2021 (17:57 IST)
मयांक भागवत
मध्य मुंबईतील हिंदमाता परिसरात पावसाचं पाणी रस्त्यावर साचू नये. यासाठी महापालिकेने अंडरग्राउंड टॅंक बनवण्यास सुरूवात केलीये. पहिल्या टप्प्यात दोन अंडरग्राउंड पॉंड पावसाचं पाणी साठवण्यासाठी बनवण्यात येत आहेत.
 
मुंबई महापालिकेचा हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला, तर शहरात पाणी साचणाऱ्या इतर ठिकाणी अशा प्रकारचे टॅंक तयार करण्याचा पालिकेचा विचार आहे.
 
मुंबईत जोरदार पाऊस पडल्यावर मुंबई तुंबते. परळ, हिंदमाता परिसरात पावसाळ्यात दरवर्षी गुडघाभर पाणी भरतं. याचा नाहक त्रास मुंबईकरांना सोसावा लागतो.
पण रस्त्यावर पाणी तुंबण्याच्या समस्येवर अंडरग्राउंड टाक्या हा कायमचा उपाय आहेत? यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याचा प्रश्न सुटू शकेल? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
कुठे आहेत अंडरग्राउंड टॅंक?
पावसाचं पाणी साठवण्यासाठी मध्य मुंबईतील परळ आणि दादर भागात दोन पॉंड (तळी) बनवण्याचं काम सद्यस्थितीत सुरु आहे. एक टॅंक परळच्या सेंट झेविअर्स गार्डनमध्ये, तर दुसरा दादर पश्चिमेच्या सेनापती बापट मार्गावरच्या प्रमोद महाजन गार्डनमध्ये बांधण्यात येतोय.
काही दिवसांपूर्वी मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या कामाची पहाणी केली होती. ते म्हणतात, "या अंडरग्राउंड टॅंकमध्ये कमीत-कमी तीन तास पाणी साठवलं जाऊ शकेल."
 
जपानची राजधानी टोकयो, दक्षिण कोरिया आणि कॅनडामध्ये अशा प्रकारचे टॅंक बांधण्यात आले आहेत.
हिंदमाता परिसरात पाणी भरण्याचा मुद्दा उपस्थित झाला की, हा परिसर बशीसारखा आहे असं कारण मुंबई महापालिका पुढे करते. हिंदमाता, परळ, दादर या परिसरात दरवर्षी रस्त्यावर पाणी भरल्याने मुंबईकरांना नाहक त्रास रहन करावा लागतो.
 
प्रमोद महाजन उद्यानातील टॅंक
मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रमोद महाजन उद्यानातील टॅंक येत्या महिनाभरात बांधून तयार होईल. त्यानंतर या टॅंकमध्ये पाणी साठवण्यास सुरूवात केली जाईल.
 
हा टॅंक 100 लांब, 50 मीटर रुंद आणि 6 मीटर खोल आहे.
पहिल्या टप्प्यात यातील साठ मीटरच्या भागात पाणी साठवलं जाणार आहे.
16000 क्युबिक मीटर पाणी साठवण्याची क्षमता.
हिंदमाता परिसरात रस्त्यावर साचणारं पाणी या टॅंकमध्ये स्टोअर केलं जाईल.
पालिका अधिकारी माहिती देतात, पूर्वेकडून पश्चिमेला पाणी आणण्यासाठी 800 मीटर लांब पाईप टाकण्यात येणार आहे. हा पाईप टाटा मिल्स आणि रेल्वेलाईनच्या खालून टाकण्याचं काम सुरू झालंय.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू म्हणाले, "या कामासाठी रेल्वे आणि टाटा मिल्सकडून परवानगी मिळाली आहे. अंडरग्राउंड टॅंक बांधण्याचं प्रोजेक्ट दोन फेजमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात एक तृतीयांश टॅंक बनवण्यात येईल."
 
परळच्या सेंट झेविअर्स गार्डनमध्ये बनवण्यात टॅंक तयार असून येत्या काही दिवसात सुरू केला जाईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिलीये. "या टॅंकमुळे मोठा पाऊस आणि भरतीच्या वेळी रस्त्यांवर पाणी साचून राहणं कमी होईल," असं आदित्य ठाकरे ट्विटरवर म्हणाले.
 
जमिनीखालच्या या टाक्या बांधून पूर्ण झाल्यावर त्या वरून स्लॅब टाकून बांधून काढण्यात येतील आणि त्यावर पुन्हा बाग वसवण्यात येईल.
पालिकेच्या प्लॅननुसार, टॅंकमध्ये साठवण्यात आलेलं पावसाचं पाणी, भरती कमी झाली की पर्जन्य जलवाहिन्यांच्या माध्यमातून (Storm water drain) समुद्रात सोडण्यात येईल. या प्रोजेक्टची एकूण किंमत 130 कोटी रुपये आहे.
 
"पहिल्या टप्प्यात दोन्ही टॅंक बांधून पूर्ण झाल्यानंतर 30,000 क्युबिक मीटर्स पाणी साठवण्याची क्षमता तयार होईल," अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
 
तर आदित्य ठाकरेंच्या माहितीनुसार, "मुंबईत पाणी साचून राहणाऱ्या इतर ठिकाणी अशा प्रकारेचे टॅंक बांधण्यात येणार आहेत. यासाठी जागा शोधण्याचं काम मुंबई महापालिकेने सुरू केलंय."
 
अंडरग्राउंड टॅंक कायमस्वरूपी उत्तर आहे?
मध्य मुंबईतील पाणी साचण्याच्या समस्येवर अंडरग्राउंड टॅंक तोडगा आहेत का? हे आम्ही शहर नियोजनकारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही शहर नियोजनकार अमिता भिडे यांच्याशी संपर्क केला. त्या म्हणाल्या, पावसाळ्यात पाणी का भरतं याकडे तीन दृष्टीकोनातून पहाणं गरजेचं आहे.
 
कायदेशीर आणि बेकायदेशीररित्या होणारी जमीन भरणी
गृहनिर्माण सोसायटीला परवानही देताना पाणी पुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था
ड्रेनेज सिस्टिम
"मुंबईत या तीनही यंत्रणा वेगवेगळ्या दिशेने धावतात. यात समन्वय नसल्यामुळे पाणी साचण्याचा प्रश्न निर्माण होतो," असं त्या म्हणाल्या.
अंडरग्राउंड पॉंडमुळे रस्त्यावर पाणी भरण्याचा प्रश्न सुटू शकेल? यावर बोलताना अमिता भिडे सांगतात, "होल्डिंग पॉंडमुळे काही काळासाठी पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. पण हे कायमस्वरूपी पूर परिस्थितीवर उत्तर असेल का, यावर मी साशंक आहे."
 
"पाणी तुंबणं हा प्रकार त्या भागाच्या मायक्रो किंवा सूक्ष्म नियोजनाखाली असला पाहिजे. मुंबई शहरात विविध ठिकाणी पाणी साचण्याची कारणं वेगळी असू शकतात. "होल्डिंग पॉंड हा उपाय सगळीकडे लागू होऊ शकत नाही," असं त्या पुढे सांगतात.
 
तर, शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी सांगितलं की, "तांत्रितदृष्ट्या किंवा कागदोपत्री हा प्रकल्प चांगला आहे. पण, दीर्घकालीन उपाय म्हणून कसा काम करेल, हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. पावसाचा पॅटर्न, शहरात कुठे पाणी साचतं याचा अभ्यास, पाऊस किती प्रमाणात पडतो याचा अंदाज घेऊन भूमिगत तळी कशी बांधायची हे ठरवावं लागतं."
"टोकियो शहरातही कॅथेड्रल बांधल्यानंतर शहर विस्तारत गेलं आणि पाणी साचणारी ठिकाणं फक्त बदलत गेली. पावसाचं प्रमाण वाढल्याने टोकयोमध्ये वर्षातून बारा वेळा पूर आल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय होल्डिंग पॉंड्स हा प्रकल्प अत्यंत खर्चिक आहे."
 
मुंबई पाणी भरणाऱ्या जागा
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, शहरात पाणी भरणाऱ्या 113 जागा आहेत. यातील मुंबई शहरात 24, पश्चिम उपनगरात 73 तर, पूर्व उपगनरात 7 जागांवर पाणी साचण्याची समस्या आहे.
 
अंडरग्राउंड टॅंकवर भाजपचं टीकास्त्र
मुंबई महापालिकेच्या या अंडरग्राउंड पाणी साठवण्याच्या प्रोजेक्टवर भाजपने सडकून टीका केलीये. भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट म्हणाले, "अंडरग्राउंड टॅंक बांधल्याने काहीच फायदा होणार नाही. हे काम म्हणजे, आजचं मरण उद्यावर ढकलण्यासारखं आहे."
 
"हिंदमाताचं पाणी सेनापती बापट मार्गावरील पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. सेनापती बापट मार्गावर गेले काही वर्षांपासून पाणी भरतंय. आता, आणखी जास्त पाणी भरेल."
 
त्यांचा आरोप आहे की, हिंदमाता प्रोजेक्टवर आत्तापर्यंत पालिकेने 800 कोटी रूपये खर्च केले. पण अजूनही पाणी भरण्याची समस्या सुटलेली नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ