वेगळे तेलंगणा राज्य निर्मितीचा निर्णय घेण्यासाठी संपुआच्या समन्वय समितीची उद्या मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर लगेच कॉंगे्रस कार्यकारिणीचीही बैठक होणार आहे. या दोन्ही बैठकानंतर तेलंगणावरील अंतिम निर्णय जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. हैदराबादला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येऊन, आंध्र तसेच तेलंगणाच्या संयुक्त राजधानीचा दर्जा या महानगराला मिळेल. कॉंगे्रसमधील उच्चस्तरीय सूत्राने याबाबतचे संकेत दिले आहेत.
मंगळवारी दुपारी चार वाजता संपुआच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. सुमारे तासभर ही बैठक चालणार असून, यात संपुआतील सर्वच घटक पक्षांची मतं जाणून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता कॉंगे्रस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. समन्वय समितीच्या बैठकीतील चर्चेची माहिती या बैठकीत सादर करण्यात येईल आणि अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर लगेच एक पत्रपरिषद आयोजित करण्यात येईल आणि तेलंगणावरील अंतिम निर्णयाची घोषणा होईल, असे या सूत्राने सांगितले.
तेलंगणा हे देशातील २९ वे राज्य असेल. आंध्रच्या विभाजनातील कळीचा मुद्दा असलेल्या हैदराबादला केंद्र शासित प्रदेश करण्याची शक्यता जवळपास धुसर मानली जात आहे. मात्र सुरवातीची काही वर्षे हैदराबाद ही उर्वरीत आंध्र आणि तेलंगणाची संयुक्त राजधानी असेल. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीची घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे.