बाराबंकी- दो मिनिटात तयार होणारी मॅगी तपासणीत पुन्हा एकदा फेल झाली आहे. सूत्रांप्रमाणे उत्तर प्रदेशामधील बाराबंकी शहरात पाच फेब्रुवारी रोजी एका जनरल स्टोअरमध्ये मॅगी नूडल्सचे नमुने घेण्यात आले होते.
मुख्य अन्न सुरक्षा अधिकारी मनोज कुमार यांच्याप्रमाणे तपासणीत त्यातील घटक नियमानुसार विपरित होते. नियमानुसार मॅगीमधल्या मसाल्याच्या राखेचे प्रमाण एक टक्के असायला हवे, पण तपासणीत हे प्रमाण 1. 85 टक्के असल्याचे आढळून आले आहे. हा अहवाल लखनऊमधील प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर 26 फेब्रुवारीला जारी केला गेला.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यानुसार आता संबंधित विक्रेता आणि नेस्ले कंपनीला नोटिस पाठवण्यात येणार आहे. जर कंपनी समाधानी नसेल, तर ती आपल्या खर्चावर नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवू शकते. येथील अहवाल अंतिम मानला जाईल, असेही कुमार यांनी म्हटले.
कुमार म्हणाले की, एका महिन्याच्या आत तपासणीसाठी कंपनीच्या विक्रेत्याकडून अर्ज न आल्यास अप्पर जिल्हाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला जाईल. या प्रकरणी कंपनीवर पाच लाख रुपयांचा दंडही आकारला जाऊ शकतो.
उल्लेखनीय आहे की यापूर्वीही बाराबंकीमध्ये घेतलेले मॅगीचे नमुने फेल झाले होते. ज्यानंतर मॅगीच्या विक्रीवर बंदी घातली गेली होती. तसेच मॅगी बाजारात आल्यापासून तिचा स्वाद पूर्वीसारखा नाही. या सर्व प्रकरणामुळे मॅगीच्या विक्रीवर परिणाम होत आहे.